Lok Sabha Election 2024
गडचिरोली: वयाची शंभरी गाठलेल्या किष्टय्या आशालू मादरबोईना यांनी गृह मतदान सुविधेअंतर्गत लोकसभा निवडणूक - २०२४ साठी बुधवार (ता. ११) आपले मतदान केले. त्यांच्यासाठी महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा या तीन राज्यांची सीमा असलेल्या सिरोंचा येथे अनेक अडचणींचा सामना करून निवडणूक पथक पोहोचले.
१०० वर्षीय मादबोईना यांच्यासोबतच किष्टय्या लसमय्या कोमेरा या ८६ वर्षीय वयोवृद्धानेदेखील गृहमतदान केले. हे मतदान घेण्यासाठी अहेरी विधानसभा मतदार संघातील गृह मतदान चमूने अहेरी ते सिरोंचा हे तब्बल १०७ किलोमीटरचे अंतर गाठले व गृह मतदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर या दोघांचे मतदान नोंदविले. दोघेही वयोवृद्ध एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी गृहमतदानाची निवड करून आपले मत घरातच स्थापन केलेल्या तात्पुरत्या मतदान कक्षात गोपनीयता बाळगून नोंदविले.
कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच ८५ वर्षांवरील मतदार आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्या अनुषंगाने गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनात ८ ते १४ एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात बुधवारपर्यंत ८५ वर्षांवरील ९२३ मतदार आणि २८२ दिव्यांग, अशा एकूण १२०५ मतदारांनी आतापर्यंत गृह मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. संपूर्ण मतदार संघातून ८५ वर्षावरील १०३७ व ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेले ३३८ असे १३७५ मतदारांचे गृह मतदानासाठीचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी मंजूर केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.