वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघ
वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल कीर्तिकर आणि शिवसेनेचे (शिंदे गटाचे) रवींद्र वायकर आमने-सामने आहेत. या निवडणुकीत विद्यमान खासदार आणि शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांची ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी अवस्था झाली आहे. त्यांच्यावर मुलाच्या विरोधात प्रचार करण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे, काही आठवड्यांपूर्वीच शिंदे गटात दाखल झालेल्या रवींद्र वायकर यांचीही ठाकरेंविरुद्ध बोलण्याची अडचण झाली आहे.
वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघावर खासदार कीर्तिकर यांचे २०१४ पासून वर्चस्व राहिले आहे. त्यांनी २०१९ मध्ये मोठ्या मताधिक्याने हा मतदारसंघ शिवसेनेकडे राखला होता. त्यांनी २०१४ मध्ये गुरुदास कामत, तर २०१९ मध्ये संजय निरुपम यांचा पराभव केला होता. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर गजानन कीर्तिकर यांनी शिंदे यांना साथ दिली; मात्र त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर यांनी ‘मातोश्री’सोबत राहण्याचा निर्णय घेतला.
या लोकसभा मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. वर्सोवा, जोगेश्वरी, गोरेगाव या मतदारसंघांचा अपवाद करता ६० टक्क्यांपेक्षा जास्त उत्तर भारतीय आणि इतर राज्यांतील मतदार आहेत; तर मराठी मते ही ३० टक्क्यांच्या आसपास आहेत. रवींद्र वायकर हे सध्या जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी वर्सोवा, गोरेगाव मतदारसंघांतील भाजपचे आमदार मैदानात उतरले आहेत. नाइलाजाने मला शिंदे गटात यावे लागले, अशी कबुली दिल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे.
दुसरीकडे, अमोल कीर्तिकर यांनी वडिलांसोबत काम करतानाचा अनुभव पणाला लावला आहे. सुनील प्रभू आणि ऋतुजा लटके हे दोन उद्धव ठाकरे गटाचे आमदार सोबत असले, तरी जुने शिवसैनिक गजानन कीर्तिकरांच्या बाजूने उभे ठाकल्याचे चित्र आहे. वडिलांनी केलेल्या विकासकामांची पोचपावती आणि बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा वारसा त्यांच्या पाठीशी आहे.
चुरशीची लढत
अंधेरी एमआयडीसी, अनेक लघुउद्योजक आणि चाळीतील नागरिक यांचा केंद्रातील अनेक धोरणाला विरोध करत आहेत. त्यांचा चांगला प्रतिसाद अमोल कीर्तिकरांना मिळत आहे. उत्तर भारतीयांसोबत वडिलांनी निर्माण केलेल्या संबंधांचाही त्यांना निवडणुकीत लाभ होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसमधून शिंदे गटात आलेल्या संजय निरुपम यांच्यामुळे उत्तर भारतीय व्होट बँकेचे बळ त्यांना मिळू शकते. या मतदारसंघात पंतप्रधानांची सभा घेण्याचेही नियोजन आहे. त्यामुळे येथील शिवसेना विरुद्ध शिवसेना हा सामना चांगलाच चुरशीचा होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.