Bhaskar Jadhav on BJP eSakal
लोकसभा २०२४

Bhaskar Jadhav : 'इतर पक्ष संपवून स्वतःचा पक्ष वाढवणं भाजपच्या अंगलट येणार'; नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?

शिवसेना हा सर्वांत मोठा प्रादेशिक पक्ष होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवरील नेते आहेत. पण दोन गुजराती नेत्यांनी मराठी माणसांनाच हाताशी धरून हे दोन्ही पक्ष फोडले.

दीपा कदम

Lok Sabha 2024 : शिवसेना हा सर्वांत मोठा प्रादेशिक पक्ष होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवरील नेते आहेत. पण दोन गुजराती नेत्यांनी मराठी माणसांनाच हाताशी धरून हे दोन्ही पक्ष फोडले. भाजपने स्वत:चा पक्ष मोठा करण्यासाठी जनतेची कामे करून लोकांच्या मनात घर करावे. त्यांचा पक्ष आपोआप मोठा झाला असता. पण त्यांनी इतर पक्ष संपवून त्यांचा पक्ष वाढविण्याचा केलेला प्रकार त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही, असे मत शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केले. 'सकाळ'ने घेतलेली विशेष मुलाखत.

प्रश्न : कोकणात निवडणुकीचे वातावरण कसे आहे आणि प्रचार कसा सुरू आहे?

उत्तर : विरोधकांचा उमेदवार अद्याप निश्चित होत नाही. परंतु आज विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्व वयोगटातील जनता उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेली होती. ते पाहता महायुतीमध्ये जे दोन पक्ष उमेदवारीसाठी भांडताहेत ते देखील उमेदवारी नको म्हणायला लागतील हे निश्चित. सर्व जातीधर्माचे लोक आमच्यासोबत प्रचाराला बाहेर पडत आहेत. साधारण मुस्लिम पुरुष प्रचाराला किंवा अर्ज भरण्याच्या दिवशी येतात. मात्र यावेळी मुस्लिम महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. महाविकास आघाडीमधील सर्व पक्ष एकदिलाने कोकणात निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरला आहे. कोकणातील आघाडीच्या दोन्ही जागा आजच निवडून आलेल्या आहेत. चार जूनची मतमोजणी ही औपचारिकता आहे.

प्रश्न : कोणत्या मुद्द्यांवर यंदा लोकसभा निवडणूक लढवली जात आहे?

उत्तर : लोकसभा निवडणुकादेखील साधारण कोकणामध्ये स्थानिक मुद्द्यांवर लढविल्या जात होत्या. यंदा मात्र कोकणातल्या दोन्ही जागांवर राष्ट्रीय पातळीवरील मुद्द्यांची चर्चा सुरु आहे. नाणार रिफायनरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आहेत. बारसूच्या विरोधात शिवसेनेने आंदोलने केली आहेत. देशातील वाढती महागाई, गॅसच्या वाढणाऱ्या किंमती, दोन लाख कोटी रोजगार आणि १५ लाख रुपये देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वी दिलेली आश्वासने, संविधान, लोकशाही आणि इलेक्ट्रोरल बॉन्ड या मुद्द्यांवरुन कोकणात निवडणूक लढवली जात आहे. केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण आहे हे नक्की. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा शिवसेनेसोबत झालेल्या गद्दारीने कोकणी माणूस हा पेटून उठलेला आहे.

प्रश्न : कोकण आणि शिवसेनेचे नाते विशेष आहे. शिवसेना दुभंगल्यानंतर कशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत?

उत्तर : शिवसेनेच्या फुटीवर इथल्या कोकणी माणसाच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत. ‘ठाकरे’ या नावावर कोकणी माणसाचे अपार प्रेम आहे. शिवसेना घडविण्यात कोकणाचे अमूल्य योगदान आणि त्यागही आहे. शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी हे देखील कोकणातले. आता जे शिवसेनेच्या नावाने खडे फोडतात त्यांना मुख्यमंत्रीपद शिवसेनेनेच दिले. शिवसेनेने कोकणाला मुख्यमंत्रीपदापासून केंद्रातील मंत्रिपदापर्यंत सर्व काही भरभरुन दिले आहे.

भाजपने एकनाथ शिंदेंच्या मदतीने शिवसेना कावेबाज पध्दतीने फोडली आहे, ते कोकणी माणसाला अजिबात पटलेले नाही. कदाचित शिवसेना अशा पध्दतीने फोडली नसती आणि सातत्याने शिवसेनेला निवडून दिल्यानंतर ‘अॅन्टी इन्कम्बन्सी’ झाली असती तर ते नैसर्गिक असले असते. पण शिवसेनेला संपवण्यासाठी रचलेले कुभांड जनतेला पटलेले नाही. त्यामुळे जुने जाणते शिवसैनिक जे मधल्या काळात संघटनेत कार्यरत नव्हते. ते आता सभा, मिरवणुकांना दिसतात.

आजच विनायक राऊतांचा उमेदवारी अर्ज भरायला जाताना एक अगदी वयोवृध्द महिला सुहासिनी परब देखील पायी चालत होत्या. मीच त्यांना म्हणालो, ‘या वयात कशाला उन्हातून चालताय? तर ती म्हणाली की या वयात आम्ही शिवसेना उभी केली. आमची शिवसेना गिळायला देवू? नरड्याचा घोट घेवू त्यांच्या.’ इतका संताप लोकांमध्ये दिसतो. आम्ही लोकांमध्ये फिरतोय, एकच सांगतो ‘टायगर अभी जिंदा है’.

प्रश्न : कोकणात पक्षांतर्गत वाद चालू होता, तो मिटला का? तुम्ही शिवसेनेतून बाहेर पडणार अशीही चर्चा सुरू आहे.

उत्तरः मला विरोधी पक्षाने वाट्टेल तो त्रास दिला तरी मी कुठेही जाणार नाही. २०२४ पर्यंत उध्दव ठाकरेंची साथ सोडायची नाही. त्यांना पुन्हा राजगादीवर बसवायचे, तोपर्यंत मागे हटायचे नाही, असे माझे विधान होते, त्याचा विपर्यास केला गेला. कोकणामध्ये भाजप आणि शिंदेंची लोकं ठाकरे कुटुंबियांविषयी वाट्टेल ते बोलतात. त्यांना त्यांच्याच पातळीवर येऊन मी उत्तर देतो.

प्रश्न : तुम्ही शिवसेनेत येण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतात. आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही फुटलेत. कसे पाहताय या घटनांकडे?

उत्तर : शिवसेना फुटली तेव्हापासून मी इतिहासातील एका घटनेपर्यंत येऊन थांबतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य आपल्याच लोकांनी संभाजी महाराजांचा घात करुन संपवले त्याची मला आठवण होते. इतिहासाची पुनरावृत्ती झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष मराठी माणसांनी स्थापन केले. शिवसेना हा सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवरील नेते आहेत. पण दोन गुजराती नेत्यांनी मराठी माणसांनाच हाताशी धरुन हे दोन्ही पक्ष फोडले. भाजपने स्वत:चा पक्ष मोठा करण्यासाठी लोकांची काम करुन लोकांच्या मनात घर करावे. त्यांचा पक्ष आपोआप मोठा झाला असता. पण त्यांनी इतर पक्ष संपवून त्यांचा पक्ष वाढविण्याचा केलेला प्रकार त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही.

प्रश्‍न : विधानसभेत तुमच्यासोबत निवडून आलेले जवळपास ४१ आमदार आणि १३ खासदार आज तुमच्यासोबत नाहीत. तुम्हीही त्यांच्यासोबत गेला असतात तर संघर्ष टळला असता. सुखाची झोप आली असती.

उत्तर : सुखाची झोप तर मला आताही येते. उलट जे शिवसेना फोडून निघून गेलेत त्यांची झोप उडालेली आहे. त्यांच्या १३ पैकी सर्व विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळालेली नाही. जाहीर केलेली उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा मागे घ्यावी लागतेय, इतकी वाईट परिस्थिती आहे. खरी गंमत तर आगामी विधानसभा निवडणुकीत येणार आहे. विधानसभेवेळी भाजप मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांपैकी कोणालाच सोबत घेणार नाहीत, असे मी खात्रीने सांगतो. भाजपने यांना वाऱ्यावर सोडल्यावर कोणाची झोप उडते ते पाहू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT