केसांच्या स्वच्छतेचा विचार करता रिठ्याचा शाम्पू खूप परिणामकारक असतो. रिठ्याचं कंडिशनर वापरल्यानं केसांना नैसर्गिक चमक मिळते.केसांचा पोत सुधारण्यासाठी रिठ्याचा हेअर मास्क प्रभावी ठरतो. सुंदर चमकदार केसांसाठी महागडे शाम्पू, कंडीशनर वापरले जातात. पण त्याचा उपाय होण्यापेक्षा दुष्परिणामच जास्त होतात. अशा शाम्पू कंडिशनरचा परिणामही तात्पुरताच टिकतो. अशा वेळेस केस निरोगी, मजबूत होण्यासाठी, केस वाढण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी नैसर्गिक घटकांचा वापर केल्यास फायदा होतो. केस जपण्यासाठी आजीच्या बटव्यातील रिठ्याचा उपयोग फायदेशीर ठरतो. विकत मिळणाऱ्या हेअर प्रोडक्टसमध्ये रिठ्याचा वापर केलेला असतो. पण यासोबत केमिकल्सचाही वापर केलेला असल्यानं रिठ्याची परिणामकारकता आपोआप कमी होते. त्यामुळे घरच्याघरी रिठ्याचा नैसर्गिक स्वरुपात वापर केल्यास केसांना त्याचा फायदा होतो.केस नैसर्गिक रित्या जपण्यासाठी करा रिठ्याचा (soap nuts for hair care) वापर. रिठ्याचा शाम्पू, कंडिशनर आणि हेअर मास्कनं सुटतील केसांच्या समस्या.
चला तर मग आधी बघू या की घरच्या घरी रिठ्याचा शाम्पू कसा तयार करायचा ?
पूर्वीच्या काळात केस स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय केले जायचे. पण ते उपाय खूप वेळखाऊ होते, त्यासाठी कष्टही घ्यावे लागत होते. आता धकाधकीच्या जिवनात वेळेची कमतरता बघता केस स्वच्छ करण्यासाठी शाम्पूचा वापर केला जातो.
पण या शाम्पूमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक घटकांचा वापर केलेला असल्यानं त्यामुळे केस आणि केसांची मुळं, टाळुची त्वचा खराब होते. शाम्पूमुळे होणारं केसांचं नुकसान टाळण्यासाठी रिठ्याचा शाम्पू घरी तयार करुन वापरावा.
हा शाम्पू तयार करण्यासाठी रिठे, आवळा पावडर आणि शिकेकाईच्या शेंगा घ्याव्यात.
या तिन्ही गोष्टी रात्रभर एकत्र भिजत घालाव्यात.
नंतर सकाळी हे घटक हातानं चुरुन हे मिश्रण गाळून घ्यावं. हे मिश्रण शाम्पू म्हणून केसांना लावावं. रिठ्याच्या शाम्पूचा फेस होत नाही पण केसांच्या स्वच्छतेचा विचार करता रिठ्याचा शाम्पू परिणामकारक असतो.
रिठ्याच्या शाम्पू फायदे:
रिठ्याच्या शाम्पू नियमित वापरल्यास केसात कोंडा होत नाही.
डोक्यात येणाऱ्या खाजेची समस्या सुटते.
रिठ्यामध्ये ॲण्टिसेप्टिक आणि जिवाणुविरोधी गुणधर्म असल्यानं केसांच्या मुळाशी संसर्ग होत नाही.
रिठ्याच्या शाम्पूनं टाळूच्या त्वचेचा पीएच स्तर सुधारतो. रिठ्याच्या शाम्पूनं केशतंतू सुरक्षित राहातात. केस तुटत नाही.
आता बघू या रिठ्याचा हेअर मास्क कस तयार करायचं?
केसांची हरवलेली गुणवत्ता परत मिळवण्यासाठी केसांना केवळ शाम्पू आणि कंडिशनर लावून उपयोगाचं नाही. केसांचा पोत सुधारण्यासाठी केसांना हेअर मास्क लावणं आवश्यक आहे. यासाठी रिठ्याचा हेअर मास्क तयार करावा. कमी खर्चात होणाऱ्या हेअर मास्कनं केसांचा पोत सुधारतो आणि केस नैसर्गिकरित्या सुंदर होतात.
रिठ्याचा हेअर मास्क तयार करण्यासाठी रिठे, सुकलेला आवळा, जास्वंदाची सुकलेली फुलं आणि दही घ्यावं. केस खूपच तेलकट असल्यास मुल्तानी मातीही घ्यावी. ही सर्व सामग्री एकत्र करुन रात्रभर तशीच ठेवावी. दुसऱ्या दिवशी हातानं चुरुन हे मिश्रण गाळून घ्यावं. हे मिश्रण केसांना आणि केसांच्या मुळांना मसाज करत लावावं. ते तासभर केसांवर ठेवल्यानंतर केस आधी पाण्यानं धुवावेत. मग रिठ्याच्या शाम्पूनं केस धुवावेत. केसांना रिठ्याचं कंडिशनर लावावं.
रिठ्याचं कंडिशनरचे फायदे:
केसांना रिठ्याचा हेअर मास्क लावल्यानं केसांची जाडी वाढते.
केस मऊ आणि चमकदार होतात.
केसांचा पोत चांगला होतो.
टाळूची त्वचा खोलवर स्वच्छ होते.
आता बघू या रिठ्याचा कंडिशनर कस तयार करायचं?
आताची परिस्थिती पाहता वातावरणात प्रदूषण आणि आद्रता एवढी वाढली आहे की शाम्पू नंतर केसांना कंडिशनर लावणं आवश्यक असतं. पण कंडिशनर लावल्यानं अनेकांना केस गळण्याचा समस्येला सामोरं जावं लागतं. याचं कारण बाहेरच्या कंडिशनरमध्ये सोडियम लाॅरियल सल्फेट या घटकाचा आणि पॅरॅबिनचा वापर केलेला असतो. अशा कंडिशनरमुळे केसांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी केसांना रिठ्याचं कंडिशनर लावावं. रिठ्याचं कंडिशनर करण्यासाठी रिठा पावडर रात्रभर पाण्यात भिजत घालावी. सकाळी हे मिश्रण उकळून घ्यावं. मग ते गाळून त्याचा कंडिशनर म्हणून उपयोग करावा.
रिठ्याचं कंडिशनर वापरायचे फायदे:
रिठ्याचं कंडिशनर वापरल्यानं केसांना नैसर्गिक चमक मिळते.
केमिकल फ्री असल्यानं केस गळत नाही.
केसात गुंता होत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.