मतदारसंघ : बिकानेर (राजस्थान)
नवी दिल्ली : काँग्रेसपासून अंतर राखणारा लोकसभा मतदारसंघ म्हणूनही बिकानेरची ओळख आता भाजपने सलग चारवेळा विजय मिळवून आपला हक्काचा मतदारसंघ अशी तयार केली आहे. त्यामुळे यंदा तरी काँग्रेस पक्ष भाजपला दमदार आव्हान देईल काय, याची उत्सुकता आहे. इथे लढत आहे मोदी सरकारचे कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल आणि काँग्रेसचे गोविंदराम मेघवाल यांच्यात.
२००९ मध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव झालेल्या या मतदारसंघाचे तेव्हापासून सलग तीनदा प्रतिनिधित्व करणारे अर्जुनराम मेघवाल यांना पुन्हा एकदा भाजपने मैदानात उतरविले आहे. मोदी सरकारमध्ये संसदीय कार्य राज्यमंत्री ते कायदा मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार अशी बढती मिळालेल्या अर्जुनराम मेघवाल यांना रोखण्यासाठी काँग्रेसने राज्यातील माजी मंत्री गोविंद राम मेघवाल यांना त्यांच्याविरुद्ध रिंगणात उतरविले आहे.
काँग्रेसने १९८०, १९८४, १९९१, १९९८ आणि १९९९ असा पाच वेळा हा मतदारसंघ जिंकला असला तरी काँग्रेसला बिकानेरवर सलग वर्चस्व राखता आलेले नाही. २००९ मध्ये हा मतदार अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर तेव्हापासून आतापर्यंत अर्जुनराम मेघवाल हेच सलग तीन निवडणुकांमध्ये बिकानेरचे प्रतिनिधित्व करत आहेत.
येथे अनुसूचित जातीच्या मतदारांचे प्रमाण २३.७ टक्के तर मुस्लिम मतदारांचे प्रमाण साडेपंधरा टक्के आहे. काँग्रेसने यावेळी बिकानेरमधून गोविंद राम मेघवाल यांना उमेदवारी दिली आहे. राज्यात अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार असताना ते मंत्री राहिले होते. सलग तीनदा निवडणूक जिंकल्यानंतर अर्जुनराम मेघवाल यांच्याविरोधात तयार झालेली जनभावना आपल्याला यश मिळवून देईल, अशी खात्री गोविंद राम मेघवाल यांना वाटत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.