Promise Day Special 2021 : प्रेम होतं की केलं जातं? हा प्रश्न 'कोंबडी आधी की अंडे' असा वाटत असला तरी ते त्रिकालबाधित सत्य नाही. सध्याच्या घडीला आपल्याला 'व्हायरल' हा शब्द खूप ऐकायला मिळतो. यातही काहीस असंच आहे. गोष्टी व्हायरल होत नसतात तर त्या केल्या जातात हे ज्याला समजलं त्याला प्रेम आपसूक होत नाही तर ते केलं जातं ही गोष्ट पटेल. आपण एखाद्याच्या प्रेमात पडण्यामागेही अनेक कारण असतात. त्यातली एक गोष्ट असते ती त्या व्यक्तीनं दिलेलं वचन. आयुष्यभरासाठी राणी बनवेल, तुझ्यासाठी कायपण...वगैरे वगैरे विविध तरंग त्यात अनुभवायला मिळतात. याच तरंगातून स्वप्न फुलायला सुरुवात होते.
स्वप्न बघणं आणि स्वप्न दाखवणं या दोन तशा वेगवेगळ्या गोष्टी. पण त्याचा परस्परांशी असणारा संबंध हा मिनिटा- मिनिटाला ब्रेकअपची भाषा करणाऱ्या गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडमधील नात्यागत असतो. कोणी स्वप्न दाखवणाऱ्याच्या प्रेमात पडतं तर कोणाला स्वप्न बघणाऱ्या व्यक्तीत रस निर्माण होतो. ही गोष्ट व्यक्तीसापेक्ष बदलते. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते अशी एक म्हण आहे. याचा अर्थ एकमेकांना समजून घेणं असा असतो. मग बऱ्याचदा तो अॅडजेस्टमेंटवर येऊन पोहचतो.
प्रेमाच्या खेळात गर्लफ्रेंड खर्चिक असते आणि बॉयफ्रेंड हा फेकू आणि बढाया मारणारा असतो, अशी एक टूम तयार झाल्याचे चित्रही पाहायला मिळते. पण वचनाला भाळून तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडला तर त्या माणसाला सहन करणं खूप जड जातं. जीव गुदमरुन जातो. चालता फिरताही तुम्ही व्हेंटिलेटरवर असता. त्यामुळेच शब्द फेकण्याची एक मर्यादा असावी. नाहीतर उगाच काही तरी बोलून रडायची वेळ येते. हे मी आजुबाजूला घडणाऱ्या घटनेतून दिसून येते. त्यानं काही होणार नाही हे खरं असलं तरी एखाद्या प्रॉमिसमुळे आपल्याला सारखी-सारखी 'अच्छे दिन' येणार अशी स्वप्नं पडत असतात. मलाही ती पडतात. गेल्या सहा वर्षांपासून माझ्या बाबतीत असं काही तरी घडतंय. Promise Day मुळं त्या वचनाची पुन्हा आठवण झाली. माझ्या अल्प बॅलन्स असलेल्या बचत खात्यात रक्कम 'पुन्हा येईन' पुन्हा येईन' या आशेनं दिवस उगवतो आणि मावळतो पण लाखाची गोष्ट काही खरी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
शब्द काय होते. त्या भावना कशासाठी होत्या. हे जेव्हा कळतं तेव्हा त्या माणसावरील प्रेम कमी होतं म्हणजे झालं पाहिजे. पण काही माणंस त्याला अपवाद ठरतात आणि रेटून खोटं बोलून आपल्या दुसऱ्या वचनानं आपल्याला पुन्हा गुंडाळतात. वचन हा त्याच्यांसाठी खेळ असतो. आपल्या मास्टरकीनं ते आपल्याला खेळवत राहतात आणि आपण त्यांना मानगुटीवर बसवून ठेवतो. 'मन की बात' एवढीच की यांच्या वचनाला उपमा नाही.. जे नव्या भारताचे देणेकरी!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.