महादेव जानकर
आधी महाविकास आघाडीशी चर्चा आणि नंतर महायुतीत प्रवेश केल्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर चर्चेत आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून त्यांना परभणीची जागा देण्यात आली आहे. वर्तमान राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने त्यांच्याशी केलेली बातचीत..
-महेश जगताप
प्रश्नः राष्ट्रीय समाज पक्षाची सध्याची स्थिती आणि आपल्या पक्षासमोर आव्हाने कोणती आहेत?
महादेव जानकर : माझा पक्ष हा चार राज्यांमध्ये पसरलेला आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्येही माझ्या पक्षाचा मोठ्या प्रमाणात मतदार आहे. भविष्यकाळात या पक्षाला राज्याच्या राजकारणात व देशाच्या राजकारणात संधी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये व मातब्बर पक्षांचे आव्हान असताना आम्ही पक्ष उभा केला आहे. पक्षासमोर सर्वांत मोठे आव्हान संघटना बांधणीचे आहे. मी रात्रंदिवस यासाठी राज्यभर व देशभर फिरतोय. मोठ्या प्रमाणात युवक पक्षाकडे आकर्षित होतोय. आमचा पक्ष ‘नाही रे’ वर्गाचा आहे, त्यातून आम्हाला ‘आहे रे’ वर्गाकडे प्रवास करायचा आहे.
आपला महाविकास आघाडीकडे कल असताना अचानक पुन्हा महायुतीकडे जाण्याचे कारण काय?
-पक्ष वाढवायचा असेल तर सर्वांत महत्त्वाचे सत्ता असणे महत्त्वाचे असते. राजकारणात भूमिकांची अदलाबदल होणे चालतच असते. गेल्या काही दिवसांपासून मी शरद पवार यांच्या संपर्कात होतो, माझ्या चार बैठकाही त्यांच्याबरोबर झाल्या. त्यांनी एक जागा देण्याचे कबूल केले होते. मात्र काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाने कोणताही प्रतिसाद न दिल्याने मी महाविकास आघाडीवर नाराज आहे. तीन जागांची महाविकास आघाडीकडे मागणी केली होती, मात्र चिन्हावर कोणतीही मला तडजोड करायची नव्हती. तीन पैकी फक्त एक जागा मिळत असल्याने माझ्या पक्षाच्या सोयीचे नव्हते. महायुतीकडे मी दोन जागा मागितल्या होत्या त्यापैकी त्यांनी एक परभणीची जागा सोडली आहे. या मतदारसंघातून निवडून येण्याची खात्री असल्याने मी महायुतीकडे येण्याचा निर्णय घेतला.
तुम्ही सत्तेचे राजकारण करत आहात मात्र विचारांच्या लढाईचे काय ?
-राजकारण विकासाचे करायचे असते. राज्यातील बहुजन वर्गाला पक्षाच्या माध्यमातून सत्तेचे प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, यासाठी हा पक्ष काम करत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुम्ही आधी विश्वासघाताचा आरोप केला आणि आज त्यांच्याच सोबत आलात..
-राजकारणामध्ये कोणीच कोणाचा मित्र वा कुणीच कुणाचा शत्रू कायमचा नसतो. आरोप, प्रत्यारोप होत असतात. मात्र योग्य वेळेला योग्य राजकीय निर्णय घेणे हे क्रमप्राप्त असते.
आपण परभणीमधूनच लढण्याचा निर्णय का घेतला?
-परभणी मतदारसंघांमध्ये माझ्या पक्षाचा एक विद्यमान आमदार आहे. ‘रासप’चा केडर बेस असा हा मतदारसंघ आहे. मला मानणाराही वर्ग मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात आहे. गेली अनेक वर्ष या मतदारसंघांमध्ये फिरून मोठा जनसंपर्क मी तयार केला आहे. महायुतीमध्ये सामील झाल्याने महायुतीचे दोन आमदार व माझा एक आमदार असे सहा पैकी आता तीन आमदार झाल्याने आमची ताकद वाढली आहे. त्यामुळे मला या मतदारसंघांमध्ये निवडून येण्याचा विश्वास आहे.
स्वपक्षाच्या चिन्हावर लढण्यासाठी आपण फारच आग्रही असता...
- माझा पक्ष जरी छोटा असला तरी तो स्वतंत्र पक्ष आहे. त्याचं स्वातंत्र्य व त्याचं अस्तित्व जिवंत ठेवणं हे आमचे काम आहे. अतिशय कष्टातून व हलाखीच्या परिस्थितीमध्ये आम्ही पक्ष उभा केला आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही पक्षासोबत असलो तरी आम्ही आमच्या चिन्हावरच निवडणूक लढणार ही आमची प्रामुख्याने अट असते. मी कधीही दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढणार नाही.
विरोधात असताना तुम्ही धनगर आरक्षणासाठी मोठी चळवळ उभी केली, मात्र सत्तेत येताच आपण धनगर आरक्षणाचा प्रश्न विसरल्याची टीका होते...
- मी कधीही धनगर आरक्षणाचा प्रश्न विसरलेलो नाही. धनगर आरक्षणाच्या चळवळीवरच या पक्षाला आजपर्यंत भरभरून यश मिळाले आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी मी कायमच कटिबद्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.