हल्ली नवीन वाहन बाजारात दाखल करण्यापूर्वी त्यांची ‘क्रॅश टेस्ट’ केली जाते. संबंधित वाहन सर्व अंगांनी किती सुरक्षित आहे, त्यानुसार एक ते पाच यामध्ये ‘रेटिंग’ मिळते. भारतातील वाहनांची यापूर्वी ‘ग्लोबल न्यू कार ॲसेसमेंट प्रोग्राम’अंतर्गत (जी-एनसीएपी) क्रॅश टेस्ट घेतली जात होती. ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे; परंतु आता स्वदेशी अशा ‘भारत न्यू कार ॲसेसमेंट प्रोग्राम’चा (बी-एनसीएपी) पर्यायही उपलब्ध झाला आहे.
वाहनांचे सेफ्टी रेटिंग ‘क्रॅश टेस्ट’द्वारे दिले जाते. यात कार ठराविक वेगात धडकल्यानंतर कारमधील एअरबॅग, ईबीडी (इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन), स्पीड अलर्ट आणि सेफ्टी बेल्ट यासारखी अनेक फीचर्स तपासली जातात. भारतातील वाहनांची ‘भारत न्यू कार अॅसेसमेंट प्रोग्राम’द्वारे क्रॅश टेस्ट केली जाणार आहे. हा ऐच्छिक कार्यक्रम असून, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या टेस्टचा कालच प्रारंभ झाला.
‘भारत एनकॅप’ची रचना ‘ग्लोबल एनकॅप प्रोटोकॉल’ आणि ‘युरो एनकॅप’च्या आधारे केली आहे. भारतातील कार निर्माते नवीन ‘भारत एनकॅप’अंतर्गत मोटर उद्योग मानांकनाच्या (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड-एआयएस) १९७ नुसार आपापली वाहने क्रॅश टेस्टसाठी देऊ शकतात. या कार्यक्रमात अधिक पारदर्शकता येण्यासाठी ‘भारत एनकॅप’ला भारतात उत्पादित होणाऱ्या किंवा बाहेर देशातून आयात होणाऱ्या कार क्रॅश टेस्टसाठी निवडण्याचा अधिकारही असणार आहे.
‘भारत एनकॅप’मध्ये ‘थ्री-स्टार’ किंवा त्याहून अधिक रेटिंग मिळवण्यासाठी मानक म्हणून कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ईएससी) असणे आवश्यक आहे. याद्वारे देशात सुरक्षित कारची मागणी वाढेल, असा दावा आता रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने (एमओआरटीएच) केला आहे.
रस्ते वाहतूक मंत्रालयाने देशात कारची क्रॅश टेस्ट घेण्यासाठी आणि त्यांना रेटिंग देण्यासाठी निकष ठेवले आहेत. हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर वाहन निर्माते चाचणीच्या आधारे संबंधित कारला सेफ्टी रेटिंग देतील, त्यामुळे कार खरेदी करणे सोयीस्कर होणार आहे. ऑटोमेटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया बीएनकॅपसाठी परीक्षणाचे काम पाहतील.
अशी होणार तपासणी
कार धडकताच तात्काळ एअरबॅग उघडली की नाही, हे तपासले जाईल. डमी प्रवासी पाहून त्याच्या नुकसानीचा अंदाज घेतला जाईल. तसेच कारची इतर सुरक्षा फीचर्सही तपासली जातील. या फीचर्समुळे प्रवाशांचे किती संरक्षण झाले, हे पाहून त्या आधारे कारचे रेटिंग ठरवले जाणार आहे. एकूणच कारची चाचणी विविध अंगांनी होऊन त्यात वयस्क आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी रेटिंग दिले जाईल.
वाहन जगतातून स्वागत
‘‘केंद्र सरकारने वाहनांच्या सुरक्षा नियमांवर आणि धोरणांवर अधिक भर दिल्याचे आम्ही कौतुक करतो. बीएनकॅप हे सरकारने योग्य दिशेने पाऊल आहे,’’ असे स्कोडा ऑटो इंडियाचे संचालक पेट्र सॉल्क यांनी सांगितले. बीएनकॅपद्वारे भारतीय रस्ते सर्वांत सुरक्षित होतील, असा विश्वास ह्युंदाई मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी उन्सू किम यांनी व्यक्त केला आहे.
‘बीएनकॅप’ दृष्टिक्षेपात
कोण राबवणार : केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था (सीआयआरटी)
क्षमता : ३.५ टनापर्यंतचे वाहन
वाहने कोणती : एम-१ श्रेणी (चालकासह ९ आसन असलेले वाहन)
काय तपासणार : स्ट्रक्चरल इंटिग्रिटी (संरचनात्मक बांधणी), ॲडल्ट ऑक्युपन्ट सेफ्टी (प्रौढ सुरक्षा), चाईल्ड ऑक्युपंट सेफ्टी (लहान मुलांची सुरक्षा)आणि सेफ्टी असिस्ट टेक्नॉलॉजी (साह्यक सुरक्षा तंत्रज्ञान)
खर्च : ६० लाख रुपये
कधीपासून : १ ऑक्टोबर २०२३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.