Sangli Lok Sabha Jayant Patil esakal
लोकसभा २०२४

Sangli Lok Sabha : 'सांगलीच्या जागेबाबत माझा काही संबंध नाही'; असं का म्हणाले जयंत पाटील?

जेव्हा देश संकटात आला, तेव्हा स्वातंत्र्यासाठी सांगलीने योगदान दिले आहे.

सकाळ डिजिटल टीम

'पैलवान विजयी होईल. शेतकऱ्यांचा पोरगा संसदेत शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडेल आणि ही मशाल संसदेत कधीही विझणार नाही.'

सांगली : गेले दोन महिने महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारी वाटपावर चर्चा सुरू होती. त्यात सांगलीच्या जागेबाबत माझा काही संबंध नाही. या काळात सोशल मीडियावर माझ्याबाबत खूप चर्चा झाली, मात्र हा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्यांनी एकदा मनात घेतलं की ते कुणाचं ऐकत नाही. अडीच वर्षे आम्ही एकत्र सरकार चालवलं आहे, मला त्याचा अनुभव आहे. सांगलीचं मी नाही, तर उद्धव ठाकरे यांनी ठरवलं आहे, असे सांगत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आता सांगलीचा विषय संपला आहे.

एकास एक लढत झाल्यास महाविकास आघाडीचा विजय निश्‍चित आहे, असा विश्‍वास व्यक्त केला. महाविकास आघाडी व शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील (Shiv Sena candidate Chandrahar Patil) यांचा उमेदवारी अर्ज आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत दाखल केला. स्टेशन चौकापासून निघालेल्या रॅलीत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या. ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी रॅली काढली.

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे बॅनर झळकवले. त्यानंतर मारुती चौकात झालेल्या सभेत जयंत पाटील यांनी सांगलीबाबतची भूमिका मांडली. खासदार संजय राऊत, उमेदवार चंद्रहार पाटील, आमदार सुमन पाटील, आमदार अरुण लाड, शिवसेना संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख संजय विभूते प्रमुख उपस्थिते होते.

जयंत पाटील म्हणाले, ‘‘चंद्रहार पाटील यांच्या घराण्यात कोणीही राजकारणात नव्हते. दिवंगत नेते अनिल बाबर यांनी चंद्रहार पाटील यांना पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात आणले. दोनदा महाराष्ट्र केसरी हा किताब त्यांनी मिळवला. कुस्तीत त्यांनी पूर्ण क्षमता दाखवली. आता ते राजकीय आखाड्यात उभे आहेत. हिंदकेसरी मारुती माने, आमदार संभाजी पवार यांच्यावर कुस्तीगीरांनी प्रेम दाखवले, तसे चंद्रहार यांच्यावरही सांगलीकर दाखवतील. पुढच्या काळात महविकास आघाडीचे सर्व नेते प्रचारात येतील. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.’’ खासदार संजय राऊत म्हणाले, ‘‘सांगली क्रांतिकारकांची भूमी आहे.

जेव्हा देश संकटात आला, तेव्हा स्वातंत्र्यासाठी सांगलीने योगदान दिले आहे. देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आहे. आता सांगलीला मागे राहता येणार नाही. मोदी म्हणजे ‘ईस्ट इंडिया’ कंपनी आहे. त्यांना घालवायचे आहे. त्या क्रांतीची सुरुवात सांगलीतून होईल. सांगलीच्या भाजपच्या खासदाराला तडीपार करा. ईडीच्या बापाला आम्ही घाबरत नाही. येथे आम्ही जिंकणार आहोत, लढाई एकास एकच होईल. पैलवान विजयी होईल. शेतकऱ्यांचा पोरगा संसदेत शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडेल आणि ही मशाल संसदेत कधीही विझणार नाही.’’

चंद्रहार पाटील म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात संदेश गेलाय, एका शेतकऱ्याच्या मुलाला खासदार करायला महविकास आघाडी एकत्र आलेली आहे. जिल्ह्याला पैलवानांची परंपरा आहे. या ऐतिहासिक मारुती चौकात आज सगळे माझ्या विजयाचे साक्षीदार झाला आहात. कुस्ती परंपरेत हरिनाना पवार, हिंदकेसरी मारुती माने, बिजलीमल्ल संभाजीअप्पा पवार, माझे गुरू गणपतराव आंदळकर यांनी राजकारणात चांगले काम केले आहे. मी देखील त्याच मार्गाने काम करेन.’’ शिवसेना संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, आमदार सुमन पाटील, अरुण लाड यांनी मनोगत व्यक्त केले.

मराठी माणसांचे पक्ष भाजपने फोडले

जयंत पाटील म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना जिल्ह्याच्या पूर्व भागात ६५ गावांना अतिरिक्त ६ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला. टेंभू योजनेलादेखील आपण चांगला निधी दिला. जिल्ह्यातील ८२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. जिल्ह्यात १३६ कोटी रुपयांची मदत पूरबाधित गावांना केली. ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने विकासकामे उभारली, कोरोनात आधार दिला, दुष्काळात कर्जमाफी दिली, महापुरात मदत केली, महाविकास आघाडीला रोखणे शक्य न झाल्याने सत्ता अखेर भाजपने मराठी माणसाचे पक्ष फोडले. मात्र महाराष्ट्रात जनता आजही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पाठीशी आहे.’’

जयंत पाटील १६ वर्षांनी मारुती चौकात

सांगली महानगरपालिका निवडणुकीत २००८ मध्ये दिवंगत माजी मंत्री मदन पाटील यांना रोखण्यासाठी भाजप, राष्ट्रवादीची महाआघाडी स्थापन करण्यात आली होती. ज्यामध्ये दिवंगत माजी आमदार संभाजी पवार, जयंत पाटील, खासदार संजय पाटील एकत्र होते. त्यावेळी जयंत पाटील यांची मारुती चौकात सभा झालेली होती. त्यांनतर राजकारणात अनेक बदल झाले. पुन्हा सोळा वर्षांनी जयंतरावांचे मारुती चौकात भाषण झाले, ही आठवण अनेकांना झाली.

काँग्रेसचा बहिष्कार कायम

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी अर्ज दाखल करायला हजेरी लावली. ते सभेला आले नाहीत. आमदार विश्‍वजित कदम यांनी व्यक्तिगत कारण देत सभेपासून अंतर राखले. पृथ्वीराज पाटील हेही आले नाहीत. त्याची चर्चा होती. या नेत्यांनी सभेत सहभागी व्हावे, यासाठी चंद्रहार पाटील यांनी आग्रही भूमिका घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT