सोलापूर : ‘शतकानुशतकांच्या अन्यायाचे प्रायश्चित्त म्हणून वंचित घटकांना आरक्षण देण्यात आले असून ते टिकविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,’ अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरही आरक्षण संपवू शकत नाही मग मोदी काय करू शकतील? असा सवाल त्यांनी आज सोलापूर येथील सभेत बोलताना केला. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आज (ता. २९) होम मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर इंडिया आघाडी गायब झाल्याचे सांगून मोदी म्हणाले, ‘‘ इंडिया आघाडीत नेत्याच्या नावावर महायुद्ध सुरू आहे.
गेल्या दहा वर्षांत मोदींना पारखलात, मोजलात, पाहिलात. मात्र, ज्यांचे नाव, चेहरा माहिती नाही, त्यांच्या हाती एवढा मोठा देश आपण चुकूनही देणार नाही. परंतु फाळणीनंतर आता सत्ता बळकावण्यासाठी विरोधकांनी पाच वर्षात पाच पंतप्रधान आणून देशाला लुटण्याचा घाट घातला आहे. नकली शिवसेना आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी अनेक उमेदवार असल्याचे सांगत आहे. यावरून त्यांना देश चालवायचा नाही तसेच जनतेची चिंता नाही असे दिसते.’’
‘‘दलित, ओबीसी, आदिवासींचे नेतृत्व वाढू नये याची खबरदारी विरोधकांनी घेतली. निवडणुकीत पराभूत करून भारतरत्न न देता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाबू जगजीवनराम यांचा अवमान केला. जम्मू काश्मीरमध्ये ३७० वे कलम लागू करून बाबासाहेबांच्या संविधानाचाही अवमान केला.
आम्ही ते हटवून तेथील वंचितांना मतदान, आरक्षणाचा लाभ दिला. जे ६० वर्षे मागे राहिले त्यांना लाभ मिळावा, सत्ता, संपत्तीवर पहिला हक्क त्यांचा आहे हे आमचे धोरण आहे. आमचे लक्ष हे केवळ मतपेढीवर नाही. आम्ही दलित व आदिवासी कन्येला राष्ट्रपतिपदी बसविले. भाजपचे ६० टक्के मंत्री मागासवर्गीय आहेत. मात्र, काँग्रेसचे पितळ उघडे पडल्याने ते चवताळले आहेत. मोदींना शिव्या देणे हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. ते देशाविषयी बोलत नाहीत. मात्र, आमच्याकडे व्हीजन आणि त्यासाठी जीवनही आहे,’’ असे मोदी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.