- मुक्ता बर्वे, मधुगंधा कुलकर्णी
जन्माला आल्यानंतर सगळीच नाती आपल्याला आपोआप मिळतात; परंतु मैत्रीचं तसं नाही. ती जुळून यावी लागते. अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेत्री, लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांची मैत्री अशीच. त्यांची पहिली भेट पुण्याच्या ललित कला केंद्रात झाली. तिथे मधुगंधा एमए करत होती, तर मुक्ता बीए करत होती. यादरम्यानच त्यांची ओळख झाली.
याविषयी मुक्ता म्हणाली, ‘ललित कला केंद्रात मधू मला एका वर्षानं सीनियर होती. त्यावेळी तिचं ‘चौकटीतला माणूस’ हे पुस्तक प्रकाशित झालं होतं. तेव्हा मला याचं अत्यंत कौतुक वाटत होतं. मला अजूनही त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि त्यावरचं मधूचं नाव आठवत आहे. त्यामुळे मैत्रीसोबतच तिच्याविषयी माझ्या मनात एक आदरदेखील तेव्हापासूनच निर्माण झाला. तेव्हाची मधू ते आत्ताची सिद्धहस्त लेखिका मधुगंधा कुलकर्णी इथपर्यंतचा तिचा प्रवास मला माहितीये.’
मधुगंधा म्हणाली, ‘आम्ही पहिल्यांदा भेटलो, तेव्हापासूनच मुक्ता मला शांत आणि समजूतदार वाटायची. बरेचदा मुक्तानं मला तिच्या स्कूटरवरूनल ‘ललित’पासून विद्यापीठाच्या गेटपर्यंत सोडलं आहे. आम्ही त्यावेळी खूप गप्पा मारायचो. कालांतरानं आमची मैत्री वाढत गेली. आता आमच्या मैत्रीला जवळजवळ २५ वर्षं पूर्ण झाली आहेत. आम्ही दोघीही एकमेकींच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार आहोत.’
मधुगंधाच्या स्वभावविषयी मुक्ता सांगत होती, ‘मधुगंधा अत्यंत सकारात्मक आहे आणि तिची सकारात्मकता फक्त तिच्यापुरतीच मर्यादित नाहीये, तर तिच्या अवतीभवती असणाऱ्या प्रत्येकाला ती जाणवते. ती पॉझिटीविटीचा खजिना आहे. सगळ्यांना ती प्रोत्साहन देते. मला तिनं आयुष्यातील अनेक टप्प्यांवर मदत केलीये.
मला माझं पहिलं घर घेण्यासाठी तिनं मला प्रोत्साहित केलं, असं म्हणण्यापेक्षा ‘भाग पाडलं’ असं मी म्हणेन. माझ्याबाबतीत हे झालं त्यात मधूचा खूप मोठा वाटा आहे. मी पहिल्यांदा तिच्या घरीच भाड्यानं राहायची. तेव्हा एकदा मधू मला म्हणाली, की मुक्ता तू आता माझ्या घरातून तेव्हाच बाहेर पडायचं जेव्हा तू स्वतः घर घेशील आणि माझी इच्छा आहे, की तू लवकरात लवकर माझ्या घरातून बाहेर पडावंस. तेव्हा मीदेखील म्हणाले होते, की मी माझं घर घेईन तेव्हा त्याला मी तुझं नाव देईन आणि खरंच मी घर घेतलं, तेव्हा त्याला मी ‘मधुकृपा’ अशी छोटीशी नेमप्लेट लावली होती.’
मधुगंधा म्हणाली, ‘मुक्ताचं प्रोफेशनॅलीझम, तिची नात्यांमधली कमिटमेंट, तसंच कामाबाबतची तिची पॅशन आणि तिचं प्राणिप्रेम अशा तिच्या अनेक गोष्टी मला आवडतात. तिला नवनवीन गोष्टी करायला, शिकायला आवडतात आणि तिचा ध्यास, नवीन करण्याची तिची इच्छा या गोष्टी मला आवडतात. ती खूप चांगली मुलगी आहे; परंतु तिच्यातल्या दोन गोष्टी मला नाही आवडत.
त्या म्हणजे, ती स्वतःची अजिबात काळजी घेत नाही आणि ती व्यायाम करत नाही. तिचा सगळा भर डाएटिंगवर असतो. मला वाटतं, की तिनं व्यायाम केला तर ती सुदृढ होईल; पण ती ते नाही करत. दुसरं म्हणजे सारासार विचार न करता ती पटकन एखाद्याच्या प्रभावाखाली येते आणि मग ती त्याच्यावर बरेचदा आपला बँक बॅलन्सदेखील उधळून देते. तिनं हे नाही केलं पाहिजे.’
मुक्ता म्हणाली, ‘आम्ही बऱ्याचवेळा इतर लोकांकडून एकमेकांच्या कामाचं कौतुक ऐकलं आहे; पण एकत्र काम करण्याचा अनुभव आम्ही घेतला नव्हता. ‘नाच गं घुमा’ या चित्रपटामुळे आम्हाला ही संधी मिळाली. यादरम्यान मी एक निर्माती, एक लेखिका म्हणून तिचं काम मी जवळून पहिलं. तिचं कामाचं परफेक्शन आणि तिची कामाची स्टाइल कमाल आहे.’
मधुगंधा म्हणाली, ‘मी मुक्ताला या चित्रपटाविषयी बोलले, तेव्हा आम्ही मानधनावरून चर्चा करत होतो. त्यावेळी मुक्ता मला म्हणाली, मी या चित्रपटात काम करेन; पण मी एक रुपयादेखील घेणार नाही. तू जे पैसे मला देणार असतीस ते प्रॉडक्शनवर खर्च कर. तिचं हे बोलणं ऐकून माझा ऊर भरून आला. करण मुक्ता ही मराठी इंडस्ट्रीची स्टार आहे.
मला माहिती आहे, की आम्ही मैत्रिणी आहोत; पण मला प्रोफेशनल आणि पर्सनल गोष्टी वेगवेगळ्या ठेवायला आवडतात; पण तिनं तिच्या बाजूनं मला काही गोष्टी सांगितल्या, तेव्हा मी काहीच नाही बोलू शकले. आम्ही इतकी वर्षं मैत्रिणी आहोत; पण एकत्र काम नव्हतं केलं. आता प्रोफेशनलीसुद्धा आम्ही एकत्र काम केलं, तेव्हा खरंच खूप छान वाटलं.’
(शब्दांकन : मयूरी गावडे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.