सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने (SDPI) लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (UDF) पाठिंबा दिल्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला.
पन्ना येथे मध्य प्रदेश भाजपचे अध्यक्ष आणि पक्षाचे खजुराहोचे उमेदवार व्हीडी शर्मा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यआधी झालेल्या सभेत बोलताना, स्मृती इराणी यांनी वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना इशारा दिला आणि म्हटले की "जर तुम्ही देशाची बदनामी करण्याची धमकी दिली तर ते सहनही करणार नाही आणि तुम्हाला माफही करणार नाही. "
"आज ते (राहुल गांधी) वायनाडमधून उमेदवारी दाखल करत आहेत. त्यांच्यासमोर केरळमधून आमचे पक्षाध्यक्ष निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस आता दहशतवादी संघटनांकडे पाठिंबा मागत आहेत. हे तेच लोक आहेत ज्यांनी कलम 370A रद्द करण्याला संसदेत विरोध केला. हे तेच लोक आहेत ज्यांनी बालाकोटमध्ये झालेल्या हवाई हल्ल्याचे पुरावे मागितले. आज हेच लोक सत्तेसाठी देशाला धोका देत आहेत," अशा शब्दात इराणी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केली.
केंद्रीय मंत्री पुढे बोलताना म्हणाल्या, "मला राहुल गांधींना हे सांगायचे आहे, 'जर तुम्ही देशाची बदनामी करण्याची धमकी दिलीत तर ते सहन करणार नाही आणि माफही करणार नाही."
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी या सभेत काँग्रेसला चांगलेच झोडपले, काँग्रेसला पराभवाच्या भीतीने पळून जाण्याची सवय आहे, अशीही टीका केली.
"मी त्या प्रदेशातील आहे जिथे पाच दशके एका राजघराण्याने राज्य केले, जिथे कपाळावर टिळा लावणे आणि प्रभू रामाचे नाव घेणे हा एक प्रकारचा राजकीय शाप होता. मी त्या प्रदेशातील आहे 'जहां हाथ के साथ सायकल भी चलती थी, हाथ को साफ किया गया सायकल पंक्चर कर दी गई.' आणि काँग्रेसला पराभवाच्या भीतीने पळून जाण्याची सवय आहे, हे अमेठीच्या जनतेला विचारा,” अशी खरमरीत टीका इराणी यांनी केली.
याआधी मंगळवारी भाजप केरळचे अध्यक्ष के सुरेंद्रन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने (SDPI) काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (UDF) लोकसभा निवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा देण्याच्या घोषणेवर आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे.
SDPI ही बंदी घातलेली दहशतवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) ची राजकीय संघटना मानली जाते.
केंद्रीय गृह मंत्रालयाने सप्टेंबर 2022 मध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्या संलग्न संघटनांना 'अनलॉफुल असोसिएशन' घोषित केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.