ऋतुजा बिरारे
मैत्रीची अनुभूती काही वेगळीच. या नात्यात सगळं कसं हवहवसं वाटतं. प्रत्येक गोष्टीचं शेअरिंग करताना मजा येते. मित्र-मैत्रिणींसोबत लहान होता येते.
‘शब्दांच्या पलीकडे
भावनांचा खेळ चालतो
ना कळत, या मनाला
आभास हा जाणवतो
त्याच्या सुरवातीला
एक अनमोल नात बनवतो
या मनी रुजलेल्या नात्याला
मैत्री असं नाव देतो।’
मनाच्या सागरात मार्गक्रमण करणारी नाव किनाऱ्यावर परत येणारच. हा विचार करून वाट बघणारे आपण थांबलेलो असतो. जीवनाच्या प्रवासात कित्येक हातांची आणि व्यथांची गरज असते. ज्याने एक अद्भूत नात्याची सुरवात होते. या नात्याच्या नावेला मैत्री नावाने ओळखलं जातं. मैत्रीचं नातं हे प्रत्येक नात्याची सुरवात असते.
कायमस्वरूपी मनात कुठे तरी लपलेल्या भावनांना आज पण या नात्याने स्पष्ट होत असताना दिसते. वेदनांच्या जाळेत अडकलेलं मन मैत्रीला शोधत असतं. मैत्रीला शब्दात स्पष्ट करताना हे कळतं, की मैत्री फक्त शब्द नसून अर्थ आहे. एक असा अर्थ जो जगण्याला आणि जीवनाला सार्थक करतो. व्यक्ती हा फार काळ एकटा नाही राहू शकत. कधी तरी व्यक्त होण्यासाठी मैत्री गरजेची असते.
आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी एक व्यक्ती असते. जी तुमच्या आयुष्यात पहिली जरी नसली तरी नेहमी प्रथम स्थानावर राहते. कोणतेही बंधन न घालता वर्षानुवर्षे चालत आलेलं हे नातं कुठे ही ना थांबता वळण घेत धावत असतं. मैत्री ही मुक्त स्वरूपात पक्ष्यांप्रमाणे आभाळाची सहल करत असते आणि मैत्रीचा निवारा कुठेही नसतो. सल्ला देणे आणि कायम हजर राहणे हे मैत्रीचे नियम नसून मैत्रीची गरज आहे.
मैत्रीत हसणं, रडणं, रागावणं, रुसवे या गोष्टींचे मिलन आपण न ठरवता हे नातं ठरवतं. कारण प्रत्येक व्यक्तीसोबत मैत्री आणि प्रत्येक व्यक्तींची जागा ही नेहमी वेगळी असते. न सांगता न बोलता मनाची व्यथा समजणं. ही मैत्री एक अश्या टप्यावर जाऊन थांबते जिथे कोणत्याच गोष्टींचं बंधन नसतं. या मैत्रीचे रूप एक नसून कित्येक आहेत. एक व्यक्ती नसून भरपूर मैत्रीचे हात आहेत. मुक्तपणे मिरवणारी ही मैत्री कधी न संपण्याचं वचन घेऊन कायम स्वरूपी चालत राहते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.