savani ravindra sakal
लाइफस्टाइल

समाधानी मातृत्व

मला आईपणाची चाहूल लागली २०२० च्या शेवटी शेवटी. तेव्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात होत होती.

सकाळ वृत्तसेवा

- सावनी रवींद्र

मला आईपणाची चाहूल लागली २०२० च्या शेवटी शेवटी. तेव्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात होत होती; पण तरीही चित्रपटसृष्टी आणि गायनाचे इतर प्रोजेक्ट सुरू असल्यानं माझं गायन सुरू होतं, ज्यामध्ये खासकरून रेकॉर्डिंग्ज होती. माझं ठरलं होतं की, जोपर्यंत मला आई व्हावं, असं मनापासून वाटतं नव्हतं, तोपर्यंत मी आईपणाचा निर्णय घेणार नव्हते.

मी आणि माझा नवरा मानसिकरीत्या सक्षम नाही, तोपर्यंत आई होण्याचा निर्णय आम्हाला घ्यायचा नव्हता. मी मानसिक व शारीरिकरीत्या सक्षम झाले, तेव्हाच आई होण्याचा निर्णय घेतला.

आईपणाची चाहूल लागली, तेव्हा मला स्वतःच्या आरोग्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन कामं करावी लागली. गायकाचं आयुष्य हे टुरिंगसारखं असतं. आज या गावात, तर उद्या त्या गावात परफॉर्म कर, असं गायकाचं आयुष्य असतं. त्यावेळी मला विविध कार्यक्रमांचं नियोजन व ट्रॅव्हलिंग करताना स्वतःची तब्येत सांभाळून व डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सगळं करावं लागलं.

मी चौथ्या-पाचव्या महिन्यात चेन्नईत एका म्युझिक व्हिडिओचे शूटिंग तीन दिवस करू शकले. मला माहीत होतं, की आईपणाची चाहूल लागल्यानंतर आयुष्य बदलणार आहे, हे खरं असलं, तरी माझं बाळ हे माझ्या कामात अडचण नाही, तर ते माझ्या कामाचं कारण असलं पाहिजे, हेच ध्येय ठेवून मी काम करत राहिले.

मी पाच महिन्यांची प्रेग्नंट असताना खूप मोठी आनंदाची घटना घडली ती म्हणजे मला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. तो माझ्या आयुष्यातील अमूल्य क्षण होता. पाचव्या महिन्यापर्यंतची प्रेग्नंसी आणि त्यानंतरचा काळ यांमध्ये खूप फरक होता, कारण राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काम प्रचंड वाढलं होतं. आई तर मी होणारच होते; पण आई होण्यापूर्वीच माझ्या मुलीनं तिचा पायगुण दाखविला होता राष्ट्रीय पुरस्काराच्या निमित्तानं.

आई झाल्यानंतर पहिलं वर्ष खूप आव्हानात्मक गेलं. या काळात झोपमोड होत होती. हे सर्व माहीत असतं; पण त्यातून गेल्याशिवाय आपल्याला वास्तव कळत नाही. त्यावेळच्या एकाकीपणातून स्वतःला सावरण्यासाठी गाणं हाच माझा एकमेव आधार होता. त्यामुळे आई झाल्यानंतर सोळाव्या दिवशी मुलीला घरी ठेवून मी एक तास गाण्याचं रेकॉर्डिंग केलं.

आई झाल्यानंतर मला माझ्या मुलीकडे दुर्लक्ष करायचं नव्हतं, तिची आबाळ करायची नव्हती आणि दुसरीकडे मला माझं करिअर तितक्याच आनंदानं एन्जॉय करायचं होतं. मी गात राहिले नसते, तर कदाचित माझ्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम झाला असता; पण मुलीला त्याचं कारण होऊ दिलं नाही. मी सगळीकडे माझ्या मुलीला घेऊन गेले.

ती सव्वादोन महिन्यांची असताना राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यापासून ते आजपर्यंत मी तिला विविध कार्यक्रमांना व विविध शहरांत घेऊन जाते. या सर्व गोष्टींत माझ्या कुटुंबाची भक्कम साथ मला मिळाली. पती, सासू-सासरे व माझे आई- वडील माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले, त्यामुळे हा काळ खूपच सुसह्य झाला.

करिअरमध्ये पुन्हा जॉइन होताना माझी तारांबळ झाली नाही. कारण, माझं करिअर बंदच झालं नाही. आई झाल्यानंतर सोळाव्या दिवसापासूनच मी रेकॉर्डिंगला सुरुवात केली होती. डिलिव्हरीच्या आदल्या दिवशी मी रेकॉर्डिंग करत होते. मुलगी झाल्यानंतरही सहा महिने ट्रॅव्हल करणं आणि तिला विंगेत ठेवून स्टेजवर गायन करणं अशी कसरत मी केली आहे. हे आव्हानात्मक असलं तरी त्यात वेगळा आनंद व समाधानही होतं.

आई झाल्यानंतर करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला; पण त्याकडे मी सकारात्मकरीत्या पाहते. माझ्या मुलीसमोर मी कसा उत्तम आदर्श बनीन, यासाठी आणखी झटून, मेहनत घेऊन मला काम करायचं आहे. माझी आई गायिका, अभिनेत्री आहे. तिनंही करिअर सांभाळत मला वाढवलं व ती घरात आदर्श ठरली, तसाच आदर्श माझ्या मुलीसमोर ठरण्यासाठी मी प्रयत्न करत आहे.

माझं माहेर व सासर पुण्यात आहे; पण कर्मभूमी मुंबईत आहे. मी गेली १५ वर्षं मुंबईत राहते. माझी मुलगी शार्वीही माझ्याबरोबर मुंबईत राहते. तिला माझ्याबरोबर ठेवणं शक्य नसतं, त्यावेळी तिला पुण्याला आणते. हे सगळं खूप छान पद्धतीने होतं. पोटात असल्यापासून तिनं माझं करिअर पाहिलं आहे. आता तीच मला प्रेरणा देते.

करिअरिस्ट मुलींसाठी टिप्स

  • नवरा व बायको दोघेही मानसिकरीत्या सक्षम होत नाहीत, तोपर्यंत निर्णय घेऊ नये. ज्यावेळी निर्णय ठरेल, त्यावेळी तो आनंदाने स्वीकारा.

  • आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष दिलं पाहिजे. मी नऊही महिने डॉक्टरांच्या सल्ल्याने योगासनं केली. काही अंतर चालायचे. कामंही करायचे.

  • झेपतील तेवढीच कामं करा. जी कामं शक्य होत नसतील तर त्यासाठी दुसऱ्या लोकांची मदत घ्या.

  • प्रेग्नन्सीच्या काळात चांगल्या गोष्टी करा. नकारात्मक गोष्टी पाहू नका, ऐकू नका.

  • नोकरी करणाऱ्या किंवा गृहिणी असणाऱ्या महिलांना तेवढीच आव्हानं असतात. मुलांसमोर उत्तम आदर्श राहण्यासाठी न्यूनगंडाची भावना मनात न आणता काम करत राहा.

  • ऐकावे जनाचे, करावे मनाचे हा मंत्र मी आई होण्यापूर्वी व झाल्यानंतर पाळला. डॉक्टरांचे सल्ले मात्र पाळावेत.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT