Mother esakal
लाइफस्टाइल

'आई-वडिलांची दहशत एवढी वाटली की, ती घराची सुरक्षित चौकट ओलांडून बिनभरवश्याच्या ठिकाणी निघून गेली?'

आई-वडिलांची दहशत एवढी वाटली की, ती घराची सुरक्षित चौकट ओलांडून बिनभरवश्याच्या ठिकाणी निघून गेली?

सकाळ डिजिटल टीम

आईपासून वेगळे व्हायच्या वेळेला मूल खूपच अस्वस्थ असते. ही सर्व विलगीकरण भीतीची लक्षणे असू शकतात.

-श्रुतिका कोतकुंडे सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण sajagclinic@gmail.com

सामान्यतः लहान मूल एक ते दीड वर्षाचे झाले की, त्याला आई किंवा वडिलांजवळ असण्याची इतकी सवय होते की, त्यांचे जवळ असणे त्याचे सुरक्षाकवच बनते. आई थोडा वेळ दिसली नाही तर ते मूल अस्वस्थ होते, आईला शोधत राहते, रडते आणि आई जवळ आली की, खूश होते. आई (Mother) जवळ असताना मूल हळूहळू इतर लोकांशी मिसळायला लागते आणि आपल्या अनुभव कक्षा रुंदावायला लागते.

हळूहळू त्याच्या आधारव्यवस्थेत मित्र, शिक्षक, शेजारी येऊ लागतात; पण प्रामुख्याने त्याची आईशी जवळीक इतरांपेक्षा जास्त राहतेच. तीन वर्षांचे झाल्यानंतर हळूहळू मूल आईपासून थोडावेळ दूर राहू शकते. प्लेग्रुपमध्ये दोन ते तीन तास घालवू शकते. हे जर झाले नाही आणि जर या वयात किंवा नंतर मूल आईपासून दूर राहूच शकत नसेल, घाबरत असेल, सतत रडत असेल तर त्याला विलगीकरण भीती आहे का, ते तपासून घ्यायला हवे....

एक बातमी वाचली की, दहावीची मुलगी आई-वडिलांच्या अभ्यासाच्या तगाद्यामुळे घर सोडून दूर ऋषिकेशला आश्रमात सत्संगात रमली. या मुलीला आई-वडिलांपासून दूर होताना भीती नसेल का वाटली? अभ्यासाच्या ताणाची की आई-वडिलांची दहशत एवढी वाटली की, ती घराची सुरक्षित चौकट ओलांडून बिनभरवश्याच्या ठिकाणी निघून गेली?

सामान्यतः दहा ते पंधरा टक्के लहान मुलं अनोळखी जागी, अनोळखी लोकांमध्ये बावचळतात, घाबरतात. अशा मुलांना पुढच्या काळामध्ये भीतीचे, काळजीचे विकार होण्याची शक्यता जास्त असते. मुलाला काळजी वाटू शकते की, आई दूर गेली तर तो आईला कायमचे हरवून बसेल किंवा आईचे काहीतरी बरे-वाईट होईल व त्याला ती कायम दुरावेल. मुलाला हरवण्याची किंवा किडनॅप (Kidnap) होण्याची भीती वाटू शकते. मुलाला आईला सोडून शाळेत जाण्याची भीती वाटू शकते, तसेच रात्री झोपताना सतत आई जवळ हवी असते किंवा मूल सतत आईची खुशाली तपासत राहते.

आईपासून लांब झोपण्यास मूल नकार देते, एकटे राहण्यास भीती वाटते किंवा रोज रात्री स्वप्नं पडतात किंवा सतत मुलाला शारीरिक समस्या असू शकते, ज्याचे निदानच होत नाही. आईपासून वेगळे व्हायच्या वेळेला मूल खूपच अस्वस्थ असते. ही सर्व विलगीकरण भीतीची लक्षणे असू शकतात. दोन ते तीन वर्षांच्या मुलांमध्ये ही जरी काहीअंशी स्वाभाविक असली तरी ही लक्षणे जर तशीच राहिली तर शाळेत जाण्याच्या काळामध्ये बाधा निर्माण होऊ शकते. हा भीतीयुक्त आजार नाही ना, हे पालकांनी तपासण्याची गरज असते जेणेकरून त्यावर उपाय करणे शक्य होते.

लाजवट आई-वडिलांची मुलं कधी कधी लाजवट असतात किंवा भित्री बनतात. तरी अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. अशी लक्षणे दिसल्यास शाळेकडून व पालकांकडून सुसूत्र उपाय लवकर होणे आवश्यक असते अथवा मुलांच्या शैक्षणिक आयुष्यात बाधा निर्माण होऊ शकते वा मुलांचा भित्रा स्वभाव अजून बळावू शकतो. उपायांमध्ये काही वर्तन उपाय सुचवले जातात तसेच कौटुंबिक समुपदेशन केले जाते. घरातील वातावरण सौम्य करण्यावर व मुलाला धीर देऊन त्याचा आत्मविश्वास वाढवण्यावर भर दिला जातो.

क्वचितप्रसंगी औषध देण्याची गरज पडू शकते. उपायांमध्ये मुलाची भीती कमी करण्यासाठी त्याला प्लेथेरेपीच्या माध्यमातून बोलते केले जाते, त्याचे समुपदेशन केले जाते व भीती व ताणाची कारणे समजून त्याच्यावर उपाय सुचवले जातात. शाळेचे शिक्षक, त्याचे शाळेचे मित्र व पालक यांच्या मदतीने मुलाला भावनिक आधार वाटेल अशी व्यवस्था करत मुलाचा शाळेचा वेळ हळूहळू वाढवत नेला जातो जेणेकरून त्याची भीती कमी होत जाते व मूल शाळा, खेळ, अभ्यास यात पूर्वीसारखे रमू लागते. काही प्रमाणात विलगीकरण भीती ही जीवनावश्यक आहे जेणेकरून मूल अवास्तव जोखमीपासून सुरक्षित राहील. नेमकी हीच भीती सुरवातीच्या उदाहरणातील मुलीत कशी गायब झाली आणि तिने असे जोखमीचे पाऊल कसे उचलले, हे पुन्हा कधी समजून घेऊ.

(लेखिका मनोविकारतज्ज्ञ व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT