आषाढी एकादशीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपुरकडे निघाले आहेत. लाखो वारकरी दूरवरचा प्रवास करून पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेणार आहेत. यावेळी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला झपझप चालताना 'माउली माउली, तू संतांची सावली, दारी तुळस लावावी,' असं म्हणताना दिसतात. पण वारीमध्ये डोक्यावर तुळस घेऊन का जातात?
काय आहे तुळशीचं महत्त्व? हे आपण जाणून घेणार आहोत. वारीत डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला आपल्याला दिसतात. त्यामुळे ही तुळस डोक्यावर घेऊन या महिला का चालत असतील असा प्रश्न सहाजिकच उपस्थित होणं स्वाभाविक आहे.
विष्णूंना तुळस प्रिय आहे असं सांगितलं गेलं आहे. विष्णूच्या प्रत्येक पूजेत तुळस वाहावी लागते. दुसरीकडे पंढरीचा विठुराया म्हणजे विष्णूंचं एक रूप मानलं गेलं आहे. सहाजिकच तुळस जशी विष्णूंना प्रिय तशीच ती पंढरीच्या विठ्ठलालाही अत्यंत प्रिय आहे असं मानलं गेलं आहे. तुळस ही प्रवासात डोक्यावर घेतलेली चांगली असते, असं वारीतील महिला सांगतात.
वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्व आहे. तुळस भगवंतापेक्षाही मोठी आहे असं मानलं जातं. तुळशीत देवी लक्ष्मी वास करते त्यामुळे तुळस डोक्यावर घेऊन जाण्याची भावना या महिलांमध्ये पाहायला मिळते. वैज्ञानिक कारणानुसार, डोक्यावर तुळस घेतल्याने आसपासच्या २० ते २५ फुटांपर्यंतच्या हवेत ऑक्सिजनची योग्य मात्रा राखण्यास तुळस मदत करते असं सांगितलं जातं.