Valentine's Week Special : व्हॅलेंटाईन वीक सुरू झालेला आहे आणि सर्व प्रेमी युगुलांचे हे गुलाबी आणि रोमँटिक दिवस सेलिब्रेट करणे पण सुरू झालेलं आहे. हा आठवडाभर प्रेमिकांचं सगळं जग कसं गुलाबी झालेलं असतं. कुणी आपल्या प्रियकर-प्रेयसी सोबत तर कुणी आपल्या BF-GF सोबत वेगवेगळ्या रोमँटिक पद्धतीने हे दिवस घालवण्याचे प्लॅन करतंय, तर कोणी आपल्या मनातील 'टू बी BF-GF' ला यावर्षी तरी पटवण्याचे वेगवेगळे फंडे शोधतंय. यावर्षी तरी आपल्या मनातील राजकुमार/कुमारी आपल्याला भेटेल कि नाही? या आशेने कोणी आस लावून बसलंय, तर कोणी 'आपण काय प्रेम-बिम असल्या भानगडीतच पडणार नाही' आणि त्यामुळे 'आपणच कसे जगावेगळे अद्वितीय निपजलोय!' या आविर्भावात इतरांची मजा घेत बसलेत.
या प्रेमाच्या दुनियेत तरंगत असताना प्रेम म्हणजे नक्की काय? हे मात्र आपण अनेकदा समजून घेतलेलंच नसतं. प्रेमाविषयी पालक, शिक्षक यांनी किंवा यांच्याशी मोकळेपणाने बोलण्याची आपल्याकडे पद्धतच नसल्याने आपल्यावर झालेले प्रेमाचे संस्कार हे गाणी, चित्रपट, मालिकांतून झालेले असतात. या सगळ्यांमध्ये प्रेमाची म्हणून जी काही व्याख्या आपल्याला दाखवली जाते ती मुळात प्रेमाची व्याख्याच नसून आकर्षणाची व्याख्या असते. इथूनच आपली चुकीची सुरूवात होते आणि मग पुढे अनेकदा गटांगळ्या खाण्याची वेळ येते. यातून काहीचजण तरून बाहेर निघतात तर अनेकांच्या नाकातोंडात पाणी जाते व काहींचे जीवही जातात. यासाठी आधी आपण चित्रपट व गाण्यांतील आभासी जग, त्यामागची त्यांची व्यावसायिक मानसिकता व वास्तव जग यातील फरक समजून घेतला पाहिजे.
हेही वाचा - काय आहे गुलाबी रंगाच्या मागचं गुपित? नक्की कुठल्या भावना येतात मनात? जाणून घ्या मानसशास्त्र
एकदा प्रेम व आकर्षण याविषयी आपल्याला स्पष्टता आली कि मग या दोन्हीही सुंदर भावना आपल्याला छान अनुभवता येतात. आकर्षण हे वाईटच असल्यासारखे अनेकदा भासवले जाते; पण आकर्षण ही खूप सुंदर नैसर्गिक भावना असून आपण मेडिकली फिट असण्याचे ते लक्षण आहे. चित्रपट-गाण्यांतून सांगितलेल्या सर्व गोष्टी आपल्याला जवळच्या, हव्याहव्याशा वाटतात व आपल्या आत एक वेगळीच ऊर्जा भरतात. तसेच कुणालातरी पाहिल्यावर आपल्या छातीत होणारी धडधड, आपल्या आवडत्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा, सतत तिच्या सहवासात राहण्याची इच्छा, रात्रंदिवस डोळ्यासमोर फक्त तिचा/त्याचाच चेहरा दिसणे, इतर कशातही मन न लागणे, सतत त्याच व्यक्तीचा विचार करत राहावेसे वाटणे व त्या व्यक्तीशिवाय आपण जगूच शकत नाही, इथपासून तर त्या व्यक्तीसाठी साऱ्या जगाला सोडून द्यायची, साऱ्या दुनियेसोबत भिडायची आपली तयारी हे सगळं सगळं नॉर्मल असून आपल्या शरीरात स्त्रवणाऱ्या हार्मोन्समुळे तयार होणाऱ्या या भावना असतात. या सगळ्या भावना मनात येणे यात चुकीचे किंवा अद्भुत असे काहीच नाही हे आधी समजून घेऊयात आणि त्यातून काहीही मोठा निर्णय घेण्याआधी या प्रेमाच्या नाही तर आकर्षणाच्या भावना आहेत हेही लक्षात ठेवूयात. हे आकर्षण, या भावना आपल्याला खूप हव्याहव्याशा आणि आयुष्यात वेगळाच आनंद देणाऱ्या असतात, त्यामुळे त्या आपण एन्जॉयच कराव्यात; फक्त हे म्हणजे प्रेम नाही हे इथे लक्षात ठेवावे एवढेच.
I Like You आणि I Love You या दोन वाक्यांमध्ये जो फरक आहे, तोच फरक आकर्षण आणि प्रेमात आहे. आपल्याला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आपले प्रेम नसते व आवडणे म्हणजे प्रेम नाही, एवढे जरी इथे समजून घेतले तरी पुरेसे आहे. प्रेम हे 'आँखों आँखों में' किंवा 'पहली नजर में' होणारे नसते, तसे होते ते आकर्षण असते. त्याच्या पुढच्या टप्प्यावर ज्या व्यक्तीबद्दल आकर्षण आहे, त्या व्यक्तीच्या सहवासात राहिल्यावर, तिला समजून घेत असताना, तिच्या चांगल्या-वाईट सर्वच गोष्टींकडे डोळे व डोके खुले ठेवून पाहत असताना, तिच्याबद्दलच्या सर्व गोष्टींची नीट माहिती करून घेत असताना मग जर अधिकाधिक जवळीक, विश्वास व आदर वाढत जात असेल तर त्या भावनेला प्रेमाचं नाव देता येऊ शकतं. त्यामुळे 'प्रेम अंधा नहीं होता है' कारण ते वेळ घेऊन विचारपूर्वक एकमेकांना समजून घेऊन झालेलं असतं. त्याचवेळी 'ऍट्रॅक्शन मात्र अंधा होता है' कारण ते पाहताक्षणी झालेलं असतं, त्यात काहीच विचार नसतो. यामध्ये अनेकदा आपल्याला समोरची व्यक्ती नाही, तर तिचा फक्त एखादा गुण आवडलेला असतो. स्माईल, स्टाईल, हुशारी, ताकद, हिंमत, चालणं, बोलणं, लिहिणं, खेळणं, वागणं, दिसणं अशा कशावर तरी आपण फिदा असतो. हे आकर्षण तात्कालिक असून काही काळानंतर कमी होणारे असते. म्हणूनच जे आकर्षणालाच प्रेम समजत असतात, त्यांची पुढे जाऊन चुकण्याचीच शक्यता जास्त असते. ही चूक होवू नये म्हणून आकर्षण व प्रेम यांच्या मध्ये ‘मैत्री’चा टप्पा असायलाच हवा व आपल्या नात्याला ‘प्रेमा’चे नाव द्यायची घाई न करता मैत्रीत राहून एकमेकांना अधिक जाणून-समजून घ्यायला हवे.
प्रेमात असणं म्हणजे एकमेकांच्या आयुष्याचा कॉपीराईट घेणं नाही. प्रेमात बंधनं नसतात, तर मोकळीक असते. संशय नसून विश्वास असतो. मागे खेचणे नसून पुढे जाण्यासाठी बळ देणे असते. स्वतःला किंवा समोरच्याला त्रास देत जगणं म्हणजे प्रेम नसते, तर दोघांनाही आयुष्याचा आनंद घेता येत जगणं म्हणजे प्रेम असते. प्रेमात तिरस्कार, द्वेष, जलसी, हिंसा या गोष्टींना स्थान नसते. ‘माझे जिच्यावर प्रेम आहे, तिने पण माझ्यावरच प्रेम करायला हवं’ अशी जबरदस्ती म्हणजे प्रेम नसून ‘ज्या व्यक्तीवर माझे प्रेम आहे, ती व्यक्ती खुश राहणं जास्त महत्वाचं’ हा विचार म्हणजे प्रेम आहे.
प्रेम म्हणजे मालकी नसून एकमेकांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा आदर करत एकमेकांना जपत दोघांचाही मुल्यविकास करणारा आनंददायी प्रवास आहे. या प्रवासासाठी सर्वांना प्रेममय सदिच्छा.
- सचिन थिटे (८४२४०४११५९)
(srthite@yahoo.co.in)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.