Kolhapur Lok Sabha Narendra Modi esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha : धर्माच्या नावाखाली ओबीसी, दलित आरक्षणाला धक्का लावयाचा काँग्रेसचा घाट; कोल्हापुरात मोदींचा घणाघात

औरंगजेबाला मानणारेही त्यांच्यासोबत आहेतच आणि विशेष म्हणजे त्यांच्या खांद्याला खांदा लावून उद्धव ठाकरेही निघाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान मोदी व्यासपीठावर आल्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी समरजित घाटगे यांना हाताला धरून पुढे आणले आणि नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचा संवाद घडवून आणला.

कोल्हापूर : ‘धर्माच्या नावाखाली आरक्षण विभागणीचा घाट काँग्रेसने (Congress) घातला आहे. त्यांना ओबीसी आणि दलित आरक्षणाला धक्का लावयाचा आहे. त्यातून काँग्रेसला देशभर चुकीच्या आरक्षणाचा ‘कर्नाटक पॅटर्न’ राबवायचा आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी येथे महाविजय संकल्प सभेत केला.

काँग्रेसचा हा डाव हाणून पाडण्यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार केंद्रात आले पाहिजे. म्हणून महायुतीचे येथील उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) व हातकणंगलेमधील उमेदवार धैर्यशील माने यांना मत म्हणजेच मोदींना मत आहे. त्यामुळे त्यांना विजयी करा,’ असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

पंतप्रधान मोदींनी यावेळी राममंदिर, आरक्षण, उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) शिवसेना या मुद्यांवर भाष्य केले. ‘आई अंबाबाई चरणी त्रिवार वंदन करतो. कोल्हापूरकरांना माझा नमस्कार,’ अशी मराठीतून भाषणाची सुरुवात करून ते पुढे हिंदीमध्ये म्हणाले, ‘‘ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांची आहे, हे तुम्ही सर्व जाणता. मी काशीमधून खासदार आहे आणि आज करवीर काशीमध्ये आलो आहे. निवडणूक जाहीर झाल्यावर काँग्रेसच्या हे लक्षात आले की विकासाच्या मुद्यावर आपण भाजप आणि मित्र पक्षांशी मुकाबला करू शकत नाही.

विकसित भारताची संकल्पना काँग्रेसला समजणारही नाही. त्यामुळे त्यांनी देश विरोधी अजेंडा राबवण्यास सुरुवात केली. काँग्रेस सत्तेत आली तर ते जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम पुन्हा लागू करणार आहेत. सीएए कायदा रद्द करणार आहेत. ‘एक वर्ष-एक पंतप्रधान’ असे त्यांचे धोरण आहे. म्हणजे पाच वर्षांत पाच पंतप्रधान असतील; पण जनता त्यांना सत्तेच्या दरवाजापर्यंतदेखील पोहोचू देणार नाही.’’

‘अहत पेशावर, तहत तंजावर’

ते म्हणाले, ‘‘काँग्रेस दक्षिण भारताचे विभाजन करण्याचे म्हणत आहे; पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘अहत पेशावर, तहत तंजावर’ ही घोषणा याच भूमीतून दिली होती. विभाजनचा विचार करणाऱ्यांना या मातीतील जनता उत्तर देईल. प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर साकार झाले. राम मंदिराविरोधात खटला लढणारे अन्सारी कुटुंबीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये उपस्थित राहिले होते, पण काँग्रेसचे नेते निमंत्रण देऊनही आले नाहीत. राम मंदिराच्या निमंत्रणाला नाकारणाऱ्यांना जनताही नाकारणार आहे. सनातन म्हणजे डेंगी, मलेरिया अशी विधाने करणाऱ्या ‘डीएमके’ पक्षाला काँग्रेसने बरोबर घेतले. औरंगजेबाला मानणारेही त्यांच्यासोबत आहेतच आणि विशेष म्हणजे त्यांच्या खांद्याला खांदा लावून उद्धव ठाकरेही निघाले आहेत. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना किती दुःख झाले असते?’’

मंडलिक, मानेंना मत म्हणजे मोदींनाच मत!

आरक्षणावरून काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘कर्नाटकात सत्तेत आल्यावर काँग्रेसने एका रात्रीमध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) वर्गामध्ये मुस्लिम समाजाचा समावेश केला. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचे विभाजन झाले. चुकीच्या आरक्षणाचा हाच ‘कर्नाटक पॅटर्न’ ते सत्तेत आल्यावर देशभर राबवणार आहेत. देशातील संपत्तीचे सर्वेक्षण करण्याची गोष्ट ते करत आहेत. म्हणजे तुम्ही कष्टाने मिळवलेली संपत्ती तुम्ही तुमच्या मुलाबाळांना देऊ शकणार नाही. ही संपत्ती ते अन्य लोकांना वाटून टाकणार आहेत; मात्र जनता हे कधीच सहन करणार नाही. देशातील जनतेने पुन्हा एकदा महिलांना सन्मान देणारे, युवकांना रोजगार देणारे, सुरक्षा आणि विकासाची संधी देणारे भाजप मित्र पक्षांचे सरकार सत्तेत आणण्याचे ठरवले आहे. येथील उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे धैर्यशील माने यांना मत म्हणजे मोदी यांना मत. त्यामुळेच या दोघांना विजयी करून माझे हात बळकट करावेत.’’

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने, माजी खासदार निवेदिता माने, आमदार प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, प्रकाश आवाडे, विनय कोरे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार सुरेश हाळवणकर, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, के. पी. पाटील, शौमिका महाडिक, माजी मंत्री सदाभाऊ खोत, भरमूअण्णा पाटील, शिवाजी पाटील, समरजित घाटगे यांच्यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. चारुदत्त जोशी आणि श्वेता हुल्ले यांनी सभेचे सूत्रसंचालन केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी आभार मानले.

माझा नमस्कार सांगा!

यावेळी सभेत उपस्थित लोकांना श्री. मोदी यांनी आवाहन केले, ‘तुम्ही माझे एक काम करा. आपल्या परिसरातील, गल्लीमधील प्रत्येकाला भेटून माझा नमस्कार सांगा. त्यांचा आशीर्वाद हीच माझी ऊर्जा आहे. तुमचे स्वप्न हाच माझा संकल्प आहे. मतदानादिवशी सर्वांनी मतदान करावे.’

कदमबांडेंची उपस्थिती

महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या दत्तक विधानाचा मुद्दा प्रचारात आणला होता. या दत्तक विधानाशी संबंधित राजवर्धन कदमबांडे यांना आज पंतप्रधानांच्या सभेत आणण्यात आले होते. ते धुळ्याहून खास विमानाने सभास्थळी आले. त्यांना व्यासपीठावरही बसवण्यात आले होते.

मोदींची गॅरंटी

श्री. मोदी यांनी आपल्या काळातील विकासकामांचा आढावा घेतला. ते म्हणाले, ‘‘महिलांना आत्मनिर्बर बनवण्याचे काम सरकारने केले. त्यामुळे १० कोटी महिला स्वयंसहाय्य गटांशी जोडल्या गेल्या. देशात स्टार्टटअपची संख्या इतकी वाढली की जगात स्टार्टटअपमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुद्रा योजनेतून लाखो युवकांना कर्ज मिळाले. आता या कर्जाची मर्यादा २० लाखांपर्यंत केली जाणार आहे. ही मोदींची गॅरंटी आहे.’’

कोल्हापूरच्या विकासाला चालना

कोल्हापूर -वैभववाडी मार्ग, विमानतळ विस्तारीकरण, वंदेभारत रेल्वे, नागपूर-रत्नागिरी महामार्ग, पुणे-बंगळरू राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण अशी अनेक कामे केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहेत. याशिवाय अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास, या माध्यमातून कोल्हापूरचा विकास होणार आहे, असेही मोदींनी सांगितले.

संभाजी भिडे यांची उपस्थिती

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे सभास्थळी आले होते. त्यांना कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर जाण्याचा आग्रह केला; पण ते शक्य नसल्याने ते मागे निघून गेले.

समरजित यांचा पंतप्रधानांशी हितगुज

पंतप्रधान मोदी व्यासपीठावर आल्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी समरजित घाटगे यांना हाताला धरून पुढे आणले आणि नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचा संवाद घडवून आणला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT