Independent candidate Vishal Patil defeated BJP Sanjay Patil esakal
लोकसभा २०२४

Sangli Lok Sabha Result : वसंतदादांच्या नातवाला डावललं गेलं, षड्‌यंत्र रचलं गेलं; पण तरीही 'डबल करंट'ने जिंकला डाव!

अजित झळके

विशाल पाटील यांनी संपूर्ण निवडणुकीत श्रद्धा अन् सबुरीचे दर्शन घडवले. संयम ढळू दिला नाही. जयंत पाटील यांच्याविषयी नागरिकांमध्ये रोष होता, मात्र विशाल यांनी त्यांच्यावर टीका टाळली.

सांगली : भाजपचे खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांच्यासाठी निवडणूक एकतर्फी होईल, अशी मांडणी झाली होती. हा डाव उलटला. काकांविषयी नाराजी आणि विशाल पाटील (Vishal Patil) यांच्याविषयी सहानुभूती, असा एकावेळी डबल करंट वाहत होता. तो मतांत बदलला. विशाल लाखांवर मतांनी विजयी झाले. जतचा अपवाद वगळता पाचही मतदार संघांत विशाल यांना आघाडी मिळाली. संजय पाटलांच्या होम ग्राऊंड तासगावने विशाल यांना साथ दिली. हे वारं लक्षात यायला भाजपला उशीर झाला.

महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं... कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली गेली... बदल्यात सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटानं हिसकावून घेतली... वसंतदादांच्या नातवाला डावललं गेलं. षड्‌यंत्र रचलं गेलं, काँग्रेसची हक्काची ‘सांगली’ पुन्हा एकदा पणाला लागल्याचा संताप उसळला. इथंच सगळा खेळ बदलला. विशाल पाटलांचं तिकीट कापलं अन् तिथंच सांगलीचं वारं फिरलं.

आमदार विश्‍वजित कदम, विक्रम सावंत, शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील हे काँग्रेसचे नेते विशाल यांच्या उमेदवारीसाठी सतत संघर्ष करत होते. त्यात अपयश आले, उमेदवारी डावललीच, शिवाय महाविकास आघाडीनं धर्मसंकट उभं केलं. धमकीची भाषा, उट्टे काढण्याचे इशारे दिले गेले. या कोंडीतून विश्‍वजित व विक्रम सावंत यांनी खुबीनं मार्ग काढला, जयश्री पाटील कुटुंब म्हणून उघडपणे प्रचारात आल्या, पृथ्वीराज पाटील यांनी अंडरग्राऊंड सांगली विधानसभा मतदार संघाची यंत्रणा हाती घेतली. हे घडताना प्रदेश काँग्रेसने तोंडावर बोट, हाताची घडी, अशी भूमिका घेतली.

विलासराव जगताप यांनी भाजपचा राजीनामा देत विशाल यांना पाठिंबा दिला, तिथेच विशाल यांच्या माघारीचे दोर कापले गेले होते. त्यामुळे कोंडी केली, आमिषे दाखवली तरी ते बधले नाहीत. अजितराव घोरपडे यांची साथ, वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा महत्त्वाचाच ठरला. राष्ट्रवादीच्या आर. आर. पाटील गटाने फाटी मारून प्रचाराचे रान उठवले. बेरीज वाढत गेली. संजय पाटलांचे विरोधक एकजूट झाले. विशाल यांच्या शिडात वारं शिरलं अन् पाहता-पाहता एका अपक्ष उमेदवारानं निवडणूक उभी केली, ताकदीनं लढली आणि प्रचंड धक्का देत जिंकलीदेखील. विशाल काँग्रेसचे उमेदवार असतील, हे निश्‍चित होते.

‘जनसंवाद यात्रे’तून काँग्रेसने त्यांना ‘प्रेझेंट’ केले होते. विश्‍वजित-विशाल जुना वाद संपवला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या आडून डाव शिजला. ‘सांगली’ ठाकरेंनी हट्टून घेतली. ११ मार्चला चंद्रहार पाटलांचा सेना प्रवेश होतो अन् २२ ला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिरजेत येऊन त्यांची उमेदवारी जाहीर केली. कुणालाच विश्‍वासात घेतलं गेलं नाही. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हेच याचे सूत्रधार असल्याचा संशयकल्लोळ वाढला. जगतापांनी थेट तसा आरोप करत खळबळ उडवून दिली.

शिवसेनेनं ‘सांगली’ घेतली, मात्र निवडणूक उभी करता आली नाही. उलट विशाल यांच्यासाठी सहानुभूतीची लाट आली. वसंतदादा घराण्यावर अन्याय, विशाल यांची कोंडी, जुन्या वादातून रचलेलं षड्‌यंत्र असे मुद्दे चर्चेला आले. त्याला विशाल यांनी संयम राखत उत्तर दिले. आमदार विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवला. काँग्रेस ठाम पाठीशी राहिली. निवडणूक काँग्रेसच्या अस्तित्वाची आणि सांगलीच्या अस्मितेची बनवली आणि तो मुद्दा लक्षवेधी ठरला. खासदार संजय राऊत यांची आक्रमक भाषा सेनेच्या अंगाशी आली.

जगतापांनी वात काढली आणि पुढे फटाक्यांची माळ फुटत गेली. संजय पाटील पराभूत होऊ शकतात, हा विश्‍वास आल्यानंतर विरोधी गटातील बेरीज वाढत गेली. ‘मिरज पॅटर्न’ देखील विशाल पाटलांच्या पाठीशी राहिला. जत, विट्यातून माजी नगरसेवक मदतीला आले. आर. आर. आबांच्या गटाने महाविकास आघाडीच्या दबावाला झुगारून विशाल पाटलांचा झेंडा खांद्यावर घेतला. विट्यात बाबर गटाने ‘भाऊंच्या अश्रूंचा बदला’ असा नारा दिला. माजी आमदार सदाशिवराव पाटील गटाचे काही कार्यकर्ते विशाल यांच्या प्रचारात उतरले. विश्‍वजित यांनी ‘सांगलीत आम्ही वाघ आहोत,’ अशी गर्जना केली, ती काँग्रेसला बूस्टर ठरली. ॲड. प्रकाश आंबेडकर यांची सभा निर्णायक वळण देऊन गेली. सगळी बेरीज विशाल पाटील यांची नौका पार करायला पुरेशी ठरली.

‘विशाल’ खेळी...

विशाल पाटील यांनी संपूर्ण निवडणुकीत श्रद्धा अन् सबुरीचे दर्शन घडवले. संयम ढळू दिला नाही. जयंत पाटील यांच्याविषयी नागरिकांमध्ये रोष होता, मात्र विशाल यांनी त्यांच्यावर टीका टाळली. विश्‍वजित यांच्या नेतृत्वाची चर्चा घडवली. वसंतदादा घराण्यावर अन्याय, काँग्रेसची कोंडी, खासदार संजयकाकांचे दहा वर्षांतील अपयश यावर हल्ला चढवला. निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवर, मोदींच्या चेहऱ्यावर, हिंदुत्वावर जाणार नाही, याची दक्षता घेतली. प्रचाराला मोठी फौज नव्हती, मात्र अंडरकरंट जोरात राहिला. वारं उटलं फिरू नये, यासाठी चुका टाळल्या. काय बोलावं, यापेक्षा काय बोलू नये, याची काळजी घेतली गेली. ‘बॅक ऑफिस’ प्रतीक पाटील यांनी सांभाळलं. आई श्रीमती शैलजा पाटील, पत्नी पूजा, वहिनी ऐश्‍वर्या ही टीम मैदानात उतरली. श्रीमती जयश्री पाटील यांनी सांगली पिंजून काढली. कुटुंब एक झाल्याचा संदेशदेखील महत्त्वाचा ठरला.

टपाली मते

  • विशाल पाटील - २०१५

  • संजय पाटील - २२२१

  • चंद्रहार पाटील - ७४५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT