World Heritage Day 2024: Sakal
लाइफस्टाइल

World Heritage Day 2024: ऐतिहासिक वीरगळांचे माहेरघर - वेळापूर

युद्धात धारातीर्थी पडलेल्या वीरांचे ऐतिहासिक प्रसंग संग्रहालयामधील वीरगळांवर कोरलेले आहेत. असे दीडशेहून अधिक वीरगळ संग्रहालयामध्ये आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नितीन अणवेकर, इतिहास अभ्यासक, सोलापूर

वेळापूर येथे ऐतिहासिक वीरगळांचे संग्रहालय आहे. युद्धात धारातीर्थी पडलेल्या वीरांचे ऐतिहासिक प्रसंग संग्रहालयामधील वीरगळांवर कोरलेले आहेत. असे दीडशेहून अधिक वीरगळ संग्रहालयामध्ये आहेत. याशिवाय येथील अर्धनारी नटेश्‍वराचे मंदिर शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. याच मंदिरातील हर गौरीची दुर्मिळ मूर्ती विशेष लक्षवेधी आहे.

माळशिरसपासून 18 कि.मी. अंतरावर वेळापूर हे ऐतिहासिक गाव वसलेले आहे. गावास ऐतिहासिक घटनांची जणू परंपराच लाभली आहे. सिंदखेड येथील लखूजी जाधव यांच्या घराण्यातील खंडोजी जाधव यांना सन 1666 मध्ये आदिलशहाकडून वेळापूर गाव इनाम मिळाले, अशी नोंद कागदपत्रांतून दिसून येते.

गावाच्या मध्यवर्ती भागात अर्धनारी नटेश्वराचे मंदिर आहे. मंदिराचा परिसर विस्तीर्ण असून, त्यात अनेक स्वतंत्र मंदिरे आहेत. प्रांगणाच्या समोरच भव्य चौकोनी आकाराची विपुल पाणी असलेली बारव आहे. बारवाच्या पायऱ्यांशेजारी एक यादव काळातील शिलालेख आहे. शालिवाहन शके 1227 मध्ये मार्गशीर्ष शुद्ध पंचमीच्या दिवशी सोमवारी यादव राजा रामचंद्र देव याचा अधिकारी ब्रह्मदेव राणा याने श्री वटेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार केला, असे कोरलेले आहे. त्या शिलालेखासमोर आयताकृती सभामंडप आहे. गर्भगृहात शिवलिंग आहे.

याच मंदिराच्या मागे नंदी मंडप आहे. त्यासमोर भाविक भक्तगणांना राहण्यासाठी ओवऱ्या देखील आहेत. ओवरीत शिलालेख आहे. या शिलालेखात यादवांचा राजा रामचंद्र देव याचा अधिकारी श्री जोईदेव याचा सहकारी ब्रह्मदेव राणा याचा भाऊ बोईदेव राणा यांनी मंदिराजवळ मठ व ओवऱ्या बांधल्या, असे नमूद आहे. मंदिरावर चालुक्य स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसून येतो. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे.

सभामंडपाच्या मध्यभागी नंदी आहे. सभामंडपात दोन सप्तमातृका शिल्पपट आहेत तसेच गणपती, महिषासुरमर्दिनी, चामुंडा देवी, सरस्वती देवीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर गजलक्ष्मी आहे. मुख्य गर्भगृहाच्या पीठावर हर गौरीची आलिंगन मुद्रेतील अत्यंत दुर्मिळ मूर्ती आहे. मूर्तीची प्रभावळ कीर्तिमुखाने सुशोभित केलेली आहे.

तिच्या दोन्ही बाजूस अष्टदिकपाल कोरलेले आहेत. शिवाच्या हातात त्रिशूळ, जपमाळा, पाच फण्यांचा नाग दिसून येतो. हर गौरीची मूर्ती अलंकारांनी सजवलेली आहे. शिवाच्या पायाजवळ नंदी आहे. तर गौरीच्या पायाजवळ तिचे वाहन घोरपड आहे. तिच्या शेजारी गणपती आहे. अशी विलोभनीय हर गौरीची मूर्ती राज्यात एकमेव आहे.

याच मंदिरासमोर वीरगळांचे संग्रहालय आहे. ते पुरातत्त्व खात्याच्या अधीन आहे. वेळापूर, म्हाळुंग, तोंडले, बोंडले परिसरातील सुमारे 150 हून अधिक वीरगळ या संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आले आहेत. हे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव वीरगळ संग्रहालय आहे. तेथून काही अंतरावर वटेश्वराचे महादेव मंदिर व जैन मंदिर आहे.

गावात भव्य वेस आहे. वेशीसमोर काळा मारुती मंदिर आहे. गावाबाहेरील बाजूस खंडोबा मंदिर आहे. मंदिराच्या प्रांगणात महादेव व काही मूर्ती दिसून येतात. शेजारी दीपमाळा व ओवऱ्याही आहेत. तेथून काही अंतरावर यादव काळातील मंदिर आहे. त्यास स्थानिक लोक गणिकेचा महाल म्हणतात. त्याशेजारी विस्तीर्ण तळे आहे. हा परिसर अत्यंत निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. याच मंदिरासमोर तीन मुखमंडप असलेले भैरवाचे मंदिर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. तिच्या शेजारी मोठी विश्रांतिका आहे, ती आजही सुस्थितीत आहे.

आमच्या वेळापुरात खूप वीरगळ आहेत. त्यांचे संग्रहालय देखील आहे. त्यामुळे वीरगळांचे गाव म्हणून वेगळी आहे. अर्धनारी नटेश्वर मंदिरामध्ये राज्यातील दुर्मिळ अशी हर गौरीची मूर्ती आहे, याचा आम्हास अभिमान वाटतो. राज्यभरातून वर्षभर असंख्य पर्यटक येथे येतात. त्यामुळे त्यांना सुविधा मिळाव्यात यासाठी येथे राज्य सरकारच्या वतीने पर्यटन निवास व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे.

- रजनीश बनसोडे, सरपंच, वेळापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT