नागपूर : आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण शेकडो प्रकारचे रंग बघत असतो. हे रंग आपल्या जीवनात एक नवी भूमिका बजावत असतात. आपल्या मूडवर या रंगांचा बहुतांशी परिणाम होत असतो. इतकंच नव्हे तर रंगांचा आपल्या बघण्यावर, बोलण्यावर आणि भावनांवरही परिणाम होत असतो. उदाहरण द्यायचं झाल्यास लाल रंग हा रागाचं किंवा द्वेषाचं प्रतीक आहे, काळा रंग निषेधाचं प्रतीक आहे तर पांढरा रंग शांततेचं प्रतीक आहे. तसंच गुलाबी रंगाचंही स्वतःचं एक प्रतीक आहे. गुलाबी रंग बघताच तुम्हाला कसं वाटतं किंवा गुलाबी रंग बघताच तुमच्या मनात नक्की कोणत्या भावना येतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
साधारणतः गुलाबी रंग हा प्रेमाची भावना किंवा नम्रपणा दर्शवतो. गुलाबी रंग हा स्त्रियांशी निगडित आहे किंवा गुलाबी रंग समोर आला कि रोमॅंटिक किंवा 'व्हॅलेंटाईन डे'सारखं वातावरण निर्माण होतं असं काही लोक म्हणतात, तर काही लोकांना हा रंग शांतता किंवा आरामाचं प्रतीक वाटतो.
खरंतर गुलाबी रंग म्हणजे कोवळ्या लाल रंगाची छटा असते. गुलाबी रंग हा प्रेमाचा आणि रोमांसचा रंग मानला जातो. लहानपणी मुलींची खेळणी गुलाबी रंगाची असायची आणि मुलांची खेळणी ही लाल, पिवळी किंवा हिरवी असायची म्हणूनच गुलाबी रंगाला मुलींचा रंग किंवा स्त्रियांचा रंग असं म्हंटलं जात होते. म्हणजेच गुलाबी रंग हा मृदुलतेचं किंवा नम्रतेचं प्रतीक आहे असं म्हंटलं जातं. कधी कधी आपल्या विरोधात असलेल्या संघाच्या लॉकर्सला गुलाबी रंग दिला जातो. ज्यामुळे त्यांच्यातली शक्ती कमी होईल आणि एनर्जीही कमी होईल.
गुलाबी रंग नेमकं काय दर्शवतो?
प्रत्येक व्यक्तीचा कुठल्याही रंगाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. हा दृष्टिकोन त्यांच्या स्वतःच्या अनुभवांवरून किंवा संस्कृतीकडून आला असतो. कधीकधी व्यक्तीच्या भूतकाळाशी सुद्धा रंगाचा संबंध असू शकतो. म्हणजेच एखाद्या गुलाबी रंग आवडणाऱ्या व्यक्तीच्या काही आठवणी किंवा भावना त्या रंगाशी निगडित असू शकतात. तसंच ज्यांना हा रंग आवडत नाही त्यांना या काही वाईट अनुभव आला असण्याची शक्यता असू शकते.
पण तुम्हाला गुलाबी रंग कसा वाटतो? तुम्ही गुलाबी रंग बघितल्यानंतर कुठल्या भावना अनुभवल्या आहेत? याबद्दल काही लोकांनी काही वर्षांतील त्यांचा अनुभव आम्हाला सांगितला आहे.
आनंददायक -
काही लोकांच्या म्हणण्यानुसार गुलाबी रंग हा आनंदाचं प्रतीक आहे. गुलाबी रंग बघितल्यानंतर त्यांना शांत, आनंदी आणि समस्या नसलेलं आयुष्य जाणवतं. तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधीच जाणवत नाही असंही काही लोकं सांगतात.
सर्जनशील -
गुलाबी रंग नेहमी तुम्हाला तुम्ही कलाकार आहात आणि सर्जनशील आहेत असा भास करवून देतो असं काही लोक सांगतात. अभ्यासाच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी गुलाबी रंग लावल्यामुळे नेहमी एनर्जी असते आणि सर्जनशीलता निर्माण होते असंही काहींचं मत आहे.
व्हायब्रंट आणि स्त्रियांना आकर्षित करणारा -
गुलाबी रंग नेहमीच स्त्रियांना आकर्षित करतो. स्त्रीचं वय काहीही असो तरी त्यांना गुलाबी रंग आवडतोच. म्हणूनच स्त्रियांच्या कामाच्या सर्व वस्तू या गुलाबी रंगातच उपलध असतात. तसंच काही स्त्रियांना गुलाबी रंग व्हायब्रंट वाटतो. ज्यामुळे त्यांचं सौंदर्य अधिक खुलतं.
बालिश -
काही लोंकांना गुलाबी रंग हा बालिश वाटतो. वयानं, पदानं कितीही मोठी व्यक्ती असो जर त्यांनी गुलाबी रंगाचे कपडे घातले असतील तर ती व्यक्ती बालिश वाटते असं अनेकांचं मत आहे.
रिफ्रेशिंग -
गुलाबी रंग बघिल्यानंतर अनेकांना रेफ्रेशिंग वाटतं म्हणजे अंगातील संपूर्ण थकवा एका क्षणात निघून जातो असं काही लोकं सांगतात. तर काही लोकांच्या समस्याही दूर होतात.
उत्साही -
अनेक लोकांना गुलाबी रंग बघितल्यानंतर उत्साही असल्यासारखं वाटतं. काही लोकांच्या म्हणण्यानुसार फिका गुलाबी रंग हा भोळेपणाचं प्रतीक आहे तर गडद गुलाबी रंग हा बोल्ड आणि स्टायलिश दिसण्याचं प्रतीक आहे.
एकूणच काय तर गुलाबी रंग बघून प्रत्येक व्यक्तीच्या मनात निरनिराळ्या भावना येऊ शकतात. या भावनांचं प्रमाण ज्याच्या त्याच्या अनुभवांवर अवलंबून आहे.
संकलन व संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.