'ज्योतिषांना ग्राहक संरक्षण कायदा लागू करावा. त्यातून भविष्य खोटे ठरले तर ग्राहकांना नुकसान भरपाई मागता येईल.'
सांगली : देशभरातील लोकसभा निवडणुकांचे अचूक भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाचार्यांना (Astrologers) अंधश्रद्धा निर्मूलन (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) समितीने २१ लाखांचे भविष्य जाहीर केले आहे. एरव्ही असं भाकीत प्रत्येक निवडणुकीवेळी ज्योतिषी वर्तवत असतात. नेतेमंडळीही या फसवणुकीला बळी पडतात, त्यामुळे अज्ञानी आणि भाबड्या लोकांमध्ये गैरसमज पसरतात आणि अंधश्रद्धा निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर समितीने देशातील सर्वच ज्योतिषांना हे आव्हान दिले आहे.
समितीच्या वतीने डॉ. हमीद दाभोलकर (Hamid Dabholkar), राहुल थोरात, सम्राट हटकर, रामभाऊ डोंगरे, मिलिंद देशमुख, प्रकाश घादगिने, विनोद वायंगणकर, प्रवीण देशमुख यांनी प्रसिद्धिपत्रक दिले आहे. त्यात याबाबतची आव्हानप्रक्रिया व प्रश्नावली दिली आहे. त्यानुसार या आव्हानप्रक्रियेत सहभागी होणाऱ्यांना समितीमार्फत ती प्रश्नावली दिली जाईल.
प्रश्नावलीमध्ये ‘अंनिस’ने ज्योतिषांना काही प्रश्न विचारले आहेत. त्यात या निवडणुकीमध्ये टी. शैलजा, नितीन गडकरी, राहुल गांधी, महुआ मल्होत्रा, कंगना राणावत यांना किती मते पडतील, कोलकत्ता, उत्तर, नालंदा, रायपूर, बारामती, आग्रा, बेल्लारी मतदारसंघातून कोण विजयी होईल, वाराणसी, बुलडाणा, चांदणी चौक, लडाख, वेल्लोर, भुवनेश्वर या मतदारसंघात सगळ्यात कमी मते कोणाला पडतील, संपूर्ण भारतात सर्वांत कमी मते कोणत्या उमेदवाराला पडतील, कोणत्या मतदारसंघात ‘नोटा’ला अधिक मतदान होईल, पाच हजारांहून कमी मताधिक्य किती उमेदवारांना मिळेल, या प्रश्नांची अचूक उत्तरे ज्योतिषांनी देणे अपेक्षित आहे.
भविष्यासाठीची आधार पद्धत सांगावी लागेल. त्यात उमेदवाराची जन्मकुंडली, हस्तरेषा शास्त्र, अंकशास्त्र, टॅरो कार्ड, राशीभविष्य, नाडीभविष्य, होरा शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धत, प्राणी-पक्षी यांचा वापर करून वर्तवलेले भविष्य किंवा अर्ज भरताना काढलेला मुहूर्त, प्रचाराचा काढलेला शुभमुहूर्त, उमेदवाराच्या नावातील आद्याक्षरे.
या प्रश्नावलीत एकूण चार प्रमुख प्रश्न असून प्रत्येक प्रश्नांच्या अंतर्गत काही उपप्रश्न आहेत. प्रत्येक योग्य उत्तरला पाच गुण देण्यात येतील. एकूण शंभर गुण अशी या प्रश्नावलीची रचना आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताना ते उत्तर ज्योतिषाची कोणती पद्धत आणि कशी वापरून काढले, याची सविस्तर माहिती देणे अत्यावश्यक आहे. या माहितीसाठी अर्धे गुण असतील आणि अर्धे गुण उत्तरासाठी असतील.
यासाठीची प्रवेशिका, उत्तरासहित अधिकृत प्रश्नावली आणि ‘अंधश्रध्दा निर्मूलन समिती, महाराष्ट्र’ या नावे काढलेला रुपये ५००० (रुपये पाच हजार) प्रवेश शुल्काचा धनाकर्ष (डी. डी.) सीलबंद पाकीटातून दि. २५ मे २०२४ पर्यंत रजिस्टर पोस्टाने कार्तिक अपार्टमेंट, एफ-४, सहारा चौक, संजयनगर, सांगली - ४१६४१६. येथे पाठवावा. निवडणूक आयोगाने अधिकृतपणे सर्व निकाल त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत परीक्षक समितीच्या वतीने योग्य तो अधिकृत निकाल जाहीर करण्यात येईल.
ज्योतिषांना ग्राहक संरक्षण कायदा लागू करावा. त्यातून भविष्य खोटे ठरले तर ग्राहकांना नुकसान भरपाई मागता येईल. ‘फलज्योतिष हे शास्त्र नाही,’ ही आमची भूमिका आहे. चमत्कार आणि फलज्योतिषमधला फोलपणा ‘अंनिस’ने शास्त्रीय मांडणीतून सिद्ध केला आहे. या बुवाबाजीतून आर्थिक, सामाजिक, लैंगिक शोषण होऊ नये, यासाठी संघटनेने चमत्कार आणि फलज्योतिषाची वारंवार शास्त्रीय चिकित्सा केली आहे. या स्पर्धेमागे, तसेच चिकित्सेमागे फलज्योतिषातील अवैज्ञानिक बाजू समाजासमोर यावी, हाच उद्देश आहे, असे ‘अंनिस’चे कार्यकर्ते राहुल थोरात यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.