Health Problems esakal
लाइफस्टाइल

Health Problems : सणासुदीच्या काळात आरोग्य बिघडले आहे का ? मग आहारात ‘हे’ बदल करायला विसरू नका

अतिजास्त प्रमाणात गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे, शरिरात जाणाऱ्या एकूण कॅलरीजची संख्या वाढते.

सकाळ डिजिटल टीम

नुकतेच गणपती बाप्पांचे विसर्जन झाले आहे. या सणासुदीच्या काळामध्ये अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ आपल्याकडून खाल्ले जातात. त्यानंतर, बऱ्याचदा अनेकांना आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. अर्थात आपले बाप्पा हे जरी दुःख आणि विघ्न दूर करणारे असले तरी या समस्यांना मात्र आपणच कारणीभूत असतो.

कारण, बऱ्याचदा गणेशोत्सवाच्या काळात तेलकट, तूपट पदार्थ, मिठाया, चिप्स, चिवडा ,लाडू अतिजास्त प्रमाणात खाल्ले जातात. याचा थेट परिणाम गणपतीच्या काळात दिसत नसला तरी, ही नंतरच्या काळात त्याचे परिणाम दिसू शकतात. यामध्ये वजनवाढ, उच्च रक्तदाब, उच्चशर्करा, मळमळ, जुलाब, अशक्तपणा किंवा अतिजास्त झोप येणे यासारखे परिणाम समाविष्ट असतात.

सुदैवाने या सर्व गोष्टींची तीव्रता आहारात बदल करून टाळता येते. यासंदर्भात आहारतज्ज्ञ दिनराज मोहिनी आपोणकर यांनी फेस्टिव्ह काळात आरोग्याच्या समस्या सुरू झाल्यावर आहारात कोणते बदल करायचे ? याबद्दल माहिती दिली आहे.

वजनवाढ :

गणेशोत्सव म्हटले की गोडाचे पदार्थ हे ओघाने आलेच! अतिजास्त प्रमाणात गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे, शरिरात जाणाऱ्या एकूण कॅलरीजची संख्या वाढते. बरं गणपतीच्या काळात व्यायाम किंवा फारशी हालचाल न केल्यामुळे, या कॅलरीज वापरल्या जात नाही आणि पर्यायाने वजन वाढते.

त्यामुळे, गणेशोत्सवाच्या काळात तुमचे वजन वाढले असेल तर, नंतरच्या काळात तुम्ही आहारामध्ये कडधान्य, डाळी, आणि हिरव्या पालेभाज्यांचा मुबलक वापर करून तुमचे वजन आटोक्यात आणू शकता. त्यासोबतच कोल्ड्रिंक, मैदा आणि मैद्याचे पदार्थ, चॉकलेटस, आणि फास्ट फूड यावर नियंत्रण ठेवल्याने तुम्ही पुन्हा ‘स्लिम अँड फिट’ होऊ शकता.

उच्च शर्करा : 

खाण्यामध्ये गोड पदार्थांचे प्रमाण वाढल्यास डायबिटीस असलेल्या लोकांमध्ये शर्करेची समस्या दिसून येते. अशावेळी तुमची वाढलेली साखर नियंत्रणात आणण्यासाठी तुम्हाला ‘हाय फायबर’ (तंतूमय) फूड मदत करू शकते. आता हाय फायबर फूड म्हणजे काय, तर सगळ्या हिरव्या पालेभाज्या.

पालेभाज्यांमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनाची प्रक्रिया मंद होऊन; जेवणातील साखर शरिरात हळूहळू शोषली जाते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. या शिवाय मेथी आणि दालचिनीचे सेवन, पुरेशी झोप, कमीत कमी तणाव या तीन गोष्टी तुमची साखर नियंत्रणात आणण्यास मदत करू शकतात.

मळमळ आणि जुलाब :

बाप्पांच्या प्रसादाला नाही कसं म्हणायचं? असा विचार करून आपण सगळीकडे दर्शनाला गेल्यावर वेगवेगळे पदार्थ खातो. परिणामी बऱ्याच जणांना उलट्या, जुलाब, मळमळ यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

जर तुम्हाला जुलाब होत असतील तर सर्वप्रथम डिहायड्रेशन टाळण्यासाठी साखर आणि मीठ घातलेले पाणी प्यावे. ज्यामुळे शरीरातील सोडियम आणि ग्लुकोजची झीज भरून व्हायला मदत होते.

जुलाब झाल्यावर काय खाल ?

सफरचंद, भात, मुगाची खिचडी, ब्रेड, उकडलेली मूगडाळ, इलेक्ट्रोलाईट सोल्युशन, भाज्यांचे तिखट मीठ न घातलेले पातळ पाणी.

काय खाऊ नये? 

चहा, कॉफ, दूध आणि दुधाचे पदार्थ, अंडी, चिकन ,मच्छी, मांस, मका, कांदा, आंबट फळे, तळलेले पदार्थ. या व्यतिरिक्त जर तुम्हाला मळमळ आणि उलट्या होत असतील तर खालील गोष्टी करायला विसरू नका.

१. दर एक ते दोन तासानंतर छोट्या प्रमाणात अन्नाचे सेवन करा.

२. कुठलाही पदार्थ खाल्ल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटे झोपू नका.

३. जर मळमळ होत असेल तर स्वतःच्या हाताने जेवण बनवणे टाळा. कारण मसाल्यांच्या वासामुळे तुमची मळमळ वाढू शकते.

४. तुमचे तोंड स्वच्छ ठेवा.

उच्च रक्तदाब :

उच्च रक्तदाब हे हृदय रोगाचे प्रमुख कारण आहे. सणासुदीच्या काळातील ताणतणाव आणि चुकीच्या आहारामुळे बऱ्याच जणांना या समस्येला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे या समस्येला तोंड देण्यासाठी आहारामध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमयुक्त पदार्थांचा समावेश करणे फायद्याचे ठरू शकते.

पाहूयात कोणते आहेत ते पदार्थ ?

पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम युक्त पदार्थ : लिंबू, संत्री, हिरव्या पालेभाज्या, चवळी, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बया, अळशीच्या बिया, स्ट्रॉबेरी, गाजर ,टोमॅटो, दही, बटाटा, किवी.

अतिजास्त झोप येणे किंवा अशक्तपणा :

गणपतीच्या काळात अतिजास्त प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्याने शरिराला त्याची सवय लागते. त्यामुळे, बाप्पा निघून गेल्यानंतर शरिराला असे गोड पदार्थ सातत्याने मिळाले नाही तर थकवा वाटून झोप येऊ शकते. त्यामुळे अशावेळी सफरचंद, पेर, पेरू, अननस, किवी यांसारखी फळे खाल्ल्याने फायदा होऊ शकतो.

कारण, या फळांमध्ये साखरेसोबत फायबरचे प्रमाण देखील असते. त्यामुळे ही फळे तुमची भूक भागवण्यासोबत शरिराला हवी असलेली साखर देखील पुरवतात. ज्यामुळे तुमचा अशक्तपणा दूर व्हायला मदत होते.

एकंदरीतच गणपतीच्या काळात बिघडलेल्या खाण्याच्या सवयी सुधारण्यासाठी बराच काळ जाऊ शकतो. परंतु, जर आहारात योग्य ते बदल योग्य वेळी केले तर, कदाचीत वरील सर्व परिणामांपासून तुमची लवकरात लवकर सुटका होऊ शकते.

(वरील सर्व उपाययोजना या सर्वसमावेशक असून, ही कुठल्याही आजाराची/ लक्षणांची फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट नाही. लेखक आहारतज्ज्ञ असून मातापोषण आणि बालकांची वाढ या विषयावर संशोधन करत आहेत. )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT