Maharashtrian_Jewellery- 
लाइफस्टाइल

ओळख करून घ्या काही खास पारंपरिक दागिन्यांची

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : दागिने म्हणजे स्त्रीच्या मर्मबंधातली ठेव. दागिन्यांची आवड स्त्रीली आदिम काळापासून आहे. पाषाण युगातही स्त्री रंगीबेरंगी खड्यांचे दागिने वापरत असे. पौराणिक कथांमध्येही स्त्रीच्या विविध दागिन्यांचा उल्लेख आढळतो. धातुंशिवाय फुलांचेही दागिने महिलांच्या पसंतीस पुरातन काळापासून उतरत आहेत.

प्रांतोप्रांतीच्या परंपरांनुसार तिथल्या दागिन्यांमध्येही विविध प्रकार आढळून येतात. महाराष्ट्रात तर दागिन्यांचे विपुल प्रकार आहेत. त्यावर इथल्या विविध राजघराण्यांची, पेशवाई सरंजामाची मोहोर आहे. आणि दागिन्यांची फॅशन कधीच जुनी होत नाही. ती फिरुन येत असते. आपल्याला माहीत नसलेले कितीतरी पारंपरिक दागिने एकेकाळी वापरले जात. संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या, पण आज कालबाह्य़ झालेल्या अशा काही खास पारंपरिक दागिन्यांची ओळख..

अग्रफूल
हे सोन्याचे एक जोडफूल असते. वेणीचा शेपटा घातल्यानंतर केसांची टोके (अग्रे) या जोडफुलाच्या मधल्या पोकळ जागेत खोचून घ्यावयाची व खालून वर गुंडाळत गुंडाळत शेपटय़ाचे गोल वेढे अगदी वर शेपटय़ाच्या प्रारंभस्थानी आणून तेथे आकडय़ांच्या अथवा आगवळाच्या साहाय्याने पक्के बांधून खोपा तयार केला की हे फूल खोप्याच्या मध्यभागी दोन्ही बाजूंनी दिसत राहते.

फिरकीचे फूल
सोन्याचे कमळाकृती फूल. केसांमध्ये अडकवण्यासाठी या फुलाच्या मागच्या बाजूला तारेचीच स्प्रिंगसारखी रचना (फिरकी) करून ती जोडलेली असते.
भांगसर
माथ्यावरच्या भांगरेषेवरून पुढे कपाळापर्यंत जाणारा मोत्यांचा सर ‘भांगसर’ या नावाने ओळखला जातो. पुढे टोकाशी खाली कपाळावर लोंबणारे चंद्रकोरीच्या आकाराचे रत्नजडित पदक या सराला जोडलेले असते व ते ‘बिजवरा’ या नावाने ओळखले जाते हे सांगितले आहेच. बिजवऱ्याप्रमाणेच या सराला कासव, मोर, कीर्तिमुख, भुंगा इत्यादी ‘साजा’मधील इतर पदकेही जोडली जातात.

प्राचीनकाळी नाकासाठी अलंकार ही प्रथा नव्हती. नाक टोचून त्यात नथ, चमकी, सुंकले वगैरे दागिने घालणे ही बाब आपल्याकडे तशी अलीकडच्या म्हणजे गेल्या हजार एक वर्षांपासून सुरू झालेली आहे.

मुरकी
चमकीप्रमाणेच परंतु चमकीच्या वर दिसणारा मोती अथवा रत्नखडा याऐवजी चंद्राकाराच्या कोंदणात बसवलेले रत्न व कोंदणाला जडविलेले मोती, अशा रूपाकारातली ही चमकीच, मुरकीच्या खालच्या बाजूला मळसूत्र असते व त्याच्या योगाने ही मुरकी एका जागी घट्ट (स्थिर) राहू शकते. या मुरकीलाच काही ठिकाणी ‘मोरणी’ असेही म्हणतात.

कर्णफूल
कानामध्ये खाली पाळीच्या भोकात अडकवण्याचा हा रत्न व मोतीजडित असा फुलाच्या (कमळाच्या) रूपाकाराचा कुडी या अलंकाराचाच एक वैभवशाली प्रकार.

चौकडा
चारच मोती किंवा चार सोन्याचे दाणे असणारा हा कुडीचाच एक प्रकार चौकी-चौकडा या नावाने ओळखला जातो.

कुडी
कुडी हे कर्णभूषण पेशवाई काळात खूप प्रसिध्द झाले. सोन्याचे किंवा मोत्याचे ६-७ मणी वापरून केलेल्या फुलासारखा आकाराच्या कर्णभूषणांना ‘कुडी’ म्हणतात. कुडया ह्या विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे लक्षण मानले जातात. कुडयांव्यतीरिक्त कर्णफुले, भोकर, झुबे, झुंबर, बाळी, वेल,सोन्याचे कान यांसारखे आभूषणेही कानात घातले जातात.

झुमके
याचे पारंपारिक नाव झुबे असे आहे. सतराव्या शतकाच्या आधीपासून हे प्रचलित आहेत. फक्त याच्या आकारात फरक असेल.

अंबर माळ
अंबर हे एक खनिज आहे. याचा रंग पिवळा-नारंगी अथवा किंचित तपकिरी असतो. अंबराचे मणी बनवून त्यांची माळ गळय़ात घालण्याची येथे हजारो वर्षांची प्रथा आहे. मराठय़ांच्या राजवटीत या माळेला ‘अंबरसा’, ‘आमरसा’ असेही म्हणत असत.

एकदाणी
सोन्याच्या टपोऱ्या आकाराचे मणी एका सरात गुंफून तयार केलेली माळ एकदाणी या नावाने ओळखली जाते. त्याशिवाय एकदाणीप्रमाणेच ‘एकलड’, ‘एकसर’, ‘एकावळी’ अशीही नावे प्रचारात आहेत.

काशीताळी
महाराष्ट्रामधील शैवपंथीय सारस्वत जमातीमधले हे मंगळसूत्र ‘काशीताळी’ या नावाने ओळखले जाते. या अलंकारात सोन्याचे व पोवळय़ाचे मणी ओवलेले असून माळेच्या केंद्रभागी चौकोनी आकाराचे मुख्य पदक असते व ते ‘ताळी’ या नावाने ओळखले जाते. गोवा प्रदेशात हिंदूधर्मीय स्त्रियांप्रमाणेच ख्रिश्चन स्त्रियांमध्येही हा अलंकार ‘सौभाग्यचिन्ह’ म्हणून वापरात आहे.

कारले
कारल्याच्या आकाराचा म्हणजे मध्यभागी फुगीर आणि दोन्ही बाजूंच्या टोकांकडे निमुळता होत गेलेला सोन्याचा ठसठशीत लांबट मणी कारले या नावाने ओळखला जातो. असा मणी एखाद्या माळेच्या मध्यभागी जडवून ती माळ गळय़ात घातली जाते.

गरसळी
मूळ शब्द गळेसर (गळय़ात घालावयाची माळ) असा असावा, परंतु या शब्दाची गळसरी, गळेसर, गरसळी, गरसुळी, गरसोळ अशी अनेक रूपे आहेत. सोन्याच्या कोणत्याही माळेला गळसरी, ‘गरसळी’ या नावाने ओळखले जाते.

गाठले
मंगळसूत्रालाच गाठले असा शब्द ग्रामीण भागात रूढ आहे. गाठले, डोरले, गुंठण असेही शब्द या अलंकारासाठी ग्रामीण समाजात रूढ आहेत.

गुंजमाळ
सोन्याच्या तारेत गुंजांची गुंफण करून अशुभ निवारणासाठी हा दागिना गळ्यात घातला जातो.

गोखरू माळ
गोखरू हे काटेदार फळ आहे. या गोखरूच्या आकाराचेच काटेदार सोन्याचे मणी करून त्यांची बनविलेली माळ, असा हा अलंकार आहे.

गव्हाची माळ
गहू या धान्याचे व त्याच रूपाकाराचे सोन्याचे मणी बनवून त्यांची तयार केलेली माळ, तिला ‘गव्हाची माळ’ असे म्हटले जाते.

चाफेकळी माळ
चाफ्याच्या कळीसारखे सोन्याचे लांबट मणी तयार करून त्यांची बनविलेली ही माळ असते. पूर्वी या माळेला ‘सोनकळी माळ’ असेही म्हणत असत.

चित्तांग
हा मूळचा कर्नाटकातील दागिना आहे. महाराष्ट्रात चिंताक या मूळ शब्दाऐवजी चित्तांग या नावाने तो ओळखला जात असे. लहान मुलांच्या मनगटामधल्या ‘बिंदल्या’प्रमाणेच परंतु मोठय़ा आकाराचा असा हा गळय़ात अडकवण्याचा दागिना होता. ‘सुवर्ण नियंत्रण कायदा’ अमलात येण्यापूर्वी (१९६२) हा दागिना येथे पुष्कळ ठिकाणी दिसत असे. आता मात्र तो पूर्णपणे लुप्त झाला आहे.

चौसरा
चौसरा म्हणजे सोन्याच्या बारीक कड्यांचे गुंफलेले चार पदर असणारा हार किंवा माळ असा हा अलंकार होता. हजार वर्षांपूर्वीपासून तो इथे महाराष्ट्रात सर्वत्र दिसत असे. परंतु पुढे पुढे त्याचा वापर कमी कमी होत गेला. आता तो सुवर्णरूपात कोठे दिसत नाही, परंतु आदिवासी जमातीमध्ये मात्र आजही तो ‘चौसरा’ या नावानेच परंतु हलक्या धातूच्या स्वरूपात वापरात आहे.

जवमाळ
जव म्हणजे यव किंवा सातू या दाण्याच्या आकाराच्या सोन्याच्या मण्यांची माळ असा हा दागिना आहे.

जाळीचा मणी
कोणत्याही माळेच्या मध्यभागी लावला जाणारा सोन्याचा लांबट आकाराचा मोठा व पोकळ असा मणी. या मण्याच्या सर्वागावर अनेक भोके पाडून जाळी बनवलेली असते. कधी कधी ही भोके जरा अधिक मोठ्या आकाराची करून त्यात बारीकबारीक रत्नखडेही बसवले असतात. वर ‘कारले’ या सांगितलेल्या अलंकाराप्रमाणेच माळेच्या केंद्रस्थानी अडकवला जाणारा ‘जाळीचा मणी’ हाही छोटासा अलंकार आहे.

जोंधळी पोत
जोंधळ्याच्या दाण्यासारखे सोन्याचे छोटे मणी तयार करून त्यांची बनवलेली माळ ‘जोंधळी पोत’ या नावाने ओळखली जाते.

तांदळी पोत
तांदळाच्या रूपाकाराचे सोन्याचे मणी बनवून त्यांची केलेली माळ म्हणजे ‘तांदळी पोत.’

तिलडी
वर ‘एकलड’ या अलंकाराबद्दल लिहिले आहेच. एकलड म्हणजे मण्यांच्या एक सराची माळ. त्यावरूनच दोन सरांच्या माळेला दुलडी, तिलडी म्हणजे तीन सरांची माळ, चार सरांच्या माळेला चौसरा आणि पाच सरांच्या माळेला पंचलड अशी नावे आहेत.

चिंचपेटी
छोटय़ा चौकोनी पेटीसारख्या सोन्याच्या कोदणात मोती आणि माणिक बसवून तयार केलेला अलंकार आजच्या घडीलाही लोकप्रिय आहे. ग्रामीण भागात ‘चीचपाटी’ या नावानेही तो ओळखला जातो. चिंचपेटय़ा या अलंकाराला पेटय़ा या नावानेही ओळखले जाते.

वज्रावळ
दृष्ट निवारण्यासाठी एका विशिष्ट वेलीच्या बियांच्या रूपाकारासारखे मणी तयार करून त्यांची माळ गळ्यात घातली जाते तिला ‘वज्रावळ’ असे नाव आहे.


ताळेबंध
हा दंडावरील चांदीचा अलंकार असून नागरजनांपेक्षा ग्रामीण भागांतील स्त्रियांमध्ये तो अत्यंत लोकप्रिय आहे आणि ‘तोळबंदी’, ‘तुळवंदी’ अशा काहीशा अपभ्रष्ट नावांनीच तो ओळखला जातो.

नागोत्र
नागाच्या वेटोळय़ांप्रमाणेच दंडाभोवती रचना केल्याप्रमाणे दिसणारा हा अलंकार आहे. ग्रामीण भागात तो चांदीचा असून ठसठशीत दिसणारा असा असतो, तर शहरी भागात तो सोन्याचा व अधिक नाजूक कलाकुसरीचा दिसतो. या दागिन्याला ‘नागवाकी’, ‘नागोत्तर’ अशीही नावे आढळून आली.

वेळा
ग्रामीण भागात दंडावरच परंतु जरासा खाली कोपराजवळ घातला जाणारा हा अलंकार आहे. कित्येक ठिकाणी त्याला ‘कोपरवाळी’ असेही म्हटले जाते.


जवे
जव किंवा यव धान्याच्या दाण्याच्या आकाराचे सोन्याचे मणी सोन्याच्या बांगडीवर चिकटवून या बांगडीला उठाव आणला जातो, त्या अलंकाराला ‘जवे’ असे नाव आहे. हा मुळात गुजरात-राजस्थानकडील अलंकार. आपणाकडे त्याचा फारचा अढळ नाही. गुजरातेत ‘जवे’ आणि ‘पिछोडय़ा’ अशी जोडी असते. त्यापैकी जव ही बांगडी मनगटावरील सर्व अलंकारामध्ये अगदी पुढे घालावयाची आणि पिछोडी सर्वात मागे म्हणजे कोपरानजीक घालावयाची अशी तेथे पद्धत आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT