राजू शेट्टी हे स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
Hatkanangle Loksabha Election : एकीकडे बहुतांशी लोकसभा मतदारसंघांत उमेदवारांची घोषणा होऊन काहींनी प्रत्यक्ष प्रचारालाही प्रारंभ केला आहे. मात्र, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात अद्यापही प्रमुख उमेदवारांची अधिकृत घोषणाच झालेली नाही. संभाव्य उमेदवारीबाबत उलट-सुलट चर्चा अद्यापही संपलेली नाही. त्यामुळे या मतदारसंघातील लढत ही सद्य:स्थितीत तरी दुरंगी की तिरंगी होणार, याबाबत उत्सुकता आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) व राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यात सरळ लढत झाली. त्यावेळी श्री. माने हे महायुतीचे उमेदवार होते; तर शेट्टी यांना काँग्रेस आघाडीने पुरस्कृत केले होते. याशिवाय वंचित आघाडीचे अस्लम सय्यद हे निवडणूक रिंगणात उतरले आणि त्यांनी लक्षवेधी मते घेतली होती. गेल्यावेळी माने यांना उमेदवारी मिळविताना फारसा त्रास झाला नाही. यावेळी मात्र विद्यमान खासदार असतानाही त्यांची उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत आहे. त्यांच्यासोबतच रोज नव-नवी नावे चर्चेत येत आहेत.
दुसरीकडे राजू शेट्टी हे स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून डॉ. सुजित मिणचेकर यांच्या नावावर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बैठकीमध्ये चर्चा झाली. बहुजन वंचित आघाडीचा उमेदवार कोण असणार, याकडेही विशेष लक्ष असणार आहे.
सध्या सुरू असलेल्या हालचाली पाहता, मतदार संघात तिरंगी लढतीची शक्यता अधिक आहे. मात्र, अंतिम टप्प्यात काही आकस्मिक राजकीय घडामोडी होऊन शेट्टी यांना इंडिया आघाडीने पाठिंबा दिल्यास मात्र दुरंगी लढत होऊ शकते. तथापि, शेट्टी यांची ‘एकला चलो रे’ची भूमिका पाहता, अशी राजकीय परिस्थिती तयार होणे सध्या तरी कठीण दिसत आहे. तर माने यांना बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे उमेदवारी मिळविण्याबरोबरच विजय मिळवितानाही मोठे आव्हान असणार आहे.
हातकणंगले मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि इस्लामपूर या दोन मतदारसंघांचा समावेश होतो. येथील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महाडिक गट, आमदार मानसिंगराव नाईक, देशमुख गट यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणार आहेत. कोणता गट कोणाकडे जातो यावर विजयाचे पारडे झुकणार अाहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.