आय काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस, अशी शकले झालेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई पायउतार झाले आणि चौधरी चरणसिंग पंतप्रधान पदावर आले.
-अशोक भुस्कुटे, चिपळूण
Lok Sabha Elections : १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत श्रीमती इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची चिपळुणात झालेली सभा गाजली होती. त्या सभेतील आठवणी अजूनही जुन्या लोकांच्या लक्षात आहेत. श्रीमती गांधी यांनी सभा गाजवलीच त्यात त्यांनी महिलांच्या काळजाचा ठाव घेतला होता.
१९७७ च्या ऐतिहासिक लोकसभा निवडणुकीत चार प्रमुख विरोधी पक्ष एकत्र आले. जनता पक्ष स्थापन झाला. या पक्षाने केंद्रात असलेली काँग्रेसची सत्ता संपुष्टात आणली, त्यानंतर केंद्र सरकारने श्रीमती गांधी, संजय गांधी यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला. काँग्रेस (Congress) पक्षात पुन्हा फूट पडली. आय काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस, अशी शकले झालेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई पायउतार झाले आणि चौधरी चरणसिंग पंतप्रधान पदावर आले. पण, ऐनवेळी आय काँग्रेसने चरणसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला.
बहुमताला सामोरे जाण्याऐवजी त्यांनी राजीनामा दिला. पुन्हा लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि इंदिरा गांधी यांच्या देशभर झंझावाती सभा सुरू झाल्या. त्यापैकीच त्यांची एक सभा चिपळूणमध्ये (Chiplun) झाली होती. जनता दलाच्या राजवटीने भ्रमनिरास झालेल्या लोकांचे डीबीजे कॉलेजच्या मैदानाकडे लक्ष लागले होते. कारण इंदिरा गांधी यांच्या उतरण्याची व्यवस्था डीबीजेच्या मैदानावर केली होती. गोविंदराव निकम, नथूरामशेठ रेडीज, शांताराम बुरटे, रमेश कदम, शौकत मुकादम यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते सभेच्या तयारीत मग्न होते. श्रीमती गांधी डीबीजेच्या मैदानावर न उतरता पवन तलाव येथे उतरल्या.
तेथे त्यांना आणण्यासाठी बाळासाहेब माटे यांची ओपन जीप पाठवण्यात आली. पवन तलाव मैदानावरील चिखल तुडवत त्या जीपपर्यंत पोहचल्या. तेथून युनायटेड इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आल्या. सभेला मार्गदर्शन करताना त्यांनी लोकांच्या भावनांना हात घालीत घणाघाती भाषण केले. महिलांचे मंगळसूत्रही आता या सरकारने महाग केले, असे सांगत त्यांनी महिलांच्या काळजाचा ठाव घेतला. जनता सरकारवर टीकेचा भडीमार करत त्यांनी सभा जिंकली.
दरम्यान, सभा झाल्यानंतर श्रीमती गांधी कापसाळ येथील विश्रामगृहावर चहापानसाठी गेल्या. चहा-पान करत कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्या पवन तलाव मैदानाकडे जाण्यासाठी गाडीत बसल्या. विश्रामगृहातून बाहेर पडताना आपण पंखे, लाईट बंद केली नाही, हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्या गाडीतून उतरल्या आणि विश्रामगृहातील लाईट, पंखे बंद करून पुन्हा गाडीत बसल्या. त्यांचा हा स्वभाव पाहून कार्यकर्तेही चकीत झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.