Prof. Madhu Dandavate esakal
लोकसभा २०२४

Madhu Dandavate : ..तर एक मराठी माणूस पंतप्रधान झाला असता; पक्षाचे अध्यक्ष असूनही त्यांनी 'तसं' केलं नाही!

१९८९ ला पंतप्रधान होण्याची पहिली संधी प्रा. मधू दंडवते (Prof. Madhu Dandavate) यांना चालून आली होती.

सकाळ डिजिटल टीम

देवेगौडांनी दंडवत्यांना कर्नाटकातील हसन मतदारसंघातून उभे राहण्याचा आग्रह केला. पण, दंडवते यांनी राजापूरमधूनच उभे राहणार असा हट्ट धरला.

-सतीश पाटणकर

Rajapur Constituency : १९८९ ला पंतप्रधान होण्याची पहिली संधी प्रा. मधू दंडवते (Prof. Madhu Dandavate) यांना चालून आली होती. तेव्हा ते जनता पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांनी पंतप्रधान पदावर दावा सांगितला असता तर कोणीही नकार दिला नसता. पण, त्यांनी तस केलं नाही. दुसऱ्यांदा तशी संधी १९९६ ला आली होती. तेव्हा काँग्रेसची सत्ता होती. नरसिंहराव पंतप्रधान होते. पण, बाबरीची घटना, मुंबई दंगल, बॉम्बस्फोट, हवाला, हर्षद मेहता घोटाळा, अशा अनेक कारणांमुळे नरसिंहराव सरकारची लोकप्रियता ढासळली होती. काँग्रेस परत सत्तेत येत नाही हे सगळ्यांनाच कळालं होतं.

तेव्हा विरोधी पक्ष दुप्पट मेहनत घेऊन निवडणुकीसाठी उतरले. मधू दंडवते यांनी नेहमीप्रमाणे कोकणातल्या राजापूर मतदारसंघात तयारी सुरू केली. राजापूर हा मधु दंडवते यांचा एकेकाळचा बालेकिल्ला. अगदी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर आलेल्या काँग्रेस (Congress) लाटेतही त्यांनी इथून विजय मिळवला होता. एकाच मतदारसंघातून सलग पाच वेळा खासदार बनण्याची किमया त्यांनी साकारली होती. पण, १९९१ ला दुर्दैवाने त्यांचा पहिल्यांदा पराभव झाला. हा पराभव साधा नव्हता तर ते थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते.

कोकणात तेव्हा विरोधी पक्षाची जागा शिवसेना भरून काढत होती. शेकाप आणि जनता दलापेक्षा शिवसेनेचा आक्रमक पवित्रा कोकणवासीयांना भावत होता. बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) भाषणं, मुंबईत शिवसेनेनं केलेली काम यामुळे अगदी तळकोकणातही शिवसेना जाऊन पोहचली. मधू दंडवते यांच्या वाटणीची मते मतदारांनी शिवसेनेच्या झोळीत टाकण्यास सुरवात केली. १९९६ सालच्या निवडणुकीत देखील त्यांचा पराभव होणार असच वातावरण होतं. मधू दंडवते तेव्हा जनता दलाचे सर्वांत ज्येष्ठ नेते होते. कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. देवेगौडा त्यांना आपले राजकीय गुरु मानायचे.

राजापूरमधून मधू दंडवते पडणार हे त्यांना देखील सूत्रांकडून कळालं होतं. १९९६ ला लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा मुख्य लढत काँग्रेस व भाजप यांच्या नेतृत्वाखालील आघाड्यांमध्ये होईल हे उघड होते. तथापि, तिसऱ्या आघाडीलाही बरीच संधी आहे, असे प्रतिपादन करणारा जनता दलाचे नेते मधू दंडवते यांचा लेख तेव्हा एका प्रमुख इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाला. देवेगौडा यांनी तो लेख वाचला तेव्हा ते प्रचंड अस्वस्थ झाले. तिसरी आघाडी जर सत्तेत आली तर दोन मुख्य नावे पंतप्रधान पदासाठी चर्चेत आली असती. एक तर मधू दंडवते आणि दुसरे होते रामकृष्ण हेगडे. रामकृष्ण हेगडे देखील जनता दलातील मोठे नेते होते. पण, ते कर्नाटकात देवेगौडा यांचे स्पर्धक मानले जायचे. काहीही झालं तरी ते पंतप्रधान नाही झाले पाहिजेत, असं देवेगौडांना वाटायचं.

हेगडे यांना रोखू शकणारं एकच नाव होतं, ते म्हणजे मधू दंडवते. देवेगौडांनी दंडवत्यांना कर्नाटकातील हसन मतदारसंघातून उभे राहण्याचा आग्रह केला. पण, दंडवते यांनी राजापूरमधूनच उभे राहणार असा हट्ट धरला. तुम्ही एकदा तेथून पराभूत झालेले आहात, तेथून विजयी होणे तुम्हाला फार कठीण आहे, हसनमधून नक्की निवडून याल आणि मग पंतप्रधान व्हाल, असे देवेगौडांनी सांगितले. पण, दंडवते काही ऐकेनाच. आपण इतकी वर्षे राजापूरमधून निवडणूक लढवली आता केवळ पराभवाच्या भीतीने आपला मतदारसंघ बदलणे हे तत्वाला धरून नाही असं त्यांचं म्हणणं पडलं. शेवटी दंडवते यांनी राजापूरमधूनच फॉर्म भरला. सहाजिकच ते पुन्हा पराभूत झाले.

शिवसेनेच्या सुरेश प्रभू यांनी राजापूरातून विजय मिळवला. दंडवते पुन्हा तिसऱ्या स्थानी राहिले. या पराभवामुळे त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली. पण, त्यांच्या अंदाजाप्रमाणे तिसऱ्या आघाडीचं सरकार सत्तेत आलं. दंडवते यांच्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या देवेगौडा यांनी रामकृष्ण हेगडेंना रोखण्यासाठी नवी चाल खेळली. ते स्वतःच पंतप्रधान झाले. मराठी माणूस त्या पदावर विराजमान होण्याची संधी अशा प्रकारे हुकली.

(लेखक मुख्यमंत्र्याचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT