Pola 2023 : शेतकऱ्यांसोबत वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा होय. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आवतन देण्यात येते. या दिवशी बैलाला नदी,तलाव अथवा खरी आंघोळ घालण्यात येते.
वर्षभर ज्या खांद्यावर भार वाहतो तो खांदा तुप-हळदी लावत नरम केल्या जातो. तसेच त्याला साज चढविला जातो. त्यामुळे बुधवारी(ता.१३) घरोघरी ‘आज आवतन घ्या..उद्या जेवायला या’ असा सांगावा कानी पडतो.
मुक्या जिवाला सुद्धा मायेचा ओलावा देणाऱ्या या संस्कृतीने माणूसपण जपलं आहे. अशा कृषी संस्कृतीचा सर्वोच्च आनंद ‘पोळा’ या सणाच्या अनुभवायला मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या मित्र असणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. येत्या गुरुवारी हा सण सर्वत्र उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे.या सणानिमित्त शेतकरी आठवडाभर तयारी करून मोठ्या उत्साहात सण साजरा करतात.
पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. ओढा वा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात.
त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवतात.व सजावट करून त्याला नवरदेव बनवून पोळ्यातील तोरणाखाली नेला जातो. (Bail Pola Festival)
गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस ‘झडत्या’ म्हणजेच पोळा सणाची गीते म्हणायची पद्धत आहे.
तोरणातून आल्यावर धन्याची मालकीण राशी मांडते व त्या राशीवर नैवेद्य ठेवून सर्जा राजाला भरवला जातो.
पूर्वीच्या काळात गावातील प्रत्येक शेतकऱ्यांकडे बैलजोडी असे. गेल्या दहा-पंधरा वर्षाच्या काळात गोधन मोठ्या प्रमाणात नामशेष होत चालले. यांत्रिकीकरणाचा हा परिणाम असून कृषी संस्कृतीच्या मुळावरच घाव घातल्या जात आहे.
गोधन संपत असल्याने बैलांची संख्या कमी झाली आहे. १५ ते २० हजार लोकवस्तीच्या गावात बैलजोडीची संख्या बोटावर मोजण्या इतकी झाली आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीचे कामे सुलभ झाले असले तरी मुक्या जीवाविषयीचा ओलावा कमी होत असल्याचे दिसत आहे. (Culture)
- जितेंद्र वाटकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.