‘सांगली’च्या गोंधळात ‘हातकणंगले’तील प्रभावी जागा पणास लावायची का, याची चिंता तेथील शिवसैनिक व्यक्त करताना दिसत आहेत.
सांगली : सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदार संघात शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेसची अभूतपूर्व कोंडी केली आहे. या स्थितीत राज्यभर गोंधळ निर्माण झाला आहे. त्याची चिंता मात्र शेजारील हातकणंगले मतदार संघातील (Hatkanangale Lok Sabha) शिवसैनिकांना लागली आहे. तेथे सत्यजित पाटील यांना शिवसेनेकडून मैदानात उतरवण्यात आले आहे. ते राजू शेट्टींना (Raju Shetti) टक्कर देतील, अशी चर्चा आहे.
अशा वेळी वाळवा आणि शिराळा मतदार संघातील वसंतदादा समर्थक गटाचे मतदान निर्णायक आणि प्रभावी आहे. त्यावर सांगलीतील गोंधळाचा गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याबाबत उद्धव ठाकरे यांना सावध करण्याच्या हालचाली सुरू असून विचारमंथन केले जात आहे.
‘सांगलीत कोंडी कराल तर महाराष्ट्रात कोंडी करू,’ असा इशारा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसला दिला आहे. हा इशारा देण्यामागे हातकणंगले मतदार संघातील संभाव्य घडामोडींचा अंदाज राऊतांना आला आहे. परंतु, वाळवा आणि शिराळा मतदार संघातील मतदान हे पक्ष म्हणून काँग्रेसचे असले, तरी त्यावर वसंतदादा घराण्याचा प्रभाव अधिक आहे. हे मतदान पारंपरिक जयंत पाटील यांच्या विरोधातील गणले जाते.
‘हातकणंगले’त राजू शेट्टी आणि सत्यजित पाटील यांच्यात सरळ लढत झाली तर काँग्रेसचे मतदान अर्थातच निर्णायक ठरू शकते, इतके प्रभावी असल्याची जाणीव काँग्रेसने तेथील शिवसैनिकांना करून दिली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे दुसरे जिल्हाप्रमुख अभिजित पाटील हे मूळचे काँग्रेसचे आहेत. त्यांना या संपूर्ण बाबींची जाणीव असल्याची चर्चा आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाने, ‘पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला ‘मशाल’ हवी,’ असा आग्रह करत ‘कोल्हापूर’च्या बदल्यात सांगली मतदार संघावर दावा केला. त्यानंतर परिस्थिती पालटली आणि हातकणंगले मतदार संघातून शिवसेनेच्या सत्यजित पाटील यांना मैदानात उतरवण्यात आले. तेथे मशाल चिन्ह आले. त्यामुळे, ‘आता `सांगली’वरील दावा का सोडत नाही,’ असा सवाल शिवसेनेला करण्यात येत आहे. राज्यातील काँग्रेस भलतीच सावध आहे. ठाकरे आघाडी तोडतील की काय, अशी भीती त्यांना आहे. ती भीती वाळवा, शिराळ्यातील काँग्रेस समर्थकांना असण्याचे कारण नाही. ते पक्षासोबतच वसंतदादा गटाशी बांधील आहेत.
त्यामुळे ‘सांगली’च्या गोंधळात ‘हातकणंगले’तील प्रभावी जागा पणास लावायची का, याची चिंता तेथील शिवसैनिक व्यक्त करताना दिसत आहेत. याबाबत खासदार संजय राऊत यांना कल्पना देण्यात आल्याची चर्चा आहे, मात्र ती उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचली आहे का, याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत. या परिस्थितीचा अंदाज घेऊन उमेदवार सत्यजित पाटील हेच यावर मंथन करतील, असे काही कार्यकर्त्यांनी खासगीत सांगितले.
वाळवा आणि शिराळा तालुक्यात काँग्रेसकडे प्रभावी नेतृत्व नाही, मात्र काँग्रेसचा प्रभाव आहे. तेथील मतदार विखुरलेला असला, तरी त्याला दिशा देण्याचे काम करणारे दुसऱ्या फळीतील नेते आहेत. त्यांनी सध्या हाताची घडी आणि तोंडावर बोट, अशी भूमिका घेतली आहे. त्यांनी ‘वेट अँड वॉच’चा निर्णय घेतल्याने शिवसेना आणि राजू शेट्टी हेही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.