नवी दिल्ली : भाजपची तिसऱ्यांदा सत्तावापसी राज्यघटना बदलाची असेल, हा विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने तापविलेला मुद्दा खोडून काढण्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभांमध्ये घटनाबदलाच्या आरोपांचा इन्कार करताना डॉ. आंबेडकरांनाही घटना बदलणे शक्य होणार नाही, असे म्हणून विरोधकांचे आरोप फेटाळले. तरी या मुद्द्यावर भाजपची राजकीय कोंडी झाल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.
विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार घटनेसारख्या संवेदनशील विषयावर निवडणूक काळात कोणतीही जोखीम नको यासाठी पंतप्रधान मोदी आणि भाजपची धावाधाव सुरू आहे. भाजपचे कर्नाटकातील नेते अनंतकुमार हेगडे यांनी घटनाबदलाचे विधान केल्याचे प्रसिद्ध केले होते. त्यानंतर राजस्थानमधील नागौरच्या भाजप उमेदवार ज्योती मिर्धा यांचेही संभाव्य घटनाबदलासंदर्भातील विधान चर्चेत आल्यानंतर कॉंग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस यापक्षांनी भाजपला लक्ष्य करणे सुरू केले आहे.
उत्तर प्रदेशातील मेरठ मधील भाजप उमेदवार अरुण गोविल यांचीही राज्यघटनेतील संभाव्य बदलाशी संबंधित विधाने व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यघटना बदलण्यासाठीच भाजपला ४०० पेक्षा जास्त जागा हव्या आहेत, असा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. काँग्रेस सरचिटणीस मोहन प्रकाश यांनी या मुद्द्यावर भाजपची कोंडी झाल्याचे सांगितले.
सर्वेक्षण संस्था ‘सी वोटर्स’चे संपादक खालिद अख्तर यांनी सांगितले, की निवडणुकीत नुकसान करणारा राजकीय मुद्दा विरोधकांना सहजासहजी मिळेल, अशी कोणतीही संधी पंतप्रधान मोदी देणार नाहीत. गरीब, दलित, ओबीसी मतदार भाजपची मतपेढी आहे आणि घटनाबदलातून आरक्षण संपण्याची भिती या मतदारांना वाटली तर निकालांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पंतप्रधानांनी पुढे येऊन हा संशय दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.
घटना तर काँग्रेसनेच बदलली : अनुराग ठाकूर
देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना दिली. पण त्यांना अपमानित करण्याचे काम काँग्रेसने केले, असा आरोप केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी केला. ठाकूर म्हणाले, की बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेत काँग्रेसने त्यांच्या काळात ६२ वेळा सुधारणा केल्या. एकदा नाही तर वारंवार सुधारणा करू, असे राजीव गांधी यांनी सांगितल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आता राहुल गांधी म्हणताहेत, की घटनेत सुधारणा होऊ देणार नाही. ते इतिहासाकडे मागे वळून बघत नाहीत. दुसरीकडे, राज्यघटनेचा आदर करत पंतप्रधान मोदींनी सर्वांच्या विकासाचा ध्यास घेतला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.