जयसिंगपूर : संपर्काचा अभाव, मित्र पक्षांची नाराजी, महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्यजित पाटील-सरुडकर यांची ऐनवेळी आलेली उमेदवारी अशा विविध अडचणींचा सामना करीत खासदार धैर्यशील माने यांनी अखेर हातकणंगलेत दुसऱ्यांदा बाजी मारली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास करून धैर्यशील माने यांच्या विजयासाठी मतदारसंघात तळ ठोकून आवश्यक ते बदल करीत मानेंना पाठबळ दिले. किंबहुना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच माने यांचा विजय सोपा झाला, असेच म्हणावे लागेल. येणाऱ्या काळात लोकसंपर्क वाढवून लोकांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण करण्याचे आव्हान माने यांच्यासमोर तर ऊसदराच्या चळवळीतून एक वेळ आमदार आणि दोनवेळा खासदारकीचा बहुमान मिळवलेल्या राजू शेट्टी यांना मात्र दुसऱ्यांदा पराभव पचवावा लागणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अस्तित्व कायम राखून कार्यकर्त्यांना एकसंध ठेवणे हेच मोठे आव्हान आता शेट्टी यांच्यासमोर असणार आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात माने घराण्यातील तिसरी पिढी धैर्यशील माने यांच्या रूपाने नेतृत्व करीत आहे. आजोबा स्व. बाळासाहेब माने, आई माजी खासदार निवेदिता माने यांचा राजकीय वारसा पुन्हा धैर्यशील माने यांच्या खांद्यावर मतदारांनी टाकला आहे. लोकसभेचे बिगुल वाजल्यानंतर धैर्यशील माने यांच्या उमेदवारीवरून मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी बदलण्यासाठी पक्षाच्या नेत्यांकडे सूर आळवला होता.
शिंदे सरकार स्थापन करतेवेळी धैर्यशील माने यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेली साथ आणि शब्द याची जाणीव ठेवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिमालयाप्रमाणे माने यांच्या पाठीशी उभे राहिले. धैर्यशील माने यांच्याच उमेदवारीसाठी त्यांनी आपली ताकद पणाला लावली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या आग्रहावरून माने यांची उमेदवारी निश्चित झाली. त्यांनी मतदारसंघात पाच ते सहावेळा दौरे करीत प्रसंगी मुक्काम ठोकून धैर्यशील माने यांच्यासाठी राजकीय पेरणी केली. पहाटेच्या सुमारासही मतदारसंघातील आमदार, तसेच प्रमुख नेत्यांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्याने त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसले.
वास्तविक, माने यांच्या विरोधात संपर्कावरून मतदारांमध्ये एक सुप्त लाट होती. गेल्या पाच वर्षांत माने यांचा मतदारांशी अतिशय अल्पसा संपर्क राहिला. संपर्क नाही की कोणतीही कामे होत नाहीत, असा आरोप होत होता. जयसिंगपूर येथील प्रचार सभेत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माने यांच्या चुका पदरात घ्या, त्यांना संधी द्या. येणाऱ्या काळात ते लोकाभिमुख कार्य करतील, असे सांगत अप्रत्यक्षपणे लोकांच्या नाराजीला उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
तर माने यांनीही येणाऱ्या काळात लोकांमध्ये मिसळणारा खासदार कसा असावा, हे आपण दाखवून देणार असल्याचे स्पष्टपणे सांगत संपर्क नसल्याच्या मुद्द्यावर खुलासा करण्याचा प्रयत्न केला होता. धैर्यशील माने यांनी विकास कामे केली नाहीत यापेक्षा त्यांचा मतदारसंघात संपर्कच नसतो असाच आरोप प्रचाराच्या काळात झाला होता. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, सहा विधानसभा मतदारसंघांतील, गावागावांतील ग्रामपंचायतीवर सत्तेसाठी ही लोकसभा निवडणूक महत्त्वाची होती.
मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत धैर्यशील माने यांनी दुसऱ्या फळातील कार्यकर्त्यांना बरोबर घेत प्रचाराची यंत्रणा राबविली होती. गेल्या दहा वर्षांत महायुतीने केलेली कामे, शिंदे गटाने राबविलेली विकासात्मक धोरणे याचा प्रचारात ठासून वापर केला होता. केंद्र आणि राज्यातील विकासात्मक कार्याचा लेखाजोखा मांडताना येणाऱ्या काळात हिंदुत्वासाठी तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होणे आवश्यक असल्याचेही सांगून मताधिक्य वाढविण्याचा प्रयत्न भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी केला होता. माने यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांना उभारी मिळाली आहे.
‘वंचित’ला २८ हजार मते
वंचितचे उमेदवार डी. सी. पाटील राजकारणांपासून अनेक वर्षे अलिप्त असतानाही अचानक थेट लोकसभा निवडणुकीत उतरले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण, त्यांना मिळालेली २८ हजार मतेच त्यांची आणि त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करून गेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.