Children Drawing Sakal
लाइफस्टाइल

‘पालन’गोष्टी : आकाशापलीकडचं आकाश

अलफाज आणि गजल ही माझी दोन्ही मुलं आवडीने चित्रं काढत असतात. विविध रंगांचा वापर करत असतात. अनेकानेक कल्पना रंगवणं सतत सुरू असतं.

सकाळ वृत्तसेवा

- फारूक काझी, बालमानसविषयक साहित्यिक

अलफाज आणि गजल ही माझी दोन्ही मुलं आवडीने चित्रं काढत असतात. विविध रंगांचा वापर करत असतात. अनेकानेक कल्पना रंगवणं सतत सुरू असतं. चित्रांचं वेड माणसासाठी नवीन नाही. भीमबेटका असो किंवा अजिंठा वेरूळची लेणी.. मानवी कलेचा आविष्कार आपणाला ठिकठिकाणी पाहायला मिळतो.

चित्रं फक्त एक छंदच आहे, की त्यातून आणखी काही साधलं जातं? यावर थोडा विचार आज आपण करणार आहोत. जाणवलं, वाचलं ते यात मांडलं आहे. आपण यात आणखी भर घालू शकता.

‘चित्रं काढून पोट भरत नाही’, ‘उगीच काय सारखं चित्रं काढत असता’... असले सगळे डायलॉग आता हद्दपार करायला हवेत. कारण जगण्यातील मोकळ्या जागा हे छंदच भरत असतात. चित्र काढण्यानं काय साधलं जातं, ते खालील मुद्द्यांचा आधार घेऊन स्पष्ट करू या.

आनंद : चित्रं काढणं ही एक कला आहे. आणि कलेचं सर्वोच्च उद्दिष्ट काय असेल तर आनंद. इतर कुणासाठी नव्हे; तर स्वत:साठी तरी आपण चित्रं काढूच शकतो. आनंद घेऊ शकतो.

अभिव्यक्ती : आपण जेव्हा एखादं चित्र पाहतो, तेव्हा ते चित्र केवळ चित्र असत नाही. Every picture has a story. प्रत्येक चित्र एक कथा असतं, चित्रकारानं साधलेला संवाद असतो. अमूर्त विचारांना दृश्यरूप देण्याची किमया म्हणजेच संवाद असतो. अभिव्यक्त होण्याची असोशीच कलेला जन्म देते.

स्व-प्रेम : कलाकार माणूस सर्वच गोष्टींवर प्रेम करत असतो. तो सौंदर्य शोधत असतो. यातूनच त्याला जीवनाचं सौंदर्य गवसत असतं. आणि तो भरभरून प्रेम करू लागतो. स्वत:वर आणि चराचरावर. स्वत:च्या प्रेमात पडणं ही पण एक विलक्षण भावना आहे.

सृजनत्व : मानवी जीवन सुंदर का आहे? असा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपणाला जाणवतं की मानवी सृजनत्व हेच मानवी जीवनाला सुंदर बनवतं. चित्र काढणं हा ही एक सृजनत्वाचाच अविष्कार आहे. हे सृजन विकसित होत जातं. आणि चित्रकार चराचरात नावीन्याचा शोध घेऊ लागतो.

ताणांचा निचरा : हल्लीच्या मानवी जीवनात ताण नाही, असा एकही व्यक्ती आपणाला शोधूनही सापडणार नाही. औषधं मदत करतील; परंतु मनाला जर ताणांपासून दूर ठेवायचं असेल, तर चित्रांसारखा उत्तम उपाय नाही. ताण ही एक मानसिक अवस्था असते आणि त्यावर मनाचा विरंगुळा हा उपाय असतो. मनातील अनावश्यक विचारांना दूर सारणं आणि रचनात्मक विचारांची बीजं पेरणं शक्य आहे.

समस्या-निराकरण : चित्रं आणि ताण निवारण यांचा निकटचा संबंध आहे. तेव्हा जीवनातील विविध ताण निवारताना समस्यांना हळूहळू का होईना निवारण्याचं कसब आत्मसात व्हायला लागतं. कलाकार जगापासून दूर जातो असं जे म्हटलं जातं ते अर्धसत्य आहे. उलट कलाकार जगाचा खूप बारकाव्यानं विचार करत असतात, जिथं सामान्य माणसाची नजरही पोचत नाही. तेव्हा बारकावे शोधले, की समस्येचं उत्तर सापडायला लागतं.

स्मरणशक्ती : चित्रं काढणारी व्यक्ती आपल्या भवतालचं बारीक निरीक्षण करत असते. भवताल समजून घेत असते. बारकावे टिपत असते. आणि हे सर्व आपल्या स्मृतीत जतन करत असते. तेव्हा चित्र काढणं हा केवळ एक छंद उरत नाही, तर स्मरणशक्ती वाढवण्याचं एक माध्यम बनतं. अशाने मूल निरीक्षण आणि स्मृती यांची सांगड घालायला शिकतं.

भावनांक वाढ : कोणताही कलाकार अधिक संवेदनशील असतो. म्हणून तो जसा आनंद शोधतो तसाच तो दु:खंही शोधत असतो. हा प्रवास तितकासा सोपा मुळीच नसतो. अनेक भावनिक आंदोलनातून जावं लागतं. आणि जे दाटून येतं ते कागदावर, कॅनव्हासवर व्यक्त होतं. यातून मानवी संवेदना जिवंत राहतात आणि स्मरणशक्तीसोबतच भावनांकही वाढत जातो. भावनांविना कला ही कला नव्हेच!

आपलं मूल चित्र काढतंय, तर त्याच्या चित्रांची भाषा समजून घ्यायला हवी. त्यांच्या चित्रांना त्यांच्याच डोळ्यांनी पाहायला शिकायला हवं. मूल समजून घेण्याची ही एक महत्त्वाची पायरी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Usha Vance: अमेरिकन पॉवर झोनमधून कमला यांची एक्झिट, उषा यांची एन्ट्री! भारताशी खास कनेक्शन अन् कोण आहेत? जाणून घ्या

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी अजून एकाला अटक

Pakistan : पाकिस्तानची स्थिती ढासळली..! सरकारी शाळांतील शिक्षकांना आठ महिन्यांपासून पगार नाही?

Latur Assembly Election 2024 : लातूर विधानसभा यंदाच्‍या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांवर उमेदवारांची मदार

Ranji Trophy 2024 : Shreyas Iyer, सिद्धेश लाडची सॉलिड सेंच्युरी, मुंबईचा संघ ३०० पार

SCROLL FOR NEXT