बिळाशी, मांगरुळहून रिळेच्या माळावर मानेंची प्रचाराची गाडी दिसली. ‘मोदी येणार. माने येणार,’ पावलेवाडीच्या मार्गावर म्हशीवाल्यानं धनुष्यबाणावर बोट ठेवलं.
Shirala Assembly Constituency : शाहूवाडी तालुक्यातल्या बांबवडेतून सरुडचा रस्ता धरला. कडवी नदी ओलांडून कोकरुडच्या दिशेने निघालो. वारणा नदीच्या पलीकडे सांगली जिल्ह्याची हद्द सुरू. चिंचोलीतून पुढे जात खुजगावच्या रस्त्यावर गाडीला ब्रेक लावला. ‘कोण जोरात..?’ रस्त्यावर थांबलेल्या शेतकऱ्याला डिवचलं. ‘आबा जवळचा. ह्यो इथं पल्याड राहतोय. अजून कोण न्हाई इथं फिराकलं. परचाराच्या गाड्या फिरत्यात गावात,’ हे उत्तर ऐकून खिरवडेच्या कमानीवर नजर फिरवत शेडगेवाडीचा रस्ता धरला. साठी गाठलेल्या आजीनं पानपट्टीत ठाण मांडलेलं. ‘कोण हाय उमेदवार?’ प्रश्नावर ‘मोदी (Narendra Modi) हाय नव्हं.
सांगली (Sangli Lok Sabha) जिल्हा म्हणजे मोदीच की,’ आजीचं वाक्य कानात घुमलं. ‘म्या काय शिकल्याली न्हाई. काय कळतंय राजकारणातलं आमाला,’ म्हणत आज्जीनं कागदात चिक्क्या बांधून बरणीवर ठेवल्या. नाठवडेच्या केश कर्तनालयाबाहेर दोघा-तिघांचा ठिय्या. ‘वातावरण तापलंय काय?’ वाक्यावर दुकान मालकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. ‘शेट्टी, माने, आबा उमेदवार हाईत की. कोण जोरात ते सांगता न्हाई यायचं,’ बाकड्यावर बसलेल्या एकाने उत्तर दिले.
रणरणत्या उन्हानं अंग घामानं चिंब झालेलं. चरण ओलांडताच रस्त्यावर रसवंतीगृहाची चाकं फिरताना दिसली. ‘भागात काय चाललंय?,’ तोंडातून शब्द फुटताच ‘माने जोरात हाय; पण आमचं कसं हाय. काम भलं आपण भलं. कशाला राजकारणाच्या गुंत्यांत पडायचं ते?’ एकाने उत्तर दिलं. गारेगारवाल्याची करुंगलीच्या दिशेने सायकलवरून जाण्याची घाई. त्याच्या डोक्यावर टोपी, अंगात पांढरा सदरा. वय साठीच्या पुढे. ‘कोणाचा गोळा फेमस, मामा?’...‘शेट्टीचा (Raju Shetti) गोळा फेमस,’ मामा हसतच बोलला. चाकांची गती वाढवून आरळा गाठलं. मणदूरच्या रिक्षा स्टॉपवर रिक्षाचालकांकडे मोर्चा वळवला. ‘दोन्ही नाईक एक झाल्यातं.
दोघं आबाच्या बाजूनं. सत्यजित, सम्राट दोघं भाजपची. ती मानेंकडं. भागात एक साखर कारखाना हाय. तो आता चालवतोय दालमिया. पगार जोरात देत्यात कामगारांस्नी,’ एकानं भागातल्या राजकारणावर विश्लेषण सुरू केलं. ‘शिंदे अन् पवारांनी गट बदलला. तिथं घात झाला. का मतदारांनी मतदान करायचं? कॉँग्रेसचा उमेदवार म्हणून मतदान करायचं. ते उद्या जाणार भाजपात. इलेक्शनच बंद करा,’ दुसऱ्याने रूद्रावतार धारण केला.
‘आधी ईडी मागं लावताय. पक्षात आल्यावर उपमुख्यमंत्री करताय. कसला कारभार चाललाय ह्यो,’ तिसऱ्यानं चर्चेत उडी घेतली. ‘सत्तर वर्षांत केलेलंच विकताय नव्हं. महिलांना अर्ध तिकीट केलंसा. आमचं काय म्हणणं न्हाई. काळी-पिवळीचं कंबरडं मोडलंसा. त्येचं काय?,’ चर्चेला स्फोटक रूप आले. ‘एक वाजला. तुला जायाचं हाय नव्हं,’ त्यातल्या एकाने दुसऱ्याला आठवण करून दिली. त्यानं रामराम करत चर्चेतनं निरोप घेतला.
बिळाशी, मांगरुळहून रिळेच्या माळावर मानेंची प्रचाराची गाडी दिसली. ‘मोदी येणार. माने येणार,’ पावलेवाडीच्या मार्गावर म्हशीवाल्यानं धनुष्यबाणावर बोट ठेवलं. शिराळात प्रवेश करताच मानेंच्या प्रचाराच्या दोन गाड्या रस्त्यावरच उभ्या. आमची गाडी थेट भाजीपाला विक्रेत्यांसमोर थांबवली. ‘निवडून आलेल्याचं तोंडबी नाही बघितलं. आबा जोरात हाय. शेट्टींची मदार शेतकऱ्यांवर हाय,’ मांगल्याच्या महिलेनं लगेच तोंडाला लगाम लावला. शेट्टींच्या प्रचाराची गाडी गावात शिरली. मांगल्याच्या चौकात वर्दळ कमी. तिथला कानोसा घेत कांदेहून सागाव गाठलं. सायंकाळची वेळ असल्यानं चौकात थोडी वर्दळ. स्टॉपवर चार-पाच जण बसलेले.
रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दोघांत कामाची चर्चा. शेट्टींच्या प्रचाराच्या गाडीकडे पाहून ‘गाडी आज आली काय?’ प्रश्नानं त्यांच्या चर्चेला तोडलं. ‘आमच्या भागात साखर कारखानं. उसाला दर पायजे, तर लढणारा माणूस पायजे. आमी सगळी शेट्टींमागं हाय. फाईट शेट्टी आणि मानेंच्यात हुईल.’ गाडी थेट सरुडच्या चौकात थांबली. ‘मुख्यमंत्री आल्यापास्नं वातावरण बदललंय. कोरेंनी लय जोर लावलाय. नाईकबी शांत न्हाईत. त्येंच्या पोरांचा गावागावांत ठिय्या हाय. वाळवा, शिराळा, शाहूवाडीवर आबा, तर शिरोळ, इचलकरंजी, हातकणंगलेत शेट्टी, माने फास्ट दिसत्यात,’ वाटेत भेटलेल्या काकांनी निवडणुकीचं समीकरण मांडलं.
चौकातल्या हॉटेलच्या कट्ट्यावर विसावलो. ‘चेअरमन बोलतोय. चार-पाचशे रुपये द्या की. तुमाला मदत करायला कदी ढिला पडलोय का? मसाल्याचं दर कसं वाढल्यात माहीत हाय न्हवं. किती जण हाईसा,’ जेवणाच्या ऑर्डरीचा मामला होता. ‘तुमी कुठनं आलासा?’ चेअरमनकडून आमची चौकशी. ‘कोण निवडून येईल?’ प्रश्नाला बगल देत माझा सवाल. ‘आबा आणि मानेंच्यात फाईट हाय. शिरोळमधनं शेट्टी काय करतोय बघाय पायजे.’ चर्चेचा सूर न वाढवता पुढच्या मार्गाचा ठावठिकाणा घेतला.
मणदूरच्या उजव्या हातानं घाट रस्ता धरला. चांदोली धरणाचं रुपडं न्याहाळत माथ्यावर पोचलो. सांगली जिल्ह्यातलं शेवटचं गाव असणाऱ्या खुंदलापूरच्या दिशेने गाडी वळवली. गावात शहात्तर उंबरा. लोकसंख्या ३८१, तर मतदार २२७. सगळी उतरत्या छपराची कौलारू घरं. प्रवेश करताच मोठा मंडप नजरेत भरला. हनुमान मंदिराला रंगरंगोटी करण्यात कामगार व्यस्त. ‘चवेचाळीस वर्सं झाल्यात दारुबंदीला. त्येचा उद्या कार्यक्रम हाय. शासनानं गावाला बक्षीसबी दिलंय. पुण्यास्नं नाटक मंडळी येत्यात. पन्नास हजार सुपारी दिलीया.’ गावातल्या गावडे आजोबानं मंडपाचं गाऱ्हाणं मांडलं. सरपंचाला बोलावणं धाडलं. ‘भजनाला गेल्तं राती. झोपल्यात अजून,’ अंगणातनंच त्यांना उठवायला नकारघंटा वाजली. ‘डांबरी रस्ता कोणी केलाय?’, गावड्याच्या आजीला सांगता नाही आलं. कोळेकरवाडी, जाधववाडीत उमेदवार पोचलं नसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.