rani lakshmibai
rani lakshmibai sakal
लाइफस्टाइल

ती एक चिरंतन ‘ज्योती’

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. समीरा गुजर-जोशी

मैत्रिणी, लहानपणी ही कविता तूही पाठ केली असशील ना!

रे हिंदबांधवा, थांब या स्थळी

अश्रू दोन ढाळी,

ती पराक्रमाची ज्योत मावळे

इथे झांशिवाली ll ध्रृ ll

कविवर्य भा. रा. तांबे यांनी लिहिलेल्या कवितेच्या या ओळी म्हणताना कसं स्फुरण चढतं ना! आज झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी आहे. ही पराक्रमाची ज्योत मावळली ती १८ जून १८५८ रोजी. आज त्यांचं स्मरण करत असताना अचानक माझ्याकडे असलेल्या एका पुस्तकाची आठवण झाली. विष्णुभट वरसईकर गोडसे गुरुजी यांनी लिहिलेलं प्रवासवर्णन ‘माझा प्रवास’ हे ते पुस्तक.

या पुस्तकात झाशीच्या राणीशी प्रत्यक्ष भेट झाल्याचं वर्णन गोडसे गुरुजींनी केलं आहे. काही काळ ते झाशीत राहून राणीचे पुरोहित म्हणूनही कार्यरत होते, त्यामुळे राणीसाहेबांची कामाची शैली, दिनक्रम याविषयी त्यांना बरीच माहिती असलेली दिसते. त्यामुळे या पुस्तकातून झाशीच्या राणीविषयीची पुष्कळच माहिती मिळते; पण माझं लक्ष वेधून घेतलं ते झाशीच्या राणीच्या दिनचर्येनं.

एखाद्या राणीचा दिवस कसा असेल, याची आपली कल्पना काय असते? मला तर प्रश्नच पडतो काय काम असेल ना एखाद्या राणीला? राजवाड्यातलं आयुष्य सुखाचं असेल असंच वाटतं ना! पण झाशीच्या राणीची दिनचर्या यापेक्षा अगदीच वेगळी आणि विलक्षण ठरते. या पुस्तकात गोडसे गुरुजी लिहितात,

‘पहाटेस उठून मलखांबासी जावून, दोन घटका कसरत करून, नंतर घोडा मंडळावर धरून (मंडळ = मैदान), लागलीच हत्तीवर बसून हत्तीचा फेरफटका करून, मग स्नान होत असे. स्नान झाले म्हणजे चंदेरी पांढरे पातळ नेसून पांढरी चोळी घालून देवपूजेचे जागेवर येवून, आसनारूढ होवून, भस्म धारण करून तेथेच रूप्याचे तुळशी वृंदावन असे, त्यास वंदन करुन श्री पार्थिव लिंग पूजेस आरंभ होत असे.

गवई गात असता पुराणही त्यातच सुरू असे. एकंदर दीडशे लोकांचे मुजरे घेणे असत. परंतु एखादा कोणी काही कामामुळे न आल्यास दुसरे दिवशी लागलीच त्या ग्रहस्थास असे विचारीत, की ‘काल आपण का आला नव्हता?’

राणीसाहेबांचा व्यायामावर आणि शारीरिक सामर्थ्य कमावण्यावर किती भर असेल याची कल्पना या वर्णनावरून यावी. या व्यायामाला साजेसा खुराकही त्या घेत असत, याचाही उल्लेख पुस्तकात आहे. आपण झाशीच्या राणीची अश्वारूढ प्रतिमा अनेक चित्रांतून पाहिली आहे. पाठीवर लेकरास बांधून युद्धाला निघालेली ही धाडसी आई.

ती शौर्याची मूर्ती आहे यात शंका नाही; पण राणीसाहेबांचं रणांगणात शौर्य गाजवणं हे अचानक, आंतरिक ऊर्मीतून घडलेलं नाही. त्यासाठी मनानं आणि शरीरानं तयार असलेली ती राणी. दिवसाची सुरुवात मल्लखांबाचा सराव, घोडेस्वारी आणि हत्तीवरच्या रपेटीने करणारी राणी आहे ती!

याच पुस्तकात संदर्भ आहे, की त्यावेळी संपूर्ण भारतात घोड्यांची पारख करणं आणि उनाड घोड्यांनाही काबूत आणणे यासाठी श्रीमंत नानासाहेब पेशवे, जयाजी महाराज शिंदे आणि ‘झांसीवाली लक्षुंबाई’ सोडले तर चौथे नाव नाही असा राणी लक्ष्मीबाईंचा लौकिक होता. या संदर्भात एक किस्साही सांगितला आहे, की दोन सारख्याच ताकदीचे वाटणारे घोडे परीक्षेला आले तर राणीसाहेबांनी दोन्ही घोड्यांची परीक्षा केली.

राणीसाहेबांनी एका घोड्यास १२०० रुपये देऊ केले, तर एकास ५० रुपये. सर्वांना आश्चर्य वाटलं, की इतकी तफावत का? तर राणीसाहेबांनी कारण सांगितलं, की दुसऱ्या घोड्यास छातीचं दुखणं आहे. तो लांब पल्ल्याच्या कामास उपयुक्त नाही.

ते घोडे जो विक्रीला घेऊन आला होता त्या विक्रेत्यानं हे कबूल केलं, की हे खरं आहे. उत्तम खुराक दिल्यामुळे दुसरा घोडा तगडा दिसत असला, तरी तो अर्ध्या तासापेक्षा अधिक फिरवला की दमतो. राणीसाहेबांची ही अचूक अश्वपरीक्षा पाहून मात्र तो विक्रेता थक्क झाला.

ही अशी माहिती वाचल्यानंतर मुलींच्या एखाद्या उपक्रमाला - संस्थेला राणी लक्ष्मीबाईंचं नाव देताना ते सार्थ ठरवण्यासाठी किती मेहनत करायला हवी असा विचार मनाला स्पर्शून गेला. राणीसाहेब दरबारातील व्यवहार आत्मविश्वासानं कराच्या. स्वतःचे हुकूम त्या स्वतः ड्राफ्ट करायच्या म्हणजे स्वतः लिहायच्या यावरून त्यांचा administrationचा अभ्यास किती दांडगा असावा हे लक्षात यावं. रोज दीडशे मुजरे घेत असताना कोण आलं, नाही आलं हे ताडू शकणं आणि दुसऱ्या दिवशी त्याची चौकशी करणं यावरूनच राणीसाहेबांचा चाणाक्षपणा ध्यानी यावा.

मैत्रिणी, राणीची ही दिनचर्या आणि आठवणी वाचत असताना सहज विचार आला, की आज राणी लक्ष्मीबाई असत्या, तर जागोजागी सुरू झालेल्या जिम्स (व्यायामशाळा) पाहून सुखावल्या असत्या, की नुसतीच फी भरून नंतर तिकडे न फिरकणाऱ्या मुलींवर रागावल्या असत्या. तुला काय वाटतं? नक्की कळव मला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Wagh Nakh: लंडनमधील वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत?; इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांचा दावा, खरा इतिहास काय?

Kiran Mane : "त्यांच्या आठवणीत वारीत नाचून बेभान होतो"; किरण माने यांनी सांगितली वारीची भावूक आठवण

Jharkhand Floor Test: एकही मत विरोधात न जाता हेमंत सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला; नेमकं काय घडलं?

Ishan Kishan: 'हो, मी ब्रेक घेतला आणि...', अखेर इशान किशनने देशांतर्गत क्रिकेट न खेळण्यावर सोडलं मौन

Mumbai Heavy Rain : मुसळधार पावसामुळे मुंबईची झाली तुंबई; साचलेल्या पाण्यामुळे इंटरनेटवर मीम्सचा आला पूर.!

SCROLL FOR NEXT