Baramati Lok Sabha Result  sakal
लोकसभा २०२४

Baramati Lok Sabha Result : ताईंनी एक लाखांचा टप्पा पार करताच ; कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत त्यांच्या नावाच्या दिल्या घोषणा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एक, दोन, तीन अशा प्रत्येक फेरीत सुप्रिया सुळे (ताई) यांच्या वाढत जाणाऱ्या मताधिक्‍याने कार्यकर्ते सुखावले, इकडे अजित पवार (दादा) व सुनेत्रा पवार (वहिनी) यांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील ताण आणखी गडद झाला, तेवढ्यात सातव्या फेरीमध्ये अचानक सव्वासातशे मतांची वहिनींना आघाडी मिळाली आणि कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

‘तुम्ही बघाच, खडकवासला कसा ताईंचा लीड तोडतोय ते,’ दादा- वहिनींच्या कार्यकर्त्यांमधील हा दांडगा उत्साह क्षणभंगुर ठरला. पुढच्या बहुतांश फेऱ्यात ताईंच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचत असताना इकडे दादावहिनींच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर मात्र मळभ दाटण्यास सुरुवात झाली. ताईंनी एक लाखांचा टप्पा पार करताच, कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत त्यांच्या नावाच्या घोषणा दिल्या.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये थेट बारामती लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने थेट लढत होती. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये त्यावरुन जोरदार रस्सीखेच सुरू होती.

मंगळवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच पहिल्या फेरीत सुप्रिया सुळे यांनी ६९४१ मतांची आघाडी घेतली. मताधिक्‍याने सुरुवात झाल्याने ताईंच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर हसू झळकले.

त्यानंतर दुसऱ्या फेरीची आकडेवारी घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनी आकड्यांची जुळवाजुळव केली, दुसऱ्या फेरीतही सुळे यांना साडे चार हजारांची आघाडी मिळाली, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या फेरीपर्यंत ताईंना मताधिक्‍य मिळत गेल्याने मतमोजणी केंद्रावरील त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद उसळू लागला.

तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव वाढू लागला. मात्र, सातव्या फेरीमध्ये बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर यांनी ताईंना दिलेली साथ कमी पडत असताना आणि तिकडे भोर व खडकवासला मतदारसंघानी मात्र वहिनींना साथ दिल्याने या फेरीत वहिनींनी ७२९ मतांची आघाडी मिळाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही.

केंद्रामधील प्रत्येक बूथवर व्यवस्थित आकडे नोंदवून घेतल्यानंतर त्यांची बेरीज झाल्यानंतर अंतिम आकडेवारी पक्षाच्या मुख्य नोंदणी करणाऱ्या पदाधिकाऱ्याकडे देण्याचे काम प्रतिनिधी करत होते. कमीत कमी वेळेत सर्वांना माहिती कशी पोहोचले, यासाठी कार्यकर्त्यांची धडपड सुरू होती.

पुढच्या प्रत्येक फेऱ्यांमध्ये ताईंना मिळणाऱ्या मताधिक्‍यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा आनंद पसरला. इकडे भोर, खडकवासला विधानसभा मतदारसंघावर भिस्त असणाऱ्या दादा व वहिनींच्या कार्यकर्त्यांकडून ‘खडकवासला ताईंचे लीड नक्कीच तोडणार’ हा आत्मविश्‍वास एकमेकांना बळ देत होता.

परंतु, त्यानंतरही खडकवासला मतदारसंघामध्ये वहिनींना चांगली मते मिळत असताना, दुसरीकडे अन्य मतदारसंघ मात्र ताईंच्या पाठीशी उभे राहिले.

चौदाव्या फेरीनंतर दादा- वहिनींच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह संपला, सुप्रिया सुळे यांची विजयाकडे वाटचाल होऊ लागली. त्यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त केला जाऊ लागला, शेवटी ताईंच्या व शरद पवार यांच्या नावाच्या घोषणा देत विजयाचा आनंद साजरा केला.

- मतदारांसमोर नतमस्तक सुप्रिया सुळे

बारामती ‘‘गेल्या सहा दशकांपासून असलेले ऋणानुबंध बारामतीकरांनी माझ्या विजयातून पुन्हा एकदा दाखवून दिलेले आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघातील तसेच विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला, त्याबद्दल मतदारांपुढे मी नतमस्तक होते,’’ अशा शब्दांत बारामतीच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांनी विजयानंतरची पहिली प्रतिक्रिया दिली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘गेले दोन महिने बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता.

बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी कायमच माझ्यावर विश्वास व्यक्त केला होता, मतदारांचे प्रश्न सोडविण्यासह या मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी पुढील पाच वर्षे मी सर्वस्व पणाला लावून काम करेन. सर्वच मतदारांनी मला भरभरून मते दिली आहेत, या मतदारसंघाची आन, बान व शान कायम राखण्यासाठी मी माझा पूर्ण वेळ देईन.’’

निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व सहाही विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक मतदाराने ही निवडणूक आपली आहे. या भावनेने काम करून मला विजय मिळवून दिला, त्याबद्दल मी त्यांच्यापुढे नतमस्तक होते.

- सुप्रिया सुळे, खासदार

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये जनतेने दिलेला कौल मी नम्रपणे स्वीकारते. हाती आलेले निकाल हे अनपेक्षित असले तरी या निकालातून आम्ही आत्मपरीक्षण करू. नव्याने पुनर्बांधणी करू.

ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दर्शवून मला मतदान केले, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. तसेच, सर्व कार्यकर्ते व जनता यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद देते.

मात्र, जनसेवेचा माझा प्रवास इथेच संपत नाही. मी जनसेवेस सदैव तत्पर आहे आणि असेन.

- सुनेत्रा पवार, पराभूत उमेदवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT