चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी (Priyanka Jarkiholi) यासुद्धा जायंट किलर ठरल्या आहेत.
बेळगाव : अवघ्या २६ वर्षांच्या तरुणाने केंद्रीय मंत्र्यांचा पराभव केला आहे. कर्नाटकातील बिदर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सागर खांड्रे (Congress candidate Sagar Khandre) जायंट किलर ठरले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांचा सव्वा लाखापेक्षा अधिक मतांनी पराभव केला आहे. अवघ्या २६ वर्षे वयाच्या सागर यांना उमेदवारी देत यावेळी काँग्रेसने बिदर मतदारसंघात धक्कातंत्र अवलंबिले होते. अर्थात सागर यांचे वडील ईश्वर खांड्रे हे कर्नाटकातील काँग्रेसचे नेते व सध्या कॅबिनेट मंत्री आहेत.
आजोबा भिमण्णा खांड्रे हे लिंगायत समाजातील मोठे नेते व काँग्रेस पक्षातील मोठे नाव. त्याचा फायदा सागर यांना या निवडणुकीत झाला. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी (Priyanka Jarkiholi) यासुद्धा जायंट किलर ठरल्या आहेत. २७ वर्षे वयाच्या प्रियंका यांनी भाजपचे विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचा पराभव केला आहे. जोल्ले यांच्या पत्नी शशिकला या कर्नाटकाच्या माजी मंत्री आहेत.
शिवाय सध्या त्या निपाणी मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्यामुळे चिक्कोडी मतदारसंघात जोल्ले दांपत्याचा मोठा प्रभाव आहे, पण प्रियंका यांनी मोठ्या मताधिक्याने जोल्ले यांचा पराभव केला आहे. अर्थात प्रियंका यांच्या विजयात त्यांचे वडील व जिल्हा पालकमंत्री सतीश यांचा मोठा वाटा आहे. सतीश यांनी नियोजनबद्धरीतीने केलेला प्रचार व सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची कार्यप्रणाली याचा फायदा प्रियंका यांना झाला आहे.
भगवंत खुबा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. ७ जुलै २०२१ रोजी त्यांना रसायन व अपारंपरिक ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री करण्यात आले. २०१४ पासून ते सातत्याने बिदर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर भगवंत खुबा यांचा बिदर लोकसभा मतदारसंघातील प्रभाव वाढला होता, पण बिदर जिल्ह्यातील भाजपच्या काही नेत्यांसोबत मात्र त्यांचे मतभेद होते. अनेकदा ते मतभेद चव्हाट्यावरही आले होते. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत खुबा यांना नाराजीचा फटका बसणार, अशी चर्चा सुरू होती.
या मतदारसंघात मराठा व लिंगायत समाजाचा प्रभाव आहे. अखिल भारतीय वीरशैव महासभेचे अनेक वर्षे अध्यक्ष राहिलेल्या भिमण्णा खांड्रे यांच्या कुटुंबातील उमेदवार खुबा यांच्या विरोधात उतरविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. त्यानुसार राज्यातील मंत्री असलेल्या ईश्वर खांड्रे यांचे सुपुत्र सागर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. या निर्णयाचा काँग्रेसला फायदा झाल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.