Satara Lok Sabha Karad Mahayuti sabha Narendra Modi esakal
लोकसभा २०२४

Satara Lok Sabha : 'येत्या महिनाभरात देशात मोठ्या समाजविघातक घटना घडविण्याचा विरोधकांचा डाव'; PM मोदींचा गंभीर आरोप

२०१३ मध्ये भाजपने मला पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केले. तेव्हा मी सर्वप्रथम रायगडावर गेलो.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसने कर्नाटकमध्ये ओबीसींचा हक्क मारण्याचा खेळ केला आहे. एका रात्रीत २७ टक्के ओबीसींमध्ये सर्व मुस्लिमांचा समावेश केला. आता तेच त्यातील मोठा वाटा उचलत आहेत.

कऱ्हाड : सोशल मीडियातून चुकीचे व्हिडिओ पाठवून देशामध्ये सामाजिक तणाव निर्माण करण्याचे काम विरोधकांकडून होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून येत्या महिनाभरात देशामध्ये मोठ्या समाजविघातक घटना घडविण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज कऱ्हाड येथील सभेत केला. सोशल मीडियावरील फेक व्हिडिओ पुढे पाठविण्यापूर्वी विचार करा, कायदे कडक आहेत, तुमचेही नुकसान होऊ शकते, अशा व्हिडिओंबाबत पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे (Mahayuti) उमेदवार खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या प्रचारार्थ कऱ्हाड येथे आज मोदींची सभा झाली. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी आमदार मदन भोसले, माथाडी नेते नरेंद्र पाटील, डॉ. अतुल भोसले आदी उपस्थित होते.

महिनाभरात देशात मोठे कांड

पंतप्रधान म्हणाले, ‘‘एकविसावे शतक तंत्रज्ञानाचे युग आहे. त्याचा मीही समर्थक आहे. मी लोकांशी जोडण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतो; परंतु आत्ता फार चिंताजनक प्रकार सुरू आहेत. जे सरकारशी मुद्द्यांवर, खरेपणाने त्यांनी केलेल्या कामाच्या आधारावर लढू शकत नाहीत, ते सोशल मीडियावर फेक व्हिडिओ तयार करत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साह्याने पक्षाचे विविध नेते, माझे, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व काही मुख्यमंत्र्यांच्या आवाजात व्हिडिओ तयार करून पसरवत आहेत. नको ती वाक्ये आमच्या तोंडी घालून आग पसरविण्याचे काम सुरू आहे.

या व्हिडिओच्या माध्यमातून समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. येत्या महिनाभरात देशात मोठी समाजविघातक घटना घडविण्याचा विरोधकांचा खेळ सुरू आहे. लोकशाहीच्या भल्यासाठी, देशाच्या सुखशांतीसाठी, एकतेसाठी सोशल मीडियावर आलेल्या फेक व्हिडिओची पोलिसात तक्रार करा, असे व्हिडिओ पुढे पाठविण्यापूर्वी विचार करा. कायदे कडक आहेत. त्याने तुमचेही नुकसान होऊ शकते. कोणा निर्दोषावर कारवाई व्हावी, असे मला वाटत नाही. त्यासाठी सावध राहा.’’ निवडणूक आयोगानेही अशा व्यक्तींवर कारवाई करावी, असे आवाहनही मोंदीनी केले.

रायगडाच्या प्रेरणेनुसारच काम

२०१३ मध्ये भाजपने मला पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केले. तेव्हा मी सर्वप्रथम रायगडावर गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या समोर ध्यानस्थ झालो. तेथील पवित्र भूमीने दिलेली प्रेरणा, बळ आणि आशीर्वादावर मी गेली दहा वर्षे जनतेची सेवा करत आहे. सातारा शौर्याची भूमी आहे. या भूमीने छत्रपती शिवाजी महाराजांचे सुशासन बघितले आहे, तेच सुशासन आम्‍ही संपूर्ण देशात राबवत आहोत.’’

वन रॅंक वन पेन्शनमधून एक लाख कोटी दिले

सैन्य दलाकडे आता आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून बनलेल्या सरस शस्त्रांचा समावेश आहे. साताऱ्याला सैनिकांची परंपरा आहे. मिलिटरी अपशिंगे व जिल्ह्यातील सर्व सैनिकांच्या परिवारांना त्याचा गर्व होणार, त्यांना याचा आनंद होणार; परंतु काँग्रेसचे हत्यारांचे दलाल त्यामुळे खुश होणार नाहीत. ते मोदी सरकारची प्रशंसा करणार नाहीत. काँग्रेसने ४० वर्षे वन रॅंक वन पेन्शन योजना लागू केली नाही; परंतु आम्ही एक लाख कोटी रुपयांहून माजी सैनिकांना देत वन रॅंक वन पेन्शनची अंमलबजावणी केली, ही मोदींची गॅरंटी असल्याचे ते म्हणाले.

मराठा साम्राज्याची जगावर छाप

मराठा साम्राज्याच्या गौरवशाली परंपरेची छाप जगभरात पाडण्याचे काम आमचे सरकार करत आहे. देश स्वतंत्र झाला, तरी काँग्रेसने गुलामगिरीच्या मानसिकतेतून नौसेनेच्या झेंड्यावर इंग्रजांचे चिन्ह तसेच ठेवले होते. खरेतर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौसेनेची पूर्ण जगावर दहशत होती. आजही नौसेनेचा विषय निघाल्यास जगभरात त्याची चर्चा होती. आम्ही विचार केला, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतीक झेंड्यावर असेल, तर देशाच्या नौसेनेची ताकद वाढेल. गाजावाजा करत आम्ही भारतीय नौसेनेच्या झेंड्यावर त्यांना स्थान दिले. मराठा सैन्याने बांधलेल्या लोहगड, सिंधुदुर्ग व तमिळनाडूतील जिंजीच्या किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मराठा साम्राजाच्या वारशाची छाप संपूर्ण जगावर पडल्यास सर्वांना गर्व होणार आहे; परंतु काँग्रेसला त्याचा त्रास होतोय, असेही मोदी म्हणाले.

काश्‍मीरमधील दलित-आदिवासींना आरक्षण

काँग्रेसने देशात ६० वर्षे राज्य केले; परंतु काश्‍मीरमध्ये संविधान लागू केले नाही. ३७० ची भिंत उभी केली होती. तेथील दलित-आदिवासींना आरक्षण मिळत नव्हते. आपल्या या सेवकाने हे कलम कब्रस्तानात गाडले. त्यामुळे देशाची शान वाढली. देशाच्या एकतेला ताकद मिळाली, तसेच त्यामुळे दलित, आदिवासी, ओबीसींबरोबरच महिलांनाही आरक्षणाचा लाभ मिळू लागला आहे.

मी जिवंत असेपर्यंत धर्मावर आधारित आरक्षण नाही

काँग्रेसने कर्नाटकमध्ये ओबीसींचा हक्क मारण्याचा खेळ केला आहे. एका रात्रीत २७ टक्के ओबीसींमध्ये सर्व मुस्लिमांचा समावेश केला. आता तेच त्यातील मोठा वाटा उचलत आहेत. ओबीसींच्या हक्कावर दरोडा टाकला. संविधान बदलून हाच फॉर्म्युला ते संपूर्ण देशात राबविणार आहेत; परंतु मी जिवंत असेपर्यंत धर्माच्या आधारावर आरक्षण होऊ देणार नाही. संविधान बदलू देणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

संपत्ती व्होट बॅंकेत वाटणार

ठराविक जणांच्या तुष्टीकरणासाठी काँग्रेसने गुडघे टेकले आहेत. देशातील जनतेची संपत्ती मोजणार आहेत. घराघरांवर छापा टाकणार आहेत. ठराविक मर्यादेपेक्षा जास्‍त संपत्ती आढळल्‍यास ती जप्‍त करून पारंपरिक व्‍होट बँक असणाऱ्या समुदायाला ते वाटणार आहेत. हे तुम्‍हाला मान्‍य आहे का, असा सवालही नरेंद्र मोदी यांनी उपस्‍थितांना केला.

बहिणीच्या घरी व शेतकऱ्याच्या शेतात पाणी

जिल्ह्यातील जनतेचा पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मोदींनी आजच्या सभेत दिले. ते म्हणाले, ‘‘(कै.) लक्ष्मणराव इनामदार पाणी उपसा योजना, तारळी, टेंभू, वांग- मराठवाडी सिंचन प्रकल्प हे महायुती सरकारच्या प्राथमिकतेवर आहेत. येत्या पाच वर्षांत यासह अनेक योजना मार्गी लावून शेतकऱ्यांच्या शेतात व प्रत्येक बहिणीच्या घरात पाणी पोचविण्याचे काम आम्ही करणार आहोत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत १५०० कोटी रुपये दिले आहेत. उसाच्या एफआरपीमध्ये मोठी वाढ केली. त्याचा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. जिल्ह्यातील कनेक्टिव्हिटी वाढवत आहे. तुमचे स्वप्न माझा संकल्प आहे. ते पूर्ण करण्याचे व्हिजनही माझ्याकडे आहे. जीवनही त्यासाठीच आहे. त्यामुळे सात मेपर्यंत घरोघरी जावा, त्यांना सांगा मोदी साताऱ्यात आले होते, तुम्हाला नमस्कार केला आहे.’’ देशासाठी वेळ काढा, मोठ्या संख्येने मतदान करा, असे आवाहन मोदी यांनी केले.

शिवरायांच्या नावाचा आठ वेळा उल्लेख

नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणा देऊन भाषणाची सुरुवात केली. यासह ३५ मिनिटांच्या भाषणात मोदी यांनी साताऱ्याची पवित्र भूमी, गडकिल्ले यासह विविध स्थानिक मुद्द्यांना स्पर्श करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख आठ वेळा केला.

साताऱ्यात भगवा फडकत राहणार

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज व छत्रपती शाहू महाराजांचा जयजयकार करत मोदींनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘‘सातारा हा प्रत्येक देशभक्तासाठी, भारतभक्तासाठी तीर्थस्थान आहे. मला लोक म्हणायचे साताऱ्यात यायची गरज नाही; पण मी म्हणालो, मला माझ्या परिवाराची भेट व आशीर्वाद घ्यायचे आहेत. उदयनराजेंना तुम्ही उमेदवार केले आहे. साताऱ्यात आधीही भगवा फडकत होता, पुढेही फडकत राहील. उपस्थित जनसमुदायात असलेला जोश व उत्साहाचा संदेश स्पष्ट आहे. फिर एक बार मोदी सरकार.’’

मोदी म्हणाले...

  • काँग्रेस सत्याच्या बाजूवर आमच्याशी समोरासमोर लढू शकत नाही.

  • आगामी काळात देशात काँग्रेस काहीतरी भयानक घडवून आणणार

  • काँग्रेसच्या समाजविघातक कृत्यापासून आपल्याला समाजाला वाचवायचे आहे.

  • काँग्रेसने देशातील आरोग्य सेवेचे ६०-७० वर्षांत वाटोळे केले.

  • साताऱ्यात ४०० आयुष्मान केंद्रे व १५ जनऔषधी दुकाने

  • एमबीबीएसच्या जागा दुपटीने वाढविल्या.

  • ७० वर्षांवरील सर्वांना आयुष्मान भारतमधून मोफत उपचार

  • ८० कोटी लोकांना मोफत धान्य देतो, त्याचा काँग्रेसला त्रास

  • दलित-आदिवासींच्या राजकीय आरक्षणाचा काळ वाढविला.

  • ओबीसी कमिशनला स्वतंत्र दर्जा दिला.

  • साताऱ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक विचारांना बळ दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT