नागपूर : सतत सूचना दिलेल्या कुणालाच आवडत नाही. आई-वडिलांकडून मुलांना आणि पती-पत्नीकडून परस्परांना किती बारीक बारीक सूचना दिल्या जातात. याचे प्रत्येकाने निरीक्षण आणि आत्मपरीक्षण करावे. निम्मे अनावश्यक संवाद आणि त्यामुळे निम्मे वाद नक्कीच कमी होतील. मानसिकतेला सकारात्मक करणारी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अध्यात्म. अध्यात्म - ‘अधि आत्म’- म्हणजे स्वतःकडे पाहणे. अर्थातच स्वतःकडे पाहण्यात आत्मपरीक्षण येते. त्यातूनच जीवनाचा खोलवर दडलेला अर्थ काय याचा विचार सुरू होतो आणि मग एक ‘पूर्णत्वा’ची आस निर्माण होते.
स्त्रिया एखाद्या व्यक्तीला मैत्रीण किंवा जवळची समजतात याचा अर्थ त्यांनी परस्परांपाशी मनातल्या भावना व्यक्त कराव्यात असा असतो. स्त्रीला तिचे दु:ख जवळच्या व्यक्तीने फक्त समजून घ्यायला हवे असते. लग्नानंतर ती त्याच भावनेने पतीला काही सांगते. तेव्हा तिला त्यावर सल्ला नको असतो. लगेच सल्ला मिळाल्याने किंवा असे वाटणेच कसे चुकीचे आहे असे ताशेरे मिळाल्याने ती जास्त दुखावते. पत्नीचे हे व्यक्त होणे फक्त थोडं ऐकून घ्यायला पतीने शिकायला हवे.
पुरुषांसाठी कर्तृत्व, यश या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात. ते मित्रांशी जागतिक गप्पा मारतात, पण स्वत:च्या अडचणी सांगणे म्हणजे मैत्री किंवा जवळीक अशी त्यांची व्याख्या नसते. एखादी गोष्ट आपल्याला जमणार नाही असे वाटते, तेव्हाच ते दुसऱ्या पुरुषाला अडचण सांगून मदत मागतात. त्यामुळे पत्नीच्या मन मोकळे करण्याला ते ती अडचण सांगतेय असे घेतात आणि एकतर सल्ला देतात किंवा ती अडचण एवढी महत्त्वाची नाही असे दाखवायला जातात. हे समजून घेऊन स्त्रियांनी आपले सांगणे थोडक्यात आणि नेमके करायला शिकायला हवे.
स्त्रियांकडून इतरांची विचारपूस करणे, आजारी असताना काळजी घेणे नैसर्गिकपणे घडते. ते गृहीतच धरले जाते. स्त्रिया आजारी असताना किंवा मासिक पाळीच्या काळात थकलेल्या असताना, त्यांना विश्रांतीची, मदतीची खरोखर गरज असते. अशावेळी गैरसोय होतेय म्हणून घरातल्यांनी, तुझ काय नेहमीचं आहे म्हणून तिच्यावर चिडचिड केल्याने किंवा दुर्लक्ष केल्याने तिला काय वाटत असेल याचा अवश्य विचार करावा. ती नेहमी आपली कशी काळजी घेते ते आठवून तिच्या गरजेच्या वेळी पतीने, प्रेमाने नुसती चौकशी केली तरी तिला खूप बरं वाटतं.
पुरुष रागाशिवाय कुठली भावना तीव्रपणे व्यक्त करू शकत नाही. कारण, पुरुषासारखे वागणे शिकवताना समाजाने त्यांना रडायला देखील बंदी केली आहे. आता पुरुषासारखे किंवा बायकांसारखे दोन्ही वागणे सोडून देऊन माणसासारखे वागायला शिकू या. स्त्रिया बाहेर पडल्या तशी पुरुषांची कौशल्ये शिकू लागल्या. पुरुषांनीही थोडीशी संवेदनशीलता जाणीवपूर्वक शिकावी. तर संतुलन चांगले राहील.
प्रत्येक घटनेकडे पाहण्याचा प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन असू शकतो. हत्ती आणि पाच आंधळ्यांच्या गोष्टीप्रमाणे प्रत्येकाला माझाच दृष्टिकोन बरोबर म्हणजे, माझच म्हणण खरं असे म्हणता येऊ शकते. त्यासाठी प्रत्येकाचा दृष्टिकोन समजून घेण्याची तयारी ठेवली तर कदाचित पूर्ण हत्ती समजून घेणे देखील शक्य होऊ शकते. म्हणजे नात्यांची आणखी खोलवर जाण येऊ शकते.
स्वत:ला विचारा हे प्रश्न
व्यक्तिस्वातंत्र्य मान्य असले, तरी आपले म्हणणे दुसऱ्याने ऐकले नाही तर आपण मनात किंवा वागण्यात त्याबद्दल कशा प्रतिक्रिया देतो?
दुसऱ्याचे म्हणणे आपण स्वत:चे म्हणणे तेवढ्यापुरते बाजूला ठेवून नीट ऐकून घेतो का?
योग्य संस्कार कोणता? मोठ्यांशी आदराने वागावे की लहान-मोठ्या प्रत्येकाचा आत्मसन्मान समजून वागावे हा?
आपल्याकडून जी देहबोली, बोलण्याचा टोन दुसऱ्यासाठी येत आहे, तो आपल्याला दुसऱ्याकडून मिळाला तर आपल्याला काय वाटेल? त्यावर आपण कसे वागू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.