- कादंबरी कदम
मला आईपणाची चाहूल लागली, तेव्हा माझ्या इतर काही गोष्टी संपलेल्या होत्या. म्हणजे ‘शेवग्याच्या शेंगा’ नाटक आणि ‘जस्ट अँड ओमन’ हे नाटकदेखील संपलेलं होतं. त्यानंतरच मला कळलं, की मी आई होणार आहे. त्यावेळी मी नवीन कामाच्या शोधात होते आणि सोलो ट्रिपसाठी स्पिती व्हॅलीला गेले होते. मला तेव्हा अजिबात माहिती नव्हतं की, मी प्रेग्नंट आहे.
मी स्पिती फिरून आले, आणि नंतर मला कळलं की मी गर्भवती आहे. म्हणजेच मी आधीच प्रेग्नंट होते आणि तरीही मला तेव्हा काही समजलं नाही. मी एकटी फिरत होते; कारण का माहीत नाही, पण सोलो ट्रिपची खूप इच्छा होती आणि सुदैवाने मला फार काही तडजोड करावी लागली नाही.
माझ्या नवऱ्याचं त्यावेळी खूप चांगलं काम सुरू होतं, त्याची कमाई व्यवस्थित सुरू होती. त्यामुळे मी स्वतः निर्णय घेतला, की आपण आता करिअरमध्ये थोडासा ब्रेक घ्यावा आणि बाळाकडे लक्ष द्यावं. मातृत्व माझ्या आयुष्यात खूप उशिरा आलं होतं, त्यामुळे इतकी वर्षं काम सुरूच होतं आणि आता मातृत्वावरच लक्ष केंद्रित करायचं, असं मी ठरवलं.
त्यामुळे मी आनंदाने ब्रेक घेतला, जो खरंच गरजेचा होता. अभिनयातून मी जवळपास पाच वर्षं ब्रेक घेतला, त्यात प्रेग्नसीचाही समावेश आहे. मात्र, त्यानंतर आता परत काम सुरू करायचं ठरवलं आणि मी आनंदाने कामाला लागले. मला मुलगा आहे, त्याचं नाव कार्तिक आणि तो आता साडेसहा वर्षांचा आहे.
मातृत्व अनुभवलेली प्रत्येक स्त्री तुम्हाला सांगेल, की हा अनुभव शब्दात मांडता येत नाही, तो जगावा लागतो. तुम्ही आई होता, तेव्हा तुम्ही तुमच्या आई-वडिलांना अधिक समजून घेता. मी स्वतः आई झाल्यावर माझ्या आईबद्दलचा आदर खूपच वाढला. माझे वडील मी लहान असतानाच वारले होते.
माझ्या आईनं एकटीने आम्हाला दोघांना मोठं केलं. ती नोकरी करत होती आणि तरीही तिनं आम्हा दोघांची चांगली काळजी घेतली. मी आई झाले, तेव्हा मला कळलं की तिने किती संघर्ष केला आहे. त्यामुळे मी मातृत्वाचं आव्हान स्वीकारलं आणि काही काळ करिअर बाजूला ठेवलं.
आई झाल्यानंतरचं पहिलं एक वर्ष खूप कठीण असतं. त्यावेळी मला पोस्ट-पार्टम डिप्रेशन म्हणजे काय, हे कळलं. मूल झाल्यावर सगळे त्याच्या भोवतीच असतात आणि आईकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं. मात्र, माझं सुदैव आहे, की माझा नवरा आणि सासरच्या मंडळींनी मला खूप समजून घेतलं आणि माझी व्यवस्थित काळजी घेतली.
काही महिलांना मुलं झाल्यावर लगेच नोकरीवर परत जावं लागतं; परंतु माझ्या बाबतीत तसं काही नव्हतं. मला निवड करण्याचा पर्याय होता आणि मी ठरवलं, की काही काळ घरीच राहायचं. मी तो निर्णय स्वेच्छेनेच घेतला आणि त्याची मला अजिबात खंत नाही. माझं करिअर काही काळ बाजूला ठेवून मी मातृत्वाचा आनंद घेत होते. मुलं मोठी झाल्यावर तुम्हाला वाटतं, की तुमचं हृदयच तुमच्या शरीराच्या बाहेर आहे, कारण ते आता मुलाच्या स्वरूपात तुमच्या आजूबाजूला असतं.
आई झाल्यानंतर पुन्हा एकदा काम सुरू करण्याची इच्छा होती, मग मी काही लोकांना फोन केले. त्यानंतर मी ‘आलमपन’ नावाची वेब सिरीज सुरू केली, निपुण धर्माधिकारी यांच्यासोबत. मात्र, मी पूर्ण वेळ कामात व्यग्र नव्हते. त्यानंतर मी नाटक सुरू केलं. आठवड्याच्या शेवटी प्रयोग करायचे आणि उरलेला वेळ घरी द्यायचा, असं मी ठरवलं होतं. मातृत्व आणि काम यांच्यात समतोल साधणं खूप महत्त्वाचं असतं आणि मी ते जमेल तसं करत आहे.
आईपणामुळे माझ्या करिअरबद्दलचा दृष्टिकोन काही बदलला नाही, कारण मातृत्व आणि करिअर दोन्हीही सांभाळता येऊ शकतं. आजच्या काळात महिलांना चांगलं सपोर्ट सिस्टीम मिळते, त्यामुळे आई झाल्यानंतरसुद्धा महिला यशस्वीरीत्या काम करू शकतात. इंडस्ट्रीमध्ये किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात मातृत्वानंतरही महिलांना उत्तम काम करताना आपण पाहतो, आणि त्याचं खूप कौतुक वाटतं.
करिअरिस्ट मुलींसाठी टिप्स
१. मूल होण्याचा निर्णय हा तुमचा असायला हवा. आई, सासू किंवा घरातील इतरांच्या अपेक्षांमुळे हा निर्णय घेऊ नका, तर स्वतःच्या इच्छेनं जबाबदारी स्वीकारा.
२. आपल्या शरीरात एक नवीन जीव तयार होतो, ज्याला या जगात आणायचं आहे. ही छोटी जबाबदारी नाही, त्यामुळे पूर्ण तयारीनेच हा निर्णय घ्या.
३. मुलांना आनंदी आई हवी असते. तुम्ही आनंदी असाल आणि मातृत्व स्वीकारण्यास तयार असाल, तरच त्या दिशेला जा.
४. मूल जन्माला आल्यानंतर स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे.
५. मूल झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी अनपेक्षित असू शकतात, त्यामुळे पूर्ण तयारीनेच मातृत्वाकडे वळा.
(शब्दांकन : आकांक्षा पाटील)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.