- क्रांती रेडकर
छंद म्हणून सांगायचं झालं तर मला जगातले वेगवेगळ्या भाषांमधले, वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे, डॉक्युमेंटरी पाहायला खूप आवडतं. मला त्यातून खूप काही शिकायला मिळतं. ते माझ्यासाठी शाळेत जाऊन बसण्यासारखं आहे. ती कलाकृती कशी बनवली आहे, तिच्यामागे काय मेहनत आहे, ती तांत्रिकदृष्ट्या कशी बनवली आहे, त्यासाठी काम करणाऱ्यांची नावं काय आहेत हे सगळं मी आवर्जून पाहते. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त आनंद ही गोष्ट देते. हा फक्त छंद नसून माझं काम, माझं पॅशनही आहे.
मी याबाबतीत भाषेचं बंधन घालून घेत नाही. कुठल्याही कलाकृतीसाठी भाषा कधीच अडथळा ठरत नाही. तुम्ही स्वीडिश, स्पॅनिश किंवा कोणत्याही परकीय भाषेतला चित्रपट पाहता, तेव्हा तुम्ही सबटायटल्स वाचत असता; पण एका क्षणी तुम्हाला सबटायटल्स न वाचताही चित्रपटात काय चाललंय हे कळू लागतं, भावना कळू लागतात. त्या सीनची निर्मितीच अशी असते, की त्यातल्या भावना समजून घेण्यासाठी भाषेची गरज पडत नाही.
परदेशातले लोक बहुतांश वास्तववादी विषयांना, नव्या विषयांना कसे हात घालतात हे पाहण्यासारखं आहे आणि हे मी फक्त चित्रपटच नव्हे, तर डॉक्युसिरीजबद्दलही बोलत आहे. मी बऱ्याच भाषांमधल्या सिरीज पाहिल्या आहेत. आजकाल बहुतांश कन्टेन्ट डब झालेला असतो. त्यामुळे हा अनुभव आणखी सोपा झाला आहे.
या छंदामुळे मला अनेक माणसं भेटली आहेत. या सिरीजमधली, चित्रपटांतली पात्रं जवळची वाटू लागतात. पूर्वी वाचनावर अधिक भर असायचा; पण हल्ली दृश्य माध्यमातून तुम्हाला भरपूर ज्ञान, माहिती मिळत आहे. वाचनात आपल्याला कल्पनाशक्ती वापरावी लागते. एका ओळीवरून तुम्हाला तो संपूर्ण सीन, ती परिस्थिती काय असेल याचा विचार करावा लागतो.
एखादा पुरुष देखणा आहे, असं वाक्य लिहिलेलं असेल, तर प्रत्येकजण आपापल्या कल्पनाशक्तीप्रमाणे देखणा म्हणजे काय हे ठरवतो; पण चित्रपटांमध्ये कोणीतरी विचार करून ते आपल्यासाठी मांडलेलं आहे. त्यामुळे तिथे आपल्या मेंदूचं काम थोडं सोपं झालं आहे, असं मला वाटतं. तसंच हे फारसं वेळखाऊही नसतं. तुम्हाला जसा वेळ आहे, तेव्हा तुम्ही पाहू शकता. त्यामुळे वेगवेगळी माणसं, जागा, वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात, हे मला आवडतं.
मला लहानपणापासूनच चित्रपट, मालिका पाहण्याची आवड होती. मला आधीपासूनच गॉसिपिंग आवडत नाही. टाईमपास म्हणून मैत्रिणींना फोन करून तासन् तास बोलत बसलेय, असं मला कधीच आवडलं नाही. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा मी चित्रपट, मालिका पाहत होते. मला एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायला, जाणून घ्यायला आवडतं. डोक्यात सतत कुतूहल असतं. एखादी गोष्ट कळली, तर तिच्याविषयी मी खोदून खोदून माहिती घेते.
मला चित्रपट क्षेत्रातलं तांत्रिक ज्ञान बऱ्यापैकी आहे. म्हणजे कोणता कॅमेरा, फिल्म वापरली आहे, निर्मितीत किती पैसे खर्च होतात वगैरे गणितं आधीपासूनच माहीत होती. माझा पहिला चित्रपट मी दिग्दर्शित केला तेव्हाच मला याबद्दल सगळी माहिती होती. पहिल्यापासूनच मला चित्रपट बनवण्यात, लिखाणात रस असल्यामुळे मी ते सगळं जाणून घेत गेले, करत गेले आणि त्यातून शिकत गेले. आता मी ज्या कलाकृती पाहते, त्यातूनही मी हेच शिकत असते.
अर्थात या व्यक्तीनं हा शॉट असा घेतलाय म्हणून मीही तसाच घेईन असं मी करत नाही. मी प्रेरणा घेते. मी कदाचित कधीच माझ्या सिनेमात ती गोष्ट वापरणार नाही; पण ही व्यक्ती अशा पद्धतीचं काम करू शकते, तर आपण का करू शकत नाही, त्यासाठी आपण काय करू शकतो, याचा मी विचार करत असते. कल्पनाशक्ती रुंदावण्याचा, काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न मी करत असते.
मला अवाक् करणारा, तांत्रिक बाजूनंही आवडलेला चित्रपट म्हणजे ‘टायटॅनिक’. तो चित्रपट ही प्रत्येक बाजूनं उत्तम कलाकृती आहे. स्टिव्हन स्पीलबर्ग यांचे सगळेच चित्रपट मला आवडतात. त्यांच्या सिनेमानंतर मला असं वाटलं, की फिल्ममेकिंग काहीतरी जादू आहे आणि आपण त्यात गेलं पाहिजे. गुरुदत्त साहेबांचेही सगळे सिनेमे माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. ते स्वतः चित्रपट एडिट करायचे.
माझा ‘कांकण’ हा चित्रपट एडिट होत होता, तेव्हा मला कळलं, की त्याच टेबलवर गुरुदत्त एडिटिंग करायचे. मी त्या टेबलला भारावून जाऊन स्पर्शही केला. तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असू द्या, अशीच भावना माझ्या मनात होती आणि ‘कांकण’ चित्रपटाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं आणि मी भारावून गेले. या वर्षात माझे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्याची लवकरच घोषणा होईल.
(शब्दांकन : वैष्णवी कारंजकर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.