२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकत्र लढलेले पक्ष २०२४ च्या निवडणुकीत कट्टर राजकीय शत्रू झाले आहेत. गेल्या दीड वर्षांत महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे मतदार निराश आणि संतप्त झाल्याचे दिसून येत आहे. पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसणार हे निश्चित मानले जात आहे. गेल्या २५ वर्षांपासून पश्चिम विदर्भ हा शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचा गड मानला जात आहे. बुलडाणा, वाशीम-यवतमाळ, अमरावती, अकोला या मतदारसंघांमध्ये शिवसेना-भाजपचे वर्चस्व राहिले आहे. पण, यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे वर्चस्व राहील का एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे, याची उत्सुकता आहे.
अकोलाः काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जनता पक्ष, असा तिरंगी सामना अकोला लोकसभा मतदारसंघात रंगण्याची चिन्हे आहेत. तिरंगी लढतीचा फायदा नेहमी भाजपला होत असल्याचा इतिहास आहे. या सर्व गदारोळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांना झटका देते की तारते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी काँग्रेससोबत बोलण्याचे संकेत दिल्याने काँग्रेसचा उमेदवार रिंगणात राहतो की नाही याबाबत कोडेच आहे. दुसरीकडे भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्याविरोधात दस्तुरखुद्द भाजपचेच माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्या या निर्णयाने भाजपसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
काँग्रेसतर्फे डॉ. अभय पाटील यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. अनुप धोत्रे व डॉ. अभय पाटील हे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. तर गेल्या लोकसभा निवडणुकीत आंबेडकर यांनी सोलापूर मतदार संघातून उमेदवारी दाखल केली होती. अकोला प्रकाश आंबेडकर यांचा परंपरागत लोकसभा मतदार संघ असून या मतदार संघातून त्यांनी दोनदा (१९९८ आणि १९९९) लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे.
बुलडाणा: राजमाता जिजाऊंच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मातृतीर्थ बुलडाणा मतदारसंघात यावेळी थेट ऐवजी बहुरंगी लढती होतील, असा अंदाज आहे. राज्यस्तरापासून स्थानिक ठिकाणापर्यंत सर्वच राजकीय समीकरणे बदलल्याने आजवर पारंपरिक काँग्रेस आणि शिवसेना अशी थेट लढत न होता यावेळी दोन तुल्यबळ अपक्ष, वंचित बहुजन आघाडी या उमेदवारांमुळे ही बहुरंगी लढत अपेक्षित आहे.
बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून खासदार प्रतापराव जाधव यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे, तर आघाडीच्या वतीने शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रा. नरेंद्र खेडेकर हे उमेदवार आहेत. स्पर्धेतील पहिल्या दोन उमेदवारांसोबतच खालोखाल मते घेणाऱ्या बहुजन वंचित आघाडीने यावेळी वसंतराव मगर यांना संधी दिली आहे. याशिवाय तुल्यबळ अपक्षांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर व बुलडाणा मिशनचे संदीप दादा शेळके हेही उमेदवार आहेत. हे सर्वजण बहुसंख्येने असलेल्या मराठा-कुणबी समाजातून येतात. त्यामुळे चौघांमध्ये मत विभाजन होणार हे निश्चित आहे. परंतु आता हे किती प्रमाणावर होते? यासाठी निकालाची वाट पहावी लागणार आहे.
यवतमाळ : ‘ही लोकसभेची निवडणूक देशासाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणणे महायुतीतील सर्वच घटक पक्षांची जबाबदारी आहे,’ असे विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील जाहीर सभेत केले.
यवतमाळ-वाशीम लोकसभेची उमेदवारी ऐन वेळी जाहीर केल्याने व खासदार भावना गवळी यांची उमेदवारी कापल्याने आता खरी परीक्षा आहे ती राज्याचे मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री व घटक पक्षातील सर्व आमदारांची! उमेदवार फक्त परीक्षेला बसला आहे, अभ्यास महायुतीतील सर्व घटक पक्षांना करायचा आहे.
महायुतीत यवतमाळ-वाशीम हा लोकसभा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आला. गेली २५ वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व शिवसेनेच्या नेत्या भावना गवळी यांनी केले. त्यामुळे या मतदारसंघावर त्यांचा नैसर्गिक दावा होता. संजय राठोड यांनीही उमेदवारी मागितल्याने पक्षप्रमुखासमोर मोठा पेच निर्माण झाला. अखेर दोघांनाही उमेदवारी न देता हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना ऐन वेळी उमेदवारी जाहीर केली. ही तारेवरची कसरत करीत असताना खासदार भावना गवळी बंड करणार नाहीत व राठोड पक्षाची धुरा खांद्यावर घेतील याची काळजी मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली.
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांची उमेदवारी आधीच जाहीर झाल्याने त्यांची प्रचाराची पहिली फेरी संपली आहे. येथे तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची संघटनात्मक बांधणी मजबूत नसल्याने आणि महायुतीच्या राजश्री पाटील यांच्यासाठी जातीय समीकरण जमेची बाजू असल्याने सामना रंगतदार होणार हे निश्चित.
वर्धाः महाराष्ट्राच्या निर्मितीपासून वर्धा लोकसभा मतदार संघ काँग्रेसकडे होता. २०२४ लोकसभेत ही जागा पहिल्यांदाच महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाट्याला गेली. असे असले तरी उमेदवाराकरिता त्यांना चांगलेच भटकावे लागले. अखेर काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना ऐनवेळी पक्षात घेत त्यांना उमेदवारी दिली. गेल्या दोन निवडणुकांपासून येथे भाजपचे वर्चस्व आहे. यावेळी वर्धा लोकसभेत महायुतीचे उमेदवार रामदास तडस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या थेट लढत आहे. मात्र, संघटनात आघाडीवर असलेली भाजप वेळेवर फेरबदल करण्यात यशस्वी झाली आहे. यामुळे वर्ध्यात सध्या ‘संघटन’ विरुद्ध ‘गठबंधन’ अशी स्थिती आहे.
अमरावती : अमरावती लोकसभा निवडणुकीत अनेक वर्षांनी भाजप व काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवार आमने-सामने आहेत. आजवर ही जागा महायुती किंवा महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या ताब्यात राहिली आहे. गेल्या निवडणुकीत (सन २०१९) काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अमरावती लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या नवनीत राणा यंदा भाजपच्या चिन्हावर रिंगणात आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे मैदानात उतरले आहेत. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने दिनेश बूब यांच्या रूपात उमेदवार दिल्याने वाटते तेवढी निवडणूक सोपी राहिलेली नाही. सोमवारी (ता. आठ) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर तसेच वंचित बहुजन आघाडी काय भूमिका घेतात, यावर सुद्धा राजकीय समीकरण अवलंबून राहणार आहे. रिपाइंचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेचा विचार करणे देखील तेवढेच महत्त्वाचे राहणार असल्याचे मानले जाते. प्रहार हा राज्यातील महायुतीतील घटक पक्ष आहे. परंतु त्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार दिला आहे. त्यांनी दिलेला उमेदवार हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी तसेच महायुतीत एकाच वेळी फूट पडल्याचे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.