Suvarna dhanorkar donate long healthy  Sakal
लाइफस्टाइल

Donate Hair For Cancer Patients: कॅन्सरग्रस्त महिलांनाही सुंदर दिसण्याचा सुकेशिणी होण्याचा अधिकार, साम वृत्तनिवेदिकेने केले केशदान

सकाळ वृत्तसेवा

Donate Hair For Cancer Patients: सध्याच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार निर्माण होत आहेत. त्यात एक गंभीर आजार म्हणजे कॅन्सर आहे. यामध्ये डोक्यावरचेच नाही तर अंगावरचे केसही गळतात. आजाराने शरीर पोखरत असतानाच डोक्यावरचे झडणारे केस आत्मविश्वास कमी करत जातात. मनही पोखरतात. काहींच्या मनात फक्त त्या गळलेल्या केसांमुळे आत्महत्येचा विचारही येतो. खरंच, काय मानसिक स्थिती होत असेल हातात येणारे केस पाहुन.

चीनी कममधली तब्बु आठवते? अमिताभच्या हॉटेलमधून बाहेर पडली की टर्नवर जाताच लांबसडक केसांना एक छान झटका देऊन मागे वळून बघते. अमिताभला एक प्रेमळ लूक देते आणि पुढे जाते. ती लांब केसांची तब्बू 'तिला' प्रचंड आवडलेली. मुलगी असून 'तिला' जर ती आवडली तर मग मुलांना किती आवडली असेल विचार करा.

कुठल्याही मुलाला लग्नासाठी कशी मुलगी हवी विचारा, एकवेळ गोरी मुलगी हवी असं म्हणणार नाही, पण लांब केसांची मुलगी हवी म्हणणारच... यातून मुलींचे लांब केस तिच्यासाठी आणि तिच्याकडे पाहणा-या प्रत्येकासाठी किती महत्त्वाचे ते लक्षात येतच. (म्हणूनच पूर्वी पतीच्या निधनानंतर केशवपन करत. त्या स्त्रिला विद्रूप करत) पण ज्यांच्या डोक्यावरचे केस क्षणाक्षणाला गळून पडतात त्यांचं काय...

महिलांच खरं सौंदर्य तिच्या केसांमध्ये असते. केसच नसेल तर ती विद्रुप होते असा सर्वसाधारण समज आहे. यामुळेच कदाचित कुठलीही महिला केस कापणे टाळते. टकले पुरूष डोळ्यांना सरावलेयत. पण टकल्या महिला नाहीच. म्हणूनच या कॅन्सरग्रस्त मुलींसाठी महिलांसाठी 'तिनं' केशदानाचा निर्णय घेतला. 'तिला' वाटलं किती सुंदर दिसतो आपण लांब केसांमध्ये आणि ते केस मोकळे ठेवले की आपलं सौंदृर्य आणखीनच खुलतं.

पण एक दिवस असंच स्वत: आरशात न्याहाळताना जाणवलं प्रत्येकीच्या वाट्याला हे सौंदर्य येतं का...धडधड वाढली. मन भरून आलं. अचानक आठवलं आपल्या एका मैत्रिणीला कॅन्सर झाला आहे. आणखी एका मैत्रिणीच्या आईला केमो थेरिपी सुरु आहे. एका सहका-याची बायको कॅन्सरनं गेली. ही लिस्ट वाढत होती आणि या सगळ्यांसाठी काहीतरी करावं असं वाटलं. एका मैत्रिणीच्या आईनं केमोनंतर विग घेतला. तो लावताना तिचे डोळे भरून यायचे. पण जुनाच आत्मविश्वास तिच्या चेह-यावर झळकत होता.

आपल्या पुण्याच्या दिवंगत माजी महापौर मुक्ता टिळक केमोनं केस गेल्यामुळे त्याही विग लावत होत्या. पण ज्या गरीब महिला किंवा मुली असतील, त्यांचं काय? त्यांना हे विग परवडणारे आहेत का? उत्तर शोधलं तर कळलं नाही. किमान 20-25 हजारापर्यंत विग मिळतो. वर त्याचा मेंटंनन्स... खर्चिक उपचारांसोबत हा खर्च कसा परवडणार आहे का? म्हणून 'तिच्या' मनात आलं आपण आपले केसचं दान करुया. एखाद्या अनोळखी मुलीच्या डोक्यावर हा विग चढला की तिचा आत्मविश्वास वाढेल, तिचा चेहरा खुलून जाईल या विचारानं ती हरखून गेली. तिचा निर्णय पक्का झाला.

ऍप्रोच हेल्पिंग हॅन्डस् फाऊंडेशनमध्ये संपर्क साधला. या संस्थेनं 2016 पासून गोरगरीब कॅन्सरग्रस्तांसाठी मोफत विग बनवून द्यायला सुरुवात केली. म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. आजवर केवळ 125 जणींनी केशदान केलं आहे. त्यातून 30 विग तयार करून गोरगरीब गरजुंपर्यंत पोहचले आहेत. पण कॅन्सरग्रस्तांचा आकडा आणि केशदान करणाऱ्यांचा आकडा यात खुप तफावत आहे. ही तफावत दूर करायची तर लांब केस असणाऱ्या महिलांमध्ये जागृतीची गरज आहे. नवऱ्याला 'तिनं' इच्छा बोलून दाखवली. त्याचा प्रश्न 'हे करायलाच हवं का? इतके लांब केस कापणार तू...? इतर काही वस्तुरुपात दान कर..' 'तिचं' उत्तर 'सगळंच दान करता येईल मनात आल्यावर. पण केशदान रोज करता येण्यासारखं नाही... आणि यासाठी पटकन कुणी धजावणारही नाही. प्रवाहाच्या विरोधात जाऊन काहीतरी करायचंय आणि ते इतरांनीही करावं म्हणून त्यांना तयार करायचंय.’ नवऱ्याला मुद्दा पटला. पण एक अडचण होतीच.' गेली 19 ते 20 वर्ष आपल्याला स्क्रीनवर पाहणारे लोक डोक्यावर केस नसलेली अँकर पाहतील का...?’ म्हणून लागलीच सरांची भेट घेतली त्यांना इच्छा बोलून दाखवली त्यावेळी त्यांचा पहिलाच प्रश्न 'कशाला...?’ मग त्यांना मुद्दा पटवून दिल्यावर त्यांनीही होकार दिला.

केशदानासाठी केसांची लांबी किमान 13 इंच असावी लागते. 'तिचे' केस 14 इंच होते. 13 पैकी एक ते दीड इंच केस विगसाठी बेसमध्ये टाचले जातात. खालचे केस लहान मोठे असतील ते नीट सरळ कापून मग वापरता येतात. एका विगसाठी किमान 3 जणींचे केस लागतात. त्यातही प्रत्येकीच्या केसांचा पोत वेगवेगळा त्यामुळे जवळपास सारखे केस मिळेपर्यंत विग बनवता येत नाही. पण एकदा विग बनला की तो किमान 15 वर्ष टिकतो. ऍपरोच हेल्पिंग हॅन्ड्स फाऊंडेशननं पुण्यातल्या पैपिलोना कंपनीशी करार केला. त्यांच्याकडून गरीबांसाठी सबसिडाईज्ड रेटवर विग बनवून दिले जातात. मग ते फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोहचतात. कधीकधी काही विग हे कस्टमाईज्ड असतात. त्यांच्याकडून विगसाठी संस्था पैसे घेते.

इकडे दादरच्या नॅशनल हेअरक्राफ्ट सलूनमध्ये केशदानाची सगळी तयारी झाली. तो क्षण आला आणि 'तिची' हुरहुर वाढली. हेअर एक्सपर्ट तुषार चव्हाण यांनी चांगलीच दिसशील असा विश्वास दिला. येवडचं नाही तर यासाठी त्यांनीही खारीचा वाटा उचलला. एक रुपयाही न घेता दोन अडीच तास वेळ देऊन मोफत केस कापून दिले. हे सगळं होत असतानाही ती सहज वावरत होती पण 'पूर्ण केस काढल्यावर कसे दिसू आपण...?’ हा विचार मनात होता.

लगेच त्या सगळ्या अनोळखी मुली दिसल्या 'तिला' वाटलं त्या 'तिच्याच' लांब केसांकडे बघतायत. मन भरून आलं. डोळ्यांच्या कडा ओलावल्या. एक एक बट कापणं सुरु होतं. ज्यावेळी सगळ्या बटा कापून झाल्या 'तिला' खूप हलकं वाटलं. आपण समाजाचं देणं लागत असताना नेहमी वस्तू रुपात काही ना काही गरजुंपर्यंत पोहचवतो. पण आज आपण जे केलंय ते फार वेगळं आहे हे 'तिच्या' लक्षात आलं.

यावर मित्रमैत्रिणी, कुटुंबियांच्या प्रतिक्रिया खूप विचित्र किंवा अगदीच शॉकिंग असतील याची 'तिला' जाणीव होती पण 'ती' खुश होती. 'ती' आणि आणखी एक दोन जणींनी केशदान केले की एक छानसा विग तयार होईल आणि एका मुलीच्या डोक्यावर तो चढेल. तिचं सौंदर्य आणखी खुलेल. तिचा आत्मविश्वास वाढेल. शाळेत/कॉलेजमध्ये जाताना ती पुन्हा आनंदान केस विंचरेल आणि घरातून बाहेर पडेल त्यावेळी तिचं सौंदर्यही सर्वजण न्याहाळतील. ज्यांचे हे केस, त्यांना ती मनोमन धन्यवाद देईल.

हे सगळे विचार 'तिच्या' मनात येत होते. त्याचवेळी तिरुपतीला होणारं केशदान आठवलं. तिरुपतीला रोज टनांनी केस दान होतात. ते खरंच गरजुंसाठी कितपत उपयोगात येत असतील. म्हणून ऍप्रोच हेल्पिंग हॅन्डस् सारख्या संस्था आणि केशदानंही महत्त्वाच वाटते.

इतका वेळ तुम्ही विचार करत असाल ही 'ती' कोण... ही 'तीच' जी रोज सकाळी तुमच्यापर्यंत साम टीव्हीच्या माध्यमातून बातम्या घेऊन येते... सुवर्णा धानोरकर.

सुवर्णाचं तुम्हा सर्वांना सकाळ ग्रुपच्या माध्यमातून आवाहन आहे, शक्य असल्यास तुम्हीही केशदान करा. एखाद्या गरीब कॅन्सरग्रस्त मुलीपर्यंत त्याचा विग पोहचू द्या... कारण प्रत्येकीला सुंदर दिसण्याचा सुकेशिणी होण्याचा अधिकार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: अचानक आलेल्या पावसानं पुण्याला झोडपलं! दसऱ्याच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची त्रेधातिरपीट

Sayaji Shinde: अभिनेता ते नेता! सयाजी शिंदेंचा दरारा आता राजकारणातही; राष्ट्रवादीत झाला दणक्यात प्रवेश

Prathamesh Parab : लेक एवढा मोठा स्टार असून प्रथमेशचे वडील अजूनही करतात हे काम ; "घरची परिस्थिती हलाखीची तरीही..."

Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणीचा अर्ज मिस झाला? हरकत नाही, मुदत आणखी वाढलीए! जाणून घ्या नवी तारीख

Santosh Juvekar: भूमिकेसाठी काय पण! संतोष जुवेकरचा ‘रानटी’ चित्रपटातील खतरनाक अंदाज; लूक व्हायरल

SCROLL FOR NEXT