पूर्वीच्या काळी सर्वसाधारणपणे सगळ्या घरांमध्ये सकाळ-संध्याकाळ ताजा स्वयंपाक केला जायचा. मुलांचे, नोकरदारांसाठीचे डबे करतानाच स्त्रियांचा सकाळचा स्वयंपाक सहसा होऊन जायचा व नंतर रात्री गरम भाकरी, लोखंडी कढईत परतून एखादी पालेभाजी, एखादी पचडी आणि गरमगरम वरणभात किंवा आमटीभात, घरचंच ताजं दही घुसळून ताक. एकत्र कुटुंबपद्धतीत बरीच माणसं असायची. रोजची जेवणंसुद्धा आग्रह करून व्हायची आणि फारसा स्वयंपाक उरायचा नाही. अगदी पोळी, भात, भाकरी उरलीच, तर नाश्त्याला फोडणीची पोळी, भात, ताकातील भाकरी, दहीभात असे पदार्थ करून ते संपवलं जायचं! अन्नाची नासाडी होऊ नये हाच हेतू असायचा आणि आजही प्रत्येक गृहिणीचा हाच हेतू असतो.
हळूहळू जीवनशैली बदलली, स्त्रिया कामानिमित्त घराबाहेर पडू लागल्या, अर्थार्जन करू लागल्या. स्त्रियांच्या शिक्षणाच्या, स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायच्या स्वप्नांच्या कक्षा रुंदावत गेल्या. घर आणि करिअर हे समीकरण अचूक मांडता मांडता वेळेचं गणित सोडवायचे प्रयत्न चालू झाले आणि प्रत्येक घरात रेफ्रिजरेटर (शीतकपाट) या वस्तूला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं.
सध्याच्या धावपळीच्या जगात तुम्हाला तुमचं आयुष्य सुखकर करायचं असेल, तर नियोजन अत्यंत महत्त्वाचं आणि स्वयंपाकघरात फ्रीज या गोष्टीचं व्यवस्थापन नीट असेल, तर रोजचा स्वयंपाक अगदी वेळेत आणि सहज होईल. नाही म्हटलं तरी मुलांचे, पालकांचे डबे, घरात ज्येष्ठ नागरिक असतील, तर त्यांच्या पथ्याचे, दुपारी चहाबरोबर खाण्यासाठी काहीतरी, रात्री जेवणात वेगळं, सुटीच्या दिवशीचा खास मेनू या सगळ्यासाठी अर्थातच मेनू प्लॅनिंग, किराणामाल, भाज्या, फळं, इतर आवश्यक गोष्टी वेळच्यावेळी आणणं, साफ करून ठेवणं हे महत्त्वाचं आहेच; त्याचबरोबर फ्रीज सुसज्ज आणि नीटनेटका असेल तर स्वयंपाक करतानाचा वेळ तर वाचतोच, शिवाय वस्तूंची नासाडी टाळता येते.
फ्रीजमधील सर्व गोष्टी काढून फ्रीज रिकामा करावा. फ्रिजचं बटण बंद करावं. पाण्यात थोडंसं व्हिनेगर टाकून हलक्या हातानं सर्व पुसून कोरडं करून घ्यावं. फ्रीजच्या शेल्फमध्ये प्लॅस्टिक शीट्स टाकाव्यात- जेणेकरून चरे पडणार नाहीत व दरवेळेस फ्रीज स्वच्छ करणं सोपं जाईल.
फ्रीझरमध्ये एअरटाइट डब्यांमध्ये खोवलेला नारळ किंवा ओल्या नारळाचे तुकडे, मैदा, मटार; मांसाहारी लोकांसाठी चिकन किंवा फिश ठेवता येईल. हल्ली झिप पाउचवर लिहायला एक चौकोन येतो. त्यावर कधीपर्यंत वस्तू वापरता येईल ते लिहून ठेवता येतं. अचानक लागल्यास वापरता यावेत म्हणून काही फ्रोझन स्नॅक्स ठेवता येतील. फ्रीझरमधील उजव्या कप्प्यामध्ये डाळी, कडधान्यं, दाण्याचं कूट, ड्रायफ्रूट्स हे पदार्थ ठेवता येतील.
बर्फाच्या एक्स्ट्रा ट्रेमध्ये ग्रेव्ही क्युब्स करून ठेवता येतात. अडीअडचणीला पटकन् एखादी चटपटीत भाजी बनवता येते, किंवा फ्रीझरमध्ये तुम्ही वाटणही करून ठेवू शकता. आमरस नीट पॅक करून ठेवू शकता.
फ्रीजच्या वरच्या कप्प्यात दूध, दुग्धजन्य पदार्थ... साठवलेली साय; तसंच त्यावरील ट्रेमध्ये बटर, पनीर, चीज या गोष्टी ठेवाव्यात. बटरचा वापर जास्त असेल, तर जास्त बटरचे छोटे तुकडे करून ते डब्यात ठेवावेत. पनीरचा तुकडा उरला असेल, तर तो पनीर निम्मं बुडेल एवढ्या पाण्यात एका भांड्यात ठेवावा.
फ्रीजमधील मधल्या कप्प्यात काही राहिलेले पदार्थ; तसंच कोथिंबीर, मिरच्या (देठ काढून), कडीपत्ता वगैरे स्वच्छ धुवून निवडून कोरडे करून प्लास्टिक डब्यामध्ये पेपर नॅपकिन ठेऊन त्यावर ठेवावेत.
छोट्या डबीत किसलेलं आलं, आठवड्याभरासाठी लागेल असा सोललेला लसूण, एखाद् दिवसासाठी चिरलेला कांदा या गोष्टी ठेवाव्यात. शक्यतो कांदा वगैरे आयत्यावेळीच चिरून वापरावा; पण अगदीच गडबडच्या वेळेस याचा उपयोग होतो.
सफरचंदं, संत्री, द्राक्षं वगैरे फळं फळांच्या कप्प्यात ठेवू शकतो. भाजीच्या ट्रेमध्ये खाली एक पातळ नॅपकिन ठेवावा. खास फ्रीजसाठी पिशव्या मिळतात. त्यात भाज्या स्वछ धुवून पुसून कोरड्या करून ठेवाव्यात.
उजवीकडील कप्प्यामध्ये अंडी, वेगवेगळ्या प्रकारचे विकतचे मसाले, चिंचगूळ चटणी, सॉस, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, ज्यूस वगैरे गोष्टी ठेवता येतात. विकतच्या मसाल्याचं पाकीट फोडल्यावर त्याला रबरबँड लावून ठेवावं.
तांदूळपिठी, भाजलेला रवा या गोष्टीही फ्रीजमध्ये ठेवाव्यात. फ्रीजमधील पदार्थ नेहमी झाकून ठेवावेत.
फ्रीज आणि फ्रीझरमध्ये बेकिंग सोडा एखाद्या वाटीत किंवा अर्धं लिंबू चिरून ठेवल्यास अन्नपदार्थांचा वास येत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.