टाटा मोटर्सच्या ‘सफारी’ या एसयूव्ही कारने भारतीय बाजारात प्रवेश केला, तेव्हा तत्सम प्रकारातील फारशा कार उपलब्ध नव्हत्या.
टाटा मोटर्सच्या ‘सफारी’ या एसयूव्ही कारने भारतीय बाजारात प्रवेश केला, तेव्हा तत्सम प्रकारातील फारशा कार उपलब्ध नव्हत्या. तेव्हा टाटा ही कंपनी सुमो, सिएरा, इस्टेट या कारसाठीच ओळखली जात होती. १९९८मध्ये सफारीची एन्ट्री झाल्यानंतर वाहन बाजारात एकप्रकारे तेजी आली. त्या वेळी सफारी इतर उपलब्ध कारपेक्षा वेगळ्या धाटणीची दिसत असल्याने ती अल्पावधीतच लोकप्रिय झाली. गेल्या सुमारे अडीच दशकात या सफारीत अनेक बदल झाले, तरी तिची लोकप्रियता आजही कायम आहे.
सफारी फर्स्ट जनरेशनमध्ये ५ स्पीड, २ लिटर डिझेल इंजिन येत होते. यामध्ये फोर व्हील ड्राईव्हचा पर्याय होता. या सफारीची तेव्हा एकूणच रस्त्यावरील उपस्थिती, दणकट कामगिरी कारप्रेमींच्या मनात घर करू लागली. एखाद्या कारमध्ये दरवाजा उघडल्यानंतर थेट बसता येत होते. परंतु सफारीमध्ये पायरीवर चढूनच आत बसावे लागत असल्याने या कारबद्दल अधिक अप्रूप वाटू लागले. सफारीची किंमत त्यावेळी ८ लाख २५ हजार होती. २००३मध्ये टाटाने सफारी २.१ लिटर नॅचरली ॲस्पिरेटेड ४ सिलिंडर पेट्रोल इंजिनसह बाजारात आणली, परंतु तिला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
टाटाने २००५मध्ये ‘सफारी डायकॉर’ बाजारात आणली. अर्थातच, या सफारीच्या बाह्य आणि अंतर्गत भागात थोडे बदल करण्यात आले होते. या कारची किंमतही ६.५० ते ७ लाख रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आली. टाटाने २००७मध्ये सफारी अपग्रेड करत हेडलॅम्प, पुढील ग्रील, इंटिरिअरमध्ये बदल केले. डायकॉरच्या स्पेशल एडिशनमध्ये पाठीमागील सीटवर छोटा रेफ्रिजरेटर आणि इनबिल्ट सोनी प्ले स्टेशन देण्यात आला. सफारी डायकॉरमध्ये २००७मध्येच नवीन २.२ लिटर डिझेल इंजिन देण्यात आले.
डायकॉरनंतर स्टॉर्म...
1) २०१२ च्या ऑटो एक्सपोमध्ये टाटाने ‘सफारी स्टॉर्म’ सादर केली. डायकॉरपेक्षा अधिक शार्प, वाढलेली लांबी, आकर्षक इंटेरिअर असलेल्या या सफारीमध्ये ५ स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स, २.२ लिटर व्हॅरिको डिझेल इंजिन देण्यात आले. २०१५ला सफारी स्टॉर्म नवीन ग्रील, इंटिरिअरसह अपग्रेड करण्यात आली.
2) २०१५ च्या अखेरीस सफारी स्टॉर्मचे ‘व्हॅरिकोर ४००’ हे व्हेरिएंट बाजारात आणले. त्यानंतर २०१७मध्ये डायकॉरचे उत्पादन थांबवण्यात आले. केवळ स्टॉर्मचेच उत्पादन आणि विक्री होऊ लागली. २०१८मध्ये सफारी स्टॉर्ममध्ये अपग्रेडेशन केले. यातील टॉप व्हेरिएंटमध्ये १७ इंची टायर देण्यात आले. त्यानंतर २०२०मध्ये टाटाने स्टॉर्मचे उत्पादनही थांबवले.
नव्या रूपात दमदार एन्ट्री
1) फेब्रुवारी २०२१मध्ये टाटाने सफारी एकदम नव्या रूपात दाखल केली. नवीन पिढीला साजेसा लुक, आधुनिक फीचर्स, सुरक्षिततेची पुरेपूर खबरदारी घेत ही सफारी लाँच करण्यात आली. त्याचबरोबरीने सफारीचे अँडव्हेंचर आणि पर्सोना हे व्हेरिएंटदेखील दाखल झाले. यात क्रोमऐवजी काळ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे.
2) सफारीचे सुमारे १६ व्हेरिएंट असून, तिची एक्स शोरूम किंमत १४.९९ ते २२ लाखादरम्यान आहे. यामध्ये ६ आणि ७ असे दोन आसन पर्याय आहेत. तसेच १९५६ सीसी क्षमतेचे ४ सिलिंडर, २.० लिटर क्रायोटेक टर्बोचार्ज डिझेल इंजिन दिले आहे.
3) टाटा सफारीमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सहा एअर बॅग, अँटी लॉक ब्रेक सिस्टिम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन, ट्रॅक्शन कंट्रोल, ब्रेक असिस्ट, कॉर्नर स्टॅबिलीटी कंट्रोल, पार्किंग सेन्सर आदी फीचर्स दिले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.