Suicide Prevention Day
मृदुला घोडके
दरवर्षी १० सप्टेंबर रोजी "आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध दिवस" पाळला जातो. आत्महत्या या गंभीर सामाजिक समस्येबाबतचे समज, निषिद्धता, त्याची कारणं आणि आत्महत्येला प्रतिबंध इत्यादीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.
"आत्महत्या" हा शब्द ऐकला किंवा वाचला तरी मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात. सृष्टीची सुंदर निर्मिती, एक जीव, या जगात आणण्यासाठी ९ महिन्यांचा कालावधी लागतो.... अनेक स्वप्न रंगवली जातात..... ती साकार करण्याचे प्रयत्न केले जातात. असे काही प्रयत्न अपयशी ठरले, स्वप्नांचा चुराडा झाला, मोठा अपेक्षाभंग झाला, तर तोच जीव, अकस्मात आपल्या प्रियजनांना दुःखाच्या सागरात लोटून, अज्ञात सुखाच्या शोधात निघून जातो.... कधी परत न येण्यासाठी. त्याचे प्रियजन मात्र असंख्य अनुत्तरित प्रश्नांच्या भोवऱ्यात अडकून पडतात.... कदाचित कायमचे.
संपूर्ण जगात दरवर्षी सुमारे ८ लाख लोक आत्महत्या करतात. म्हणजे दर ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्यूरोच्या (NCRB) ताज्या आकडेवारीनुसार, २०२१मध्ये भारतात एकूण १ लाख ६४ हजार ०३३ मृत्यु आत्महत्येमुळे झाले. दररोज ४५० आत्महत्या घडल्या म्हणजे सुमारे साडे ३ मिनिटाला एका व्यक्तीने आपलं जीवन संपवलं. २०२० पेक्षा हा आकडा ७.२ टक्क्यांनी वाढला आहे.
या काळात महाराष्ट्रात, देशात सर्वाधिक २२ हजार २०७ आत्महत्या घडल्या तर त्या खालोखाल तामिळनाडूमध्ये १८ हजार ९२५ लोक आत्महत्येने मरण पावले. यामध्ये प्रामुख्याने कामगार, मजूर, गृहिणी आणि स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांचा समावेश आहे. ही स्थिती नक्कीच चिंताजनक आहे.
आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल का उचलतात?
आत्महत्येची अनेक कारणं असू शकतात. कौटुंबिक समस्या, आजारपण, नशेचं व्यसन, अपयश, नातेसंबंध गुंतागुंत, दारिद्र्य, बेकारी, दिवाळखोरी, प्रेमभंग, सामाजिक इभ्रत इत्यादी समस्यांतून आलेलं आत्यंतिक नैराश्य, हतबल झाल्याची आणि आपली काही किंमत नसल्याची तसंच एकाकीपणाची भावना अनावर झालेली व्यक्ती आत्महत्येचा मार्ग चोखाळू लागते.
संवाद महत्त्वाचा
आत्महत्येबाबत सामान्य जनांच्या मनात अनेक समज आढळतात. आपण आत्महत्या या विषयावर अजूनही उघडपणे आणि मोकळेपणाने बोलत नाही. असं बोललो तर किंवा कुणा नैराश्यग्रस्त व्यक्तीला आपण तिच्या मनात आत्महत्येचे विचार आहेत का असं विचारलं तर आपण त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करतो किंवा तसे विचार मनात घालतो असा एक समज आहे. खरं तर एखाद्या नैराश्यग्रस्त व्यक्तीला आत्महत्येबाबत आपण असं उघड विचारलं तर त्या व्यक्तीशी संवाद साधता येतो. आपल्या चिंतेची, भीतीची कुणीतरी दखल घेत आहे याची जाणीव त्या व्यक्तीला होते. आपल्याला समजून घेणारं कुणी तरी आहे असं वाटतं.
काही वेळा असं म्हटलं जातं की ' गर्जेल तो पडेल काय ' मला जीव द्यावासा वाटतो असं बोलणारी व्यक्ती, दुसऱ्यांना फक्त घाबरवत असते.... मानसिक दडपण आणते.... पण खरं तर तीच व्यक्ती अत्यंत मानसिक दडपणाखाली असते. आत्महत्येचा विचार बोलून दाखवणं म्हणजे मदतीसाठी शेवटचा प्रयत्न किंवा आर्त हाक आहे. त्या व्यक्तीला आपल्या जीवनातल्या वेदना संपवायच्या असतात आपलं जीवन नाही. जेव्हा जगण्याची वेदना मरणाच्या वेदनेपेक्षा जास्त वाटू लागते तेव्हा जगणं नकोसं होतं.
या संकेतांकडे नका करु दुर्लक्ष
आत्महत्या अचानक होतात असंही म्हटलं जातं. पण ज्यांना आपलं जीवन संपवायचं आहे, अश्या व्यक्ती अनेक संकेत देतात. हे संकेत काय असतात हे जाणून घेऊया..
१. वागण्या, बोलण्यात बदल :
कधी उघडपणे बोलून दाखवतात. त्यांच्या वागण्यात, बोलण्यात बदल दिसून येतात. एखादी मितभाषी व्यक्ती खूप बोलू लागते किंवा खूप बडबडी व्यक्ती शांत, एकटी राहू लागते.
२. आहारावर परिणाम :
भूक लागत नाही किंवा सारखी खाण्याची इच्छा होते.
३. झोप:
झोपेच्या पद्धतीत बदल होतात.
४. चिडचिडेपणा वाढतो :
चिडचिडेपणा वाढतो, सारखं रडू येत, लक्ष लागत नाही, बेपर्वा वृत्ती होते.
५. मौल्यवान वस्तू भेट देतात :
आपली मौल्यवान वस्तू दुसऱ्यांना अचानक भेट म्हणून दिली जाते, अचानक खूप आनंद व्यक्त केला जातो. हे सर्व धोक्याचे संकेत आहेत. हे संकेत दुसऱ्यांमध्ये आणि स्वतःमध्येही ओळखण्याइतपत आपण संवेदनशील असलं पाहिजे.
संकेत लक्षात येताच काय करावे? (Warning Signs of Suicide)
१. व्यक्तीशी संवाद साधा. आत्मीयता दाखवा. त्यांचं म्हणणं शांतपणे, संयमाने ऐकून घ्या. त्याची गंभीर दखल घ्या.
२. त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार आहेत का असं विचारायला कचरू नका. आत्महत्येसाठी त्यांच्याजवळ काही साधन आहे का ते विचारा. ते साधन काढून घ्या/ दूर करण्याचा प्रयत्न करा.
३. त्यांच्या मनातील भावनांचा कल्लोळ शांत झाल्यानंतर कदाचित ती व्यक्ती आपल्या समस्येबाबत तर्कसंगत विचार करू शकेल. परिस्थिती कठीण आहे असं वाटलं तर तज्ज्ञांची मदत मागा.
४. मानसिक आधार देणाऱ्या अनेक हेल्पलाईन आहेत. त्यांची मदत घ्या. त्यानंतरही त्या व्यक्तीच्या संपर्कात राहून त्यांची आत्मियतेने विचारपूस करा. असं केल्याने त्या व्यक्तीचा एकटेपणा कमी व्हायला मदत होते.
हेल्पलाईनवर संपर्क साधा (suicide prevention helpline mumbai pune maharashtra)
"कनेक्टिंग" नावाची एक स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात मानसिक आणि भावनिक आधार देण्याचं काम गेली १७ वर्ष करत आहे. ९९२२००४३०५ आणि ९९२२००११२२ या दूरध्वनी क्रमांकावर तणावग्रस्त व्यक्ती मोकळेपणाने बोलू शकतात. ही सेवा निःशुल्क आणि गोपनीय आहे. आणि वर्षाचे ३६५ दिवस दुपारी बारा ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू असते.
एका आत्महत्येचा सुमारे ११० जणांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम होत असतो. ज्यांच्या घरात आत्महत्या घडली आहे, ज्यांनी त्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना आणि त्यांच्या आप्तजनांना भावनिक आधार देण्यासाठी "कनेक्टिंग"ची 'सर्वायवर सपोर्ट' हेल्पलाईन असून त्याचा नंबर ८४८४०३३३१२ असा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.