Satara Lok Sabha Shashikant Shinde esakal
लोकसभा २०२४

Satara Lok Sabha : शिंदेंना अटक केल्यास राज्यभर आंदोलन करणार; शरद पवारांचा थेट इशारा

सत्तेचा गैरवापर हे सध्याच्या राज्यकर्त्यांचे महत्त्वाचं लक्षण आहे.

सकाळ डिजिटल टीम

घटनेला बदलण्याचं पाप भाजपच्या मनात आलंय हे तुम्ही लक्षात घ्या. देशाचं चित्र बदलायला लागलंय.

दहिवडी : सातारा लोकसभा (Satara Lok Sabha) मतदारसंघातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यावर काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना जर अटक केली, तर राज्यातील तालुक्या-तालुक्यामध्ये संयमाने आणि लोकशाही मार्गाने संघर्ष करून हा अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्र सहन करत नाही, हे दाखवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा खणखणीत इशारा राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला.

दहिवडी येथील बाजार पटांगणात माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Lok Sabha) महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, उत्तमराव जानकर, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील, राजे भूषणसिंह होळकर, काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई, अभयसिंह जगताप, सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे, संदीप मांडवे, प्रा. कविता म्हेत्रे, सुभाष नरळे आदी मान्यवर उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, ‘‘या लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. ही निवडणूक देशाची लोकशाही टिकवायची की नाही? लोकशाहीवर ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्या हातात सत्ता द्यायची, की नाही? याची आहे. सत्तेचा गैरवापर हे सध्याच्या राज्यकर्त्यांचे महत्त्वाचं लक्षण आहे. सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते; पण या राज्यकर्त्यांचा त्याच्यावर विश्वास नाही. त्यांच्यावर टीकाटिप्पणी केली म्हणून झारखंड, तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री यांना तुरुंगात टाकले. सत्तेचा गैरवापर केला जातोय. त्यामुळे त्यांच्या हातून सत्ता काढून घेणं ही तुमची, माझी जबाबदारी आहे. ते करण्यासाठी धैर्यशील मोहिते-पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचं काम आपल्याला करायचं आहे.’’

जयंत पाटील म्हणाले, ‘‘आमचा पक्ष फुटला; पण एक लक्षात ठेवा पोरं शाळा सोडून गेली म्हणून शाळा कधी बंद पडत नाही. पुन्हा नव्याने विद्यार्थी घडविण्याचं काम शाळेचा हेडमास्तर करतच असतो. आमचा हेडमास्तर लय खमक्या आहे. प्रभाकर देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे टेंभू योजनेतून माण-खटाव तालुक्यांना अडीच टीएमसी पाण्याची तजवीज आपण केली. मी तुम्हाला वचन देतो महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार ऑक्टोबरमध्ये सत्तेत बसल्यानंतर फक्त सव्वावर्षात माण-खटाव तालुक्यातील गावांना टेंभू योजनेचं पाणी देण्याची व्यवस्था शरद पवार यांच्या साक्षीने करू. आमचं सरकार असताना जिहे-कठापूरसाठी २५० कोटी रुपये दिले. आम्ही धक्का मारला म्हणून ही योजना पुढे आली. घटनेला बदलण्याचं पाप भाजपच्या मनात आलंय हे तुम्ही लक्षात घ्या. देशाचं चित्र बदलायला लागलंय. महाराष्ट्रात ३२ ते ३५ जागा आमच्या येतील, कदाचित यात वाढच होईल.’’

धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, ‘‘माण-खटाव तालुक्यांतील जनतेशी सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्यापासून तीन पिढ्यांचे संबंध आहेत. मी ही निवडणूक जनतेच्या स्वाभिमानासाठी लढतोय. मी कधीही जलनायक अथवा पाणीदार खासदार अशी उपाधी लावणार नाही. तुमच्या प्रत्येक सुखदुःखात मी तुमच्या मागे उभा राहीन. तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर एक फोन लावा तुमच्यासाठी इथं हजर असेन.’’

प्रभाकर देशमुख म्हणाले, ‘‘शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते-पाटील यांना उमेदवारी देऊन विजयाच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. आज शेतकरी उद्‌ध्वस्त आणि अस्वस्थ आहे. जर शेतकऱ्यांना कोणी न्याय देऊ शकत असेल तर ते शरद पवार आहेत. माण तालुक्यात पाणी सोडताना राजकारण आणून लोकांना अडचणीत आणण्याचं काम केले जातंय. पाण्यासाठी घाणेरडं राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवायचा निर्णय जनतेने घेतला आहे.’’ या वेळी राजे भूषणसिंह होळकर, अनिल देसाई, उत्तमराव जानकर, सुरेंद्र गुदगे, रणजितसिंह देशमुख, अभयसिंह जगताप, संजय भोसले, सुभाष नरळ आदींची भाषणे झाली.

लोकसभा निवडणुकीत मी उभा असताना तुम्ही मला भरपूर साथ दिली, मोठ्या संख्येने मतदान केले. ते माझ्या अंतःकरणात कायम राहील. कधीही संकटं आली, तर तुम्ही मला हक्काने सांगू शकता.

-शरद पवार

सत्ता मिळविण्यासाठी जाती जातीत वाद निर्माण केले जात आहेत.

-राजे भूषणसिंह होळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

Sakal Podcast: मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार ते पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार

Baramati Assembly constituency 2024 : बारामतीच्या सांगता सभांकडे राज्याचे लक्ष..!

SCROLL FOR NEXT