नारायणगाव : ‘‘महायुतीच्या सरकारविषयी जनतेत प्रचंड रोष आहे. राज्यात महाविकास आघाडीचे ४८ पैकी ३२ ते ३५ खासदार निवडून येतील, अशी स्थिती आहे. निष्ठा, प्रामाणिकपणा, तत्त्व याला तिलांजली देणाऱ्यांना या निवडणुकीत जागा दाखवून द्या. महाराष्ट्राचा द्वेष करणारे सरकार दिल्लीतून हद्दपार करा,’’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची सांगता सभा शनिवारी (ता. ११) सायंकाळी नारायणगाव (ता. जुन्नर) येथे झाली. त्यावेळी जयंत पाटील पाटील बोलत होते. यावेळी डॉ. कोल्हे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार चंद्रकांत हांडोरे, आमदार शशिकांत शिंदे व भास्कर जाधव, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, अनंतराव चौगुले, योगेश पाटे, माउली खंडागळे, बाजीराव ढोले, सुरेश भोर, मोहित ढमाले, विजय कुऱ्हाडे, सुजित वाजगे, डॉ. शुभदा वाव्हळ, माजी नगराध्यक्ष सुनील मेहेर आदी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, ‘‘डॉ. कोल्हे यांच्याकडे तत्त्व व निष्ठा आहे. राज्यातील जनता निष्ठा व तत्त्वाशी एकनिष्ठ राहते, असा इतिहास आहे. खोके घेतलेल्या बोक्यांच्या मागे राहत नाहीत. डॉ. कोल्हे यांचा पराभव करण्यासाठी दोन उपमुख्यमंत्र्यांना बारा सभा घ्याव्या लागतात. यातच डॉ. कोल्हे यांचा विजय निश्चित आहे.’’
बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘‘बहुतेक माणसे राजकारणात व्यवहार पाहतात, मात्र डॉ. कोल्हे यांनी राजकारणातला व्यवहार न पाहता विचार, निष्ठा व तत्त्वाशी प्रामाणिक राहिले. जे गेले ते स्वतःचा उद्धार करण्यासाठी गेले. देशातील राजकारण बिघडले आहे. देशातील लोकशाही, घटना वाचवण्यासाठी भाजप सरकार व राज्यातील खोके सरकार हद्दपार करा.’’
जयंत पाटील म्हणाले...
गुजरातचा कांदा निर्यात होतो. महाराष्ट्रातला कांदा निर्यात होत नाही.
‘महानंद’सारखे राज्यातील अनेक प्रकल्प पळवले जातात. राज्यातील पक्ष फोडतात.
महाराष्ट्राचा द्वेष करणारे हे सरकार दिल्लीतून हद्दपार करण्याची हीच वेळ आहे.
भाजपने शिवसेनेचे दोन तुकडे केले आहेत. जनतेला हे पटले नाही. शिवसेनेतून गेलेले ४० आमदार व १३ खासदार गद्दार आहेत. उद्धव ठाकरे यांना राजगादीवरून हटवणाऱ्या गद्दारांचा शिवसैनिक बदला घेतील. त्यांना गाडल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाहीत. शिवसैनिक निर्धाराने काम करत आहेत. सत्ता बदल नक्की आहे. आगामी विधानसभा आपण पुन्हा एकत्र लढविणार आहोत.
- भास्कर जाधव,
आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.