पूर्व विदर्भ : पहिला टप्पा ,नागपूरमध्ये अटीतटीचा सामना
नागपूर : चंद्रपूरचा वगळता उर्वरित चार मतदारसंघ जिंकणे भाजपला सुरुवातीला सोपे वाटत होते, असे असली तरी काँग्रेसने आता चांगलीच चुरस निर्माण केली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाही ही निवडणूक सोपी राहिली नाही, असे भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटू लागले आहे. चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी कडवे आव्हान उभे केले असून जातीपातींची समिकरणांनी योग्य साथ दिल्यास भाजपचे काही उमेदवार धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचे दिसून येते. गडकरी यांनी पाच लाख मताधिक्यांचे लक्ष्य ठरवले असले तरी ठाकरे यांच्याविरुद्ध हे सध्या तरी शक्य नसल्याचे दिसून येते. नागपूर कॉस्मोपॉलिटन शहर असल्याने सर्वच समाजाचे प्राबल्य आहे. यात अनुसूचित जाती, जमाती, मुस्लिम, ओबीसींचा प्रामुख्याने समावेश आहे. भाजपची आरक्षण विरोधी भूमिका आणि मोदी यांच्याविषयी मोठी नाराजी सध्या दिसून येते.
गडकरी यांची लोकप्रियता व विकास कामे प्रचंड असली तरी त्यांच्या विरोधात काँग्रेसने चांगलीच मोट बांधली आहे. त्यांच्या पराभवासाठी कधी नव्हे काँग्रेसचे सर्व नेते आपसांतील हेवेदावे, मतभेद विसरून एकत्र आले असल्याचे दिसून येते. त्यांचे प्रतिस्पर्धी विकास ठाकरे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूरचे आमदार आहेत. तेसुद्धा चांगलेच लोकप्रिय आहेत. अडीच वर्षे ते महापौरसुद्धा होते. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये ते लोकप्रिय आहेत. याशिवाय जातीय समीकरणात ते एकदम चपखल बसतात. याशिवाय वंचित बहुजन आघाडीने त्यांना समर्थन जाहीर केले आहे. एमआयएमने मुस्लिम उमेदवार उभे केला नाही. बसपने प्रभागस्तरावर काम करणाऱ्याला उमेदवारी दिली असल्याने यावेळी काँग्रेसला मतविभाजनाचा धोका नसल्याने नागपूरची निवडणूक अटीतटीचे होणार असल्याचे चित्र आहे.
रामटेकमध्ये तिरंगी लढत
रामटेक लोकसभा जिंकणे महायुतीला सोपे वाटत असले तरी माजी आमदार व पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याने भाजपच्या नेत्यांची झोप उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचाराला येथे बोलविण्यात आल्याने युती येथे घाबरली असल्याचे चित्र आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या रामटेकमध्ये महाआघाडीचे (काँग्रेस) उमेदवार श्यामकुमार बर्वे, महायुतीचे (शिवसेना) उमेदवार राजू पारवे यांच्या लढतीत काँग्रेसचे बंडखोर किशोर गजभिये यांनी उडी घेतल्याने येथे तिहेरी रंगत निर्माण झाली आहे. काँग्रसचे सावनेरचे आमदार सुनील केदार यांनी रामटेकची निवडणूक प्रतिष्ठित केली. त्यांच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. महायुतीने काँग्रेसचे आमदार पारवे यांना आयात करून रिंगणात उतरवले आहे. केदार यांनी ही निवडणूक अंगावर घेतली असून ते एकटेच थेट लढा देत आहे. तर पारवे यांना जिंकून आणण्याचा संकल्प भाजपने केला आहे.
भंडाऱ्यात भाजप व काँग्रेसमध्ये लढत
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत १८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे आणि भाजपचे सुनील मेंढे या दोन राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांचा प्रचाराचा वेग वाढलेला आहे. भंडारा येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांची सभा झाली. तर गोंदिया येथे गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे. याशिवाय दोन्ही पक्षाचे उमेदवार गावागावांत जात आहेत.
मुनगंटीवार, धानोरकरांत लढत
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात १५ उमेदवार रिंगणात आहेत. यात भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि कॉँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचा समावेश आहे. चंद्रपूरच्या रिंगणातील उमेदवार बघता या दोघांतच थेट लढत होईल, असे चित्र आहे. वंचित प्रचाराच्या काळात किती पुढे जाईल, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.
गडचिरोलीत काँग्रेस-भाजपमध्ये चुरस
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात प्रचाराला रंग चढू लागला असून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान व महायुतीचे अशोक नेते या दोघांचेच पारडे जड दिसून येत आहे. सुरूवातीला कॉँग्रेस व भाजपने तिकीट वाटपावरून बराच काळ इच्छुकांना तिष्ठत ठेवले होते. त्यानंतर कॉँग्रेसने डॉ. नामदेव किरसान यांच्या रूपात नवा चेहरा जनतेपुढे आणला, तर भाजपने खासदार अशोक नेते यांच्यावरच नवा डाव खेळला आहे. सध्या दोन्ही उमेदवारांसाठी त्यांच्या पक्षातील दिग्गज मैदानात आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल प्रचार बाजूला ठेवून अशोक नेते यांच्या प्रचारासाठी देसाईगंज येथे आले. इकडे विजय वडेट्टीवार यांनीही गडचिरोली-चिमूर निवडणूक प्रतिष्ठेची केली असून त्यांनीही सभा घेतली. सध्या दोन्ही उमेदवार तोडीस तोड दिसून येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.