''इंडिया आघाडीला बळकट करण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांना साथ द्यावी.’’
निपाणी : मोदी सरकार (Modi Government) विविध आश्वासने देऊन सत्तेवर आले. पण, एकाचीही पूर्तता केली नाही. विरोधकांना संपविण्यासाठी कुठल्याही थराला ते गेले आहेत. दिल्लीत उत्तमरीतीने सरकार चालविले जात असताना, मोदींनी अरविंद केजरीवाल यांना कारागृहात पाठवले. त्यामुळे मोदींची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला.
चिक्कोडी लोकसभा (Chikkodi Lok Sabha) मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी (Priyanka Jarkiholi) यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली निपाणीत बुधवारी (ता. १) सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी होते.
शरद पवार म्हणाले, भाजपने (BJP) विविध प्रकारची अस्त्रे वापरून विरोधकांना अडकवण्याचे काम सुरू ठेवले आहे. शिवाय जनतेला भूलथापा देण्याचे कामही बंद नाही. याउलट राज्यातील काँग्रेस सरकारने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि गरिबांसाठी पंचहमी योजना अंमलात आणल्या आहेत. तरुणांकडे मोठी ताकद असून, त्यांना मोदी सरकार दुष्ट प्रवृत्तीकडे घेऊन जात आहे. परिणामी, देशात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुढील काळात घटक पक्षांनी एकत्र येऊन मोदी सरकारला उलथवणे गरजेचे आहे.
श्री. पवार म्हणाले, देशातील यावेळच्या निवडणुकीकडे जगातील लोकांचे लक्ष लागले आहे. अनेक देशांतील लोक निवडणूक वातावरण पाहण्यासाठी आलेले आहेत. मोदी यांची हुकूमशाही किती दिवस सहन करणार. २०१४ मध्ये पहिल्यांदा ते सत्तेवर आले. त्यावेळी ते ५० दिवसांत पेट्रोलचे दर कमी करणार होते. आता मोदी यांची सत्ता येऊन ३६५० दिवस झाले तरी, पेट्रोलचे दर कमी झाले नाहीत. आज पेट्रोलचे दर शंभरावर आहेत. विरोधक संपवून देशात एकाधिकारशाही करण्याचे त्यांचे कारस्थान आहे. लोकशाही या लोकांना पसंत नाही, हे त्यांच्या कृतीतून दिसून येते.
अहमदाबादचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी, भाजप सरकारने हजारो युवकांचा रोजगार हिरावला आहे. शेतमालासह इतर जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावून सर्वांचे कंबरडे मोडले आहे. शिवाय भाजप काळातच महागाई वाढली आहे. देशात काँग्रेसची सत्ता आल्यास पाच वर्षांत ३० लाख लोकांना सरकारी नोकऱ्या, गरीब कुटुंबातील एका महिलेला वर्षाला एक लाख रुपये दिले जातील. पदवी आणि डिप्लोमा झालेल्या बेरोजगार युवकांना आर्थिक मदत व शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, ‘‘राज्यातील सरकार गरीब, शेतकरी आणि कामगारांचे आहे. काँग्रेस सरकार आल्यानंतर पंचहमी योजना अंमलात आणून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले असून, ७० वर्षांत ही पहिलीच ऐतिहासिक योजना आहे. राष्ट्रवादी पक्षाने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला बळकट करण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांना साथ द्यावी.’’
सहकाररत्न उत्तम पाटील म्हणाले, ‘‘कार्यकर्ते, नेतेमंडळी आणि राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. गेल्या दहा वर्षांत महागाईने कळस गाठला आहे. भाजपच्या काळात मतदारसंघात कोणतीही विकासकामे झाली नाहीत. राजकीय शक्ती आणि वारसा नसतानाही गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत आपण दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. कोणत्याही आमिषाला बळी न पडता काँग्रेसला मताधिक्य द्या.
यावेळी अशोककुमार असोदे, राजू खिचडे, अरुण निकाडे, नानासाहेब पाटील, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, सोनू कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. के. डी. पाटील यांनी स्वागत केले. सभेस मंत्री डी. सुधाकर, युवा उद्योजक अभिनंदन ऊर्फ बच्चू पाटील, राहुल जारकीहोळी, पृथ्वीराज पाटील, दत्तचे संचालक इंद्रजित पाटील, सुनील पाटील-भोज, आनंद गिंडे, नगरसेवक रवींद्र शिंदे, निरंजन पाटील-सरकार, गजानन कावडकर, सतीश पाटील, गोपाळ नाईक, इम्रान मकानदार, शिरीष कमते, धनश्री पाटील, शुभांगी जोशी, सुनीता जोशी यांच्यासह निपाणी मतदारसंघातील कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.
मोदी यांची हुकूमशाही किती दिवस सहन करणार? २०१४ मध्ये पहिल्यांदा ते सत्तेवर आले. त्यावेळी ते ५० दिवसांत पेट्रोलचे दर कमी करणार होते. आता मोदी यांची सत्ता येऊन ३६५० दिवस झाले तरी, पेट्रोलचे दर कमी झाले नाहीत. आज पेट्रोलचे दर शंभरांवर आहेत. विरोधक संपवून देशात एकाधिकारशाही करण्याचे त्यांचे कारस्थान आहे. लोकशाही या लोकांना पसंत नाही, हे त्यांच्या कृतीतून दिसून येते, असे पवार म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.