नागपूरः पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. रात्री उशिरापर्यंत मतांची टक्केवारी अधिकृतपणे समोर आली. तरी मागच्या तुलनेत कमी मतदान झाल्याची चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नागपुरात या कमी टक्केवारीची चर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बोलताना केली. या पार्श्वभूमीवर कमी टक्केवारी महायुती की महाविकास आघाडीपैकी कोणाच्या पथ्थ्यावर पडणार याची चर्चा राज्यभर सुरू झाली आहे.
दीपक फुलबांधे
भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये एकूण मतदान ६८.२७ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा ६४.७२ टक्के मतदान झाले आहे. तुलनात्मक पाहिल्यास जवळपास चार टक्क्यांची घट दिसून येते. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी व तुमसर तालुक्यांत विकास परिषद (चरण वाघमारे) तसेच विणकर समाजाने काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांना पाठिंबा दिला. परमात्मा एक सेवक समाजात बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याबाबत असंतोष होता. त्याचा भाजप उमेदवार सुनील मेंढे यांना फटका बसू शकतो. भंडारा विधानसभा क्षेत्रात भंडारा येथे भाजप व काँग्रेसला जवळपास समान मते पडली तर पवनी तालुक्यात काँग्रेसला अधिक मते मिळाल्याचा अंदाज आहे.
साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखनी व साकोली येथे भाजप तर, पालांदूर, लाखांदूर, सानगडी, दिघोरी या भागात काँग्रेस पुढे दिसते आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात मतदारांनी काँग्रेसला झुकते माप दिल्याचे चित्र आहे. तिरोडा क्षेत्रात भाजपला आघाडीचा अंदाज असून, तेथे आमदार विजय रहांगडाले व इतरांनी चांगले काम केले. गोंदिया हा प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला असला तरी फोडाफोडीचे राजकारण मतदार व पक्षातील पदाधिकारी यांच्या पचनी पडले नाही. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांना उघड पाठिंबा असला तरी दीर्घ काळापासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपला मतदान केले नाही, असे बोलले जाते. काही ठिकाणी बसपचे संजय कुंभलकर, माजी आमदार सेवक वाघाये, वंचितचे संजय केवट यांनासुद्धा ग्रामीण भागातून मते मिळण्याची शक्यता आहे.
भंडारा गोंदियाः मतदान
२०१९ः ६८.२७ टक्के
२०२४ः ६४.७२ टक्के
विधानसभानिहाय मतदान टक्केवारीत
(कंसातील माहिती २०१९ ची)
तुमसर ६३.५१ (७०.२६)
भंडारा ६४.५५ (६५.६७)
साकोली ६८.९८ (७१.६५)
अर्जुनी मोरगाव ६८.७९ (७१.४१)
तिरोडा ६१.१० (६८.०८)
गोंदिया ६१.४१ (६४.४१)
गडचिरोली : नक्षलवादाच्या सावटात असलेल्या गडचिरोली-चिमूर मतदार संघातील मतदारांनी लोकशाहीचा कायम विरोध करत आलेल्या नक्षलवाद्यांच्या नाकावर टिच्चून भरघोस मतदान केले. शुक्रवार (ता.१९) सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६५.१९ टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी दुर्गम भागातील पथके परत आल्यावर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ही टक्केवारी सत्तरच्या पार जाण्याची शक्यता आहे.
या मतदार संघात २०१९ च्या निवडणुकीत ७१. ९२ टक्के मतदान झाले. त्यावेळी भाजपचे अशोक नेते हेच विजयी झाले होते. यंदा २०२४ च्या निवडणुकीत ६५.१९ टक्के मतदान झाले असून भाजपकडून पुन्हा अशोक नेते हेच रिंगणात आहेत. १९९६ व २००४ त्यानंतर २०१४ व २०१९ असे चारदा भाजपने हा गड जिंकल्याचा अपवाद सोडल्यास १९६७ पासून हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे.
२००९ पासून हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी (एसटी) आरक्षित होताच काँग्रेसचे मारोतराव कोवासे यांनी विजय प्राप्त केला. मागच्या दोन निवडणुकीत कॉँग्रेसच्या डॉ. नामदेव उसेंडी यांना अशोक नेते यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. यंदा काँग्रेसने डॉ. नामदेव किरसान यांच्यावर डाव लावला आहे. नेतेंच्या हॅटट्रिकसाठी भाजपसह महायुतीनेही प्रचारात जिवाचे रान केले आहे. एकूण लढत निकराची आणि तुल्यबळ असल्याचे दिसून येते. शुक्रवारी शहरी व ग्रामीण भागांत मतदारांनी मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कुरखेडा येथील मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे लक्षात येताच तातडीने मतदान यंत्र बदलून प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.
गडचिरोली-चिमूरः मतदान
२०१९ः ७१.९२ टक्के
२०२४ः ६५.१९ टक्के
विधानसभानिहाय मतदान टक्केवारीत
(कंसातील माहिती २०१९ ची)
आमगावः ६४. ६० (६८.६८)
आरमोरीः ६५. २३ (७३.८)
गडचिरोलीः ६६. १० (७२.८८)
अहेरीः ६३. ४० (६७.०३)
ब्रह्मपुरीः ६७. ०२ (७५.२६)
चिमूरः ६४. ४९ (७३.५९)
प्रमोद काकडे
चंद्रपूरः चंद्रपूर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी ६७.५७ एवढी असून मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदान तीन टक्यांनी वाढले आहे. वाढीव मतदार नेमके कुणाच्या पथ्यावर पडणार या चिंतेने उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी भाजपचे हंसराज अहीर यांचा पराभव केला होता. यावेळी काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर आणि भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांच्यात थेट लढत आहे. मागील निवडणुकीत वंचितचे अॅड. राजेंद्र महाडोरे यांनी एक लाख १२ हजार ७९ मते घेतली होती.
यंदा मात्र वंचितचे उमेदवार राजेश बेले फारसे चर्चेत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपुरात सभा झाली. सभेने चांगले वातावरण केले. काँग्रेसकडून मोठ्या नेत्यांची सभा झाली नाही. २०१९ मध्ये देशात मोदी लाट असतानाही शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकर यांनी पंधरा वर्षांनंतर चंद्रपूर लोकसभेवर काँग्रेसचा झेंडा पुन्हा रोवला. हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला होता. यानंतर चंद्रपूरची जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची या दिशेने भाजपने रणनीती आखणे सुरू केले. यावेळी तगडा उमेदवार देण्याचा निर्णय भाजपने घेतला. दुसरीकडे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेचे तिकीट पक्षाकडे मागितले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुलगी शिवानी वडेट्टीवार यांना तिकीट मिळावी म्हणून दिल्ली दरबारी आपले वजन लावले. परंतु, शेवटी प्रतिभा धानोरकर यांना तिकीट फायनल झाले.
चंद्रपूर लोकसभाः मतदान
२०१९ः ६४.७२ टक्के
२०२४ः ६७.५७ टक्के
विधानसभानिहाय मतदान टक्केवारीत
(कंसातील माहिती २०१९ ची)
राजुरा ७०.०९ (६९.६१)
चंद्रपूर ५८.४३ (५३.१०)
बल्लारपूर ६८.३६ (६४.१६)
वरोरा ६७.७३ (६३.३५)
वणी ७३.२४ (७१.८१)
आर्णी ६९.५२ (६९.५२)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.